आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून ‘व्हायरल फिव्हर’ (विषाणूजन्य ताप) !
१. ‘व्हायरल फिव्हर’ येण्यामागील कारणे आणि त्यावर करावयाचे आयुर्वेदाचे उपाय !
१ अ. चुकीच्या आहार-विहारामुळे शरीर ‘व्हायरल’ तापाला बळी पडणे : आता आपण आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून ‘व्हायरल’ तापाचा विचार करूया. सगळेच संसर्गजन्य आजार हे श्वास, स्पर्श, एकशय्या, एकवस्त्र, एक पादत्राण, सहभोजन (एका ताटात/ एकमेकांचे उष्टे अन्न खाणे किंवा उष्टे पेय पिणे) यातूनच पसरतात. त्यामुळे सदासर्वकाळ अशा गोष्टी टाळाव्यात, असे आयुर्वेदच नव्हे, तर आधुनिक वैद्यकशास्त्रही सांगते. ‘व्हायरल’ तापासाठी तो उत्तम प्रतिबंधक उपाय आहे. ‘व्हायरल’ ताप सामान्यत: ऋतूसंधी काळात डोके वर काढतो; म्हणून या काळात ‘ऋतू पालटला’, असे जरी वाटत असले, तरी खानपानातील पालट सावकाश करावेत, उदा. थंडी संपून उन्हाळा चालू होतांना आधीच्या ऋतूतील गरम पाण्याचे स्नान बंद करून लगेच गार पाण्याने स्नान करू नये. उन्हाळा स्थिर होईपर्यंत ‘कोमट पाणी’ हा मध्यम मार्ग अवलंबावा.
खरेतर ‘व्हायरल’ तापासाठी विषाणू हा ‘निमित्तमात्र’ असतो. हा विषाणू म्हणजे त्या तापाचे मुख्य कारण नव्हे. आपण चुकीच्या आहार-विहारांनी स्वतःच्या शरिरात आजाराला अनुकूल अशी केलेली वातावरणनिर्मिती हे त्याचे महत्त्वाचे कारण असते. मग आपल्या शरिरात असे काय पालट झालेले असतात ? तर आयुर्वेदाच्या मते, अग्नी मंद होऊन पचन अल्प झालेले असते. त्यातून निर्माण झालेला अर्धपाचित आहाररस (आमविष) शरिरात तसाच शोषला जाऊन सर्वत्र पसरतो. तो आहाररस स्वतःसमवेत जठरातील उष्म्यालाही वाहून नेतो. तो जेथे जातो, त्या त्या स्रोतात मार्गावरोध निर्माण करून शरिराचा बाह्य उष्मा वाढवतो.
१ आ. ताप लवकर बरा होण्यासाठी लंघन करणे, हा सर्वाेत्तम उपाय ! : शास्त्र सांगते की, कुठल्याही तापात प्रारंभी लंघन किंवा अत्यंत हलका आहार हाच खरा उपचार आहे. तापात आपल्याला भूक लागत नाही. याचा अर्थ शरीर स्वतःही आपल्याला लंघनाचाच उपाय सुचवत असते; परंतु अलीकडे ‘एक वेळही उपाशी रहाणे, म्हणजे जणूकाही साक्षात् मृत्यूच्या तोंडी जाणे’, असा सगळ्यांचा अपसमज असतो. त्यात प्रतिजैविके घ्यायची असतील, तर ‘काहीतरी खाऊन मग ती घ्या’, अशीच सूचना इतरांकडून मिळते. मुळात ताप निर्माण करणार्या परिस्थितीत जेवून आधी भर घालायची आणि मग वरून ताप न्यून करणारे औषध घ्यायचे, असा हा द्राविडी प्राणायाम नित्य अन् सर्वत्र चालू असतो. यामुळे लहान मुलांची अवस्था तर पुष्कळ वाईट होते. त्यांना भूक नसल्याने ते आकांडतांडव करून निसर्गाच्या आज्ञेत रहाण्याचा प्रयत्न करतात; पण तितक्याच हट्टाने त्यांच्या माता त्यांना अन्न (जे न पचल्याने त्याचे मुलांच्या शरिरात आमरूपी विषामध्ये रूपांतरित होणार असते.) भरवत असतात आणि वरून ‘तापाच्या औषधापूर्वी खायला नको का ?’, असा प्रश्न विचारतात.
