स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ९ ते १७ ऑगस्ट ‘स्वराज्य महोत्सव’ ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली
सांगली, २६ जुलै (वार्ता.) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘घर घर तिरंगा’ या मोहिमेसमवेत ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ आयोजित केला आहे. महोत्सवात हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण, स्वच्छता, स्वातंत्र्यवीरांची माहिती समोर येण्यासाठी प्रयत्न करणे, ही माहिती विविध ठिकाणी लावणे, निबंधस्पर्धा यांसह अन्य उपक्रम राबवण्यात येतील, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद पोरे ‘बूस्टर डोस’विषयी माहिती देतांना म्हणाले, ‘‘१५ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत १८ ते ५९ वर्षे वयोगटातील सर्वांना ‘बूस्टर डोस’ विनामूल्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘बूस्टर डोस’साठी ११ लाख ३२ सहस्र लाभार्थी आहेत. यांसाठी २७५ लसीकरण केंद्र असून गावपातळीवरही नियोजन केले आहे.’’
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘मोहिमेत जिल्ह्यासाठी ६ लाख ३ सहस्र राष्ट्रध्वज लागतील. नागरिकांनी ९०० मिमी बाय ६०० मिमी आणि ४५० बाय ३०० मिमीचे ध्वज घरावर लावावेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी.’’