आसगाव येथील अवैध मद्यालय आणि रेस्टॉरंट यांच्यासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
पणजी, २४ जुलै (वार्ता.) – काँग्रेसने २३ जुलै या दिवशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची १८ वर्षीय मुलगी गोव्यात आसगाव येथे अनधिकृतपणे मद्यालय चालवत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २४ जुलैला या अवैध मद्यालय आणि रेस्टॉरंट यांच्यासमोर निदर्शने करून ते बंद करण्याची मागणी केली.
गोव्यात आसगाव येथील ‘सिली सोल्स अँड कॅफे’ या ‘बार अँड रेस्टॉरंट’ला अबकारी आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, हे रेस्टॉरंट केंद्रीय मंत्री इराणी यांची मुलगी चालवते आणि १३ मासांपूर्वी मृत झालेल्या एका व्यक्तीच्या नावाने जून २०२२ मध्ये रेस्टॉरंटसाठी अनुज्ञप्ती घेण्यात आली आहे. कायद्यानुसार एका रेस्टॉरंटला २ व्यक्तींच्या नावाने अनुज्ञप्ती देता येत नाही. यावरून काँग्रेसचे केंद्रीय नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी देहली येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अनधिकृतपणे मद्यालय चालवत असल्याचा आरोप केला.
केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २३ जुलैला देहली येथे पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन केले होते. २४ जुलैला त्यांनी त्यांच्या १८ वर्षीय मुलीच्या विरोधात केलेल्या विधानावरून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसोझा आणि काँग्रेस पक्ष यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. संबंधित नेत्यांनी विनाअट सार्वजनिकरित्या क्षमा मागावी आणि त्वरित आरोप मागे घ्यावेत, असे नोटिसीत म्हटले आहे.