१ इ. शरीर देत असलेल्या सूचना ऐकून शरिरातील प्रतिकारयंत्रणेला साहाय्य करावे ! : वास्तविक ताप जर १०२ फॅरेनहाईटच्या आत असेल, तर शरिरातील प्रतिकारयंत्रणेला तिचे काम करू द्यावे. त्या वेळी लंघन, गरम पाणी, विश्रांती असे उपाय करण्याच्या सूचना शरीर देत असते. ते समजून अंमलात आणून त्या यंत्रणेला साहाय्य करावे. वैद्यांकडून औषधे घ्यावीत. (आयुर्वेदात यावर पुष्कळ औषधे आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार औषध निवडता येईल, इतका निवडीला वाव आहे.) प्रतिजैविकांचा वापर शक्यतो टाळावा. (‘शालेय मुलांमध्ये आढळणारा अवाजवी संताप आणि अस्वस्थपणा हे प्रतिजैविकांच्या अतीवापराचे दुष्परिणाम असू शकतात’, असे काही बालरोगतज्ञही सांगतात.)
२. ताप आल्यावर पहिले ३ दिवस चाचण्या करण्याची घाई करू नये !
कडू चवीची औषधे घेणे, पांघरूण घेऊन पडून रहाणे, तसेच औषधी सिद्ध पेज (शास्त्रात याला ‘यवागू’ म्हणतात.) यांचा वैद्यांच्या सल्ल्याने योग्य वापर करावा. दिवसा झोपू नये, तसेच स्नान करू नये. ‘ताप असतांना विष्णुसहस्रनामाचा पाठ करावा किंवा ऐकावा’, असे चरक संहितेत सांगितले आहे. तसे केल्यास रुग्णाला लाभ होतो. गंभीर लक्षणे (श्वास घेता न येणे, १०२ फॅरेनहाईटच्या पुढे ताप येणे, ग्लानी येणे, बडबड केली जाणे, थंडी वाजून येणे) नसतील, तर पहिल्या ३ दिवसांत चाचण्या करायची घाई करू नये. त्यात पालट झालेले असतातच, असे नाही.
३. संपूर्ण ताप जाईपर्यंत रुग्णाला व्यवस्थित विश्रांती देणे आवश्यक !
‘ताप उतरला, तरी अशक्तपणा अल्प होऊन पूर्वीचे बळ प्राप्त होईपर्यंत स्नान, अन्नपान करणे, दिवसा झोप घेणे, तसेच मैथुन, व्यायाम आणि श्रम या गोष्टी वर्ज्य कराव्यात’, असे शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे. सध्या ‘शाळा किंवा शिकवणी बुडाली, तर जगबुडी होईल’, या थाटात लहान मुलांनाही आवश्यक अशा विश्रांतीपासून वंचित रहावे लागते, हे दुर्दैव आहे. त्यामुळे ती वारंवार आजारी पडतात; कारण शरीर नेहमी दुर्बलच असते.
साध्या तापावर आयुर्वेदाचे उपचार एकदा केलेली व्यक्ती परत दुसर्या कुठल्या औषधाचा विचारच करत नाही; कारण ‘आयुर्वेदाच्या औषधांनी भूक लागणे, अंग हलके होणे, प्रसन्नता आणि बळ यांची प्राप्ती तुलनेने लवकर होते’, असा बर्याच रुग्णांचा अनुभव आहे.’
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’)
तापाची लक्षणेएक ऋतू संपून दुसरा ऋतू चालू होण्याच्या ऋतुसंधीकाळात या विषाणूजन्य तापाची साथ येते. (भारतातील शहरांमध्ये लोकसंख्येची घनता पुष्कळ अधिक असल्याने आणि सोप्या भाषेत दरडोई जागा अगदी अल्प उपलब्ध असल्याने यांचा प्रसार पुष्कळ झपाट्याने होतो.) नाक किंवा घसा येथे काही पूर्वरूपे १-२ दिवस दिसतात. त्यानंतर ताप येतो. साधारणत: १०१ ते १०४ एफ् (फॅरनहाइट) या प्रमाणात ताप असतो. त्यासमवेत अंगदुखी, घसादुखी, घशात खवखव होणे, डोकेदुखी, नाकातून पाणी गळणे, नाक चोंदणे, खोकला, भूक मंदावणे, अशक्तपणा, कधी पोटदुखी, कधी जुलाब, मळमळ, क्वचित् उलटी अशी काही लक्षणे दिसतात. सामान्यत: ताप १ ते ४ दिवस टिकतो. कधी कधी ७ दिवसही रहातो; मात्र अन्य लक्षणे अल्प व्हायला १० ते १२ दिवस लागतात. – वैद्या सुचित्रा कुलकर्णी |
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी आपण आपल्या वैद्यांशी वा आधुनिक वैद्यांशी (डॉक्टरांशी) बोलून घेऊन औषधोपचार घ्यावेत. – संकलक |