पन्हाळा येथे निष्क्रीय पुरातत्व विभागाच्या विरोधात सहस्रो शिवभक्तांच्या एकतेचा हुंकार !
कोल्हापूर, २४ जुलै (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडाची पडझड होत आहे. येथे पर्यटकांकडून मद्यपान केल्याचे ‘व्हिडिओ’ समोर येत आहेत. पर्यटकांकडून येथील पावित्र्य भंग आहे, याकडे पुरातत्व विभाग डोळेझाक करत आहे. त्यामुळे निष्क्रीय अशा पुरातत्व विभागाला जाग आणण्यासाठी सहस्रो शिवभक्त २४ जुलै या दिवशी पन्हाळगडावर एकत्र आले. कोल्हापूरसह राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या शिवभक्तांनी प्रथम नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यानंतर भगवे फेटे घातलेल्या आणि भगवे ध्वज घेतलेल्या सहस्रो शिवभक्तांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. मोर्च्याच्या शेवटी पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
सर्व गड-दुर्गांचा जिर्णाेद्धार करावा, गड-दुर्गांवरील इस्लामिक अतिक्रमण काढून टाकावे, प्रत्येक गडावर ३६५ दिवस भगवा ध्वज फडकत राहिला पाहिजे, प्रत्येक गडाचा इतिहास त्याच गडावर मिळाला पाहिजे, प्रत्येक शूरवीर मावळ्यांची समाधी आणि जन्मस्थळ सन्मानाने बांधावे, यांसह गडाच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंडळाची स्थापना करावी, येथे येणार्या पर्यटकांकडून पावित्र्य राखले जाण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित प्रयत्न व्हावेत, गडदुर्गांच्या संवर्धनासाठी निधी मिळावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
विशेष – ‘गड-दुर्गप्रेमी, शिवप्रेमी म्हणून आंदालेनासाठी उपस्थित रहा’, असे आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आले होते. याची नोंद घेत सहस्रो शिवभक्त पन्हाळा येथे उपस्थित होते.