सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या ‘सकल हिंदु समाज जनजागरण मेळाव्यां’त हाक !
हिंदूंनो, देश आणि धर्म यांवरील संकटांच्या विरोधात संघटित होण्याची हीच वेळ !
सिंधुदुर्ग – देश, धर्म आणि हिंदू यांवर विविध आक्रमणे होत असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. याविषयी हिंदूंमध्ये जागृती करणे आणि सर्वांनी एकत्र येत धर्मरक्षणासाठी विचारमंथन करणे या उद्देशाने २४ जुलै या दिवशी ‘सकल हिंदु समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सकल हिंदु समाज जनजागरण मेळाव्यां’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यांत देश, धर्म आणि हिंदू यांवरील संकटांच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे, अशी हाक देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, देवगड, सावंतवाडी, कणकवली आणि वेंगुर्ला येथे या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
‘अग्नीपथ’ योजनेतून घराघरात हिंदु सैनिक निर्माण होतील ! – डॉ. सुभाष दिघे, मालवण
मालवण – शहरातील दत्तमंदिरात झालेल्या मेळाव्यात बोलतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. सुभाष दिघे म्हणाले, ‘‘देशाच्या संरक्षणदलाच्या ‘अग्नीपथ’ योजनेत समस्त हिंदु युवक सहभागी झाल्यास घराघरात हिंदू सैनिक निर्माण होतील. देशात काही ठराविक शक्तींकडून ‘अग्नीपथ’सारख्या चांगल्या योजनांना विरोध दर्शवला जात आहे. ‘हिंदु केवळ आरत्या आणि भजन यांतच गुंतला जावा’, असे या मागचे षड्यंत्र आहे. देश आणि धर्म यांवरील आक्रमणे जर थांबवायची असतील, समस्त हिंदूंनी सशक्त बनणे आवश्यक बनले आहे.’’
या वेळी भाऊ सामंत, विलास हडकर, बबन परुळेकर, अधिवक्ता समीर गवाणकर, रत्नाकर कोळंबकर, दीपक भोजने, सुदेश आचरेकर, राजेश वळंजू, आप्पा लुडबे, दीपक पाटकर, पूजा करलकर, सन्मेश परब, सदानंद धुरी, संजय गोवेकर, आबा हडकर, अन्वय प्रभु, दाजी मांजरेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, भिवा शिरोडकर, अनिकेत फाटक आणि पवन बांदेकर यांच्यासह हिंदू उपस्थित होते.
सद्यःस्थितीत हिंदु समाजाने आत्मसंरक्षण करण्याची आवश्यकता ! – डॉ. प्रवीण ठाकरे
सावंतवाडी – हिंदु धर्माने सहिष्णुतेची शिकवण दिली; मात्र अलीकडच्या काळात हिंदू आतंकवादी असल्याचे जाणीवपूर्वक पसरवण्यात आले. कुठलाही हिंदु आतंकवादी असू शकत नाही. आजची परिस्थिती पहाता हिंदु समाजाला आत्मसंरक्षण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदूंनी आता संघटित होऊन येणार्या आक्रमणाला थोपवले पाहिजे, अन्यथा येणार्या काळात हिंदु समाजावरील संकट अधिक गडद होत जाईल. हिंदूंनी जागृत होऊन संघटित झाले पाहिजे. देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला गेला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रवीण ठाकरे यांनी केले.
येथील कळसूलकर हायस्कूलमध्ये झालेल्या मेळाव्यास व्यासपिठावर विश्व हिंदु परिषदेचे अजित फाटक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शैलेश पै, सुनील सावंत आणि लक्ष्मीकांत कराड उपस्थित होते.
देवगड येथील मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर यांनी, तर कणकवली येथील मेळाव्यात समितीचे श्री. आनंद मोंडकर यांनी हिंदूसंघटनाची आवश्यकता या विषयावर विचार व्यक्त केले. देवगड येथील मेळाव्याला माजी आमदार अधिवक्ता अजित गोगटे, उदय बापट, रघुनाथ पाटील आणि प्रकाश बोडस यांची उपस्थिती होती, तर कणकवली येथे डॉ. बा.पु. करंबेळकर आणि माजी गटशिक्षणाधिकारी मोहन सावंत उपस्थित होते.