लोकमान्य टिळक यांच्या जगण्यातून ध्येयनिष्ठा शिकायला हवी ! – पार्थ बावस्कर, इतिहास अभ्यासक
पुणे – लौकिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळक-आगरकर यांनी सरकारी नोकरीऐवजी स्वतःचे व्यवसाय चालू केले. टिळकांना आजच्या तरुणाईने शिक्षण संस्था काढणारे आणि वर्तमानपत्र चालवणारे उद्योजक म्हणून पहावे. आजच्या तरुणांनी टिळकांच्या जगण्यातून आधुनिक मूल्यांचा स्वीकार, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि ध्येयनिष्ठा शिकायला हवी, असा सल्ला व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी दिला. केसरीवाडा येथे आयोजित लोकमान्य टिळक जयंतीच्या सोहळ्यात ‘लोकमान्य टिळक आणि तरुणाई’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना ‘लोकमान्य टिळक सामाजिक एकात्मता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, लेखिका शेफाली वैद्य, कुणाल टिळक आदी उपस्थित होते.
या वेळी लांजेकर म्हणाले की, महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवण्याचा विचार घातक आहे. जातपात महत्त्वाची नसून भगव्या झेंड्याखाली एकत्र येणे महत्त्वाचे आहे. ‘विकृत इतिहास मांडणार्या लोकांना उघडे पाडले पाहिजे’, असे मत लेखिका शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले. ‘लोकमान्यांशी निगडित साहित्याची ‘डिजिटल रिपॉझिटरी’ आणि ‘इंटरॅक्टिव्ह म्युझियम’चा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार’, असे कुणाल टिळक यांनी सांगितले.