‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर द्यावा ! – पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र संचालिका किरण सोनी गुप्ता
पुणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यास येथील कला, संस्कृती यांना अधिक उजाळा मिळेल, असे मत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाअंतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका किरण सोनी गुप्ता यांनी व्यक्त केले.
‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्ह्यात २१ लाख ६० सहस्र कुटुंबे असून या प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अल्प दरात ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार असून काही दानशूर संस्था आदींकडून गरजूंना ध्वज विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आठवडे बाजारातही ध्वजविक्री केंद्रे लावण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले, क्रांतीकारक, स्वातंत्र्यसेनानींची स्मारके यांची दुरुस्ती, सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, तसेच १ सहस्र हेक्टरवर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. रॅली, तसेच शाळा आणि महाविद्यालये येथे निबंध, वक्तृत्व, क्रीडा स्पर्धा आदींचेही आयोजन जिल्ह्यात होईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.