सातारा येथे २ ट्रक भरून ‘व्हीलचेअर’ भंगारात
सातारा – येथील मोळाचा ओढा परिसरात असणार्या एका भंगाराच्या दुकानात मध्यरात्री सुस्थितीतील २ ट्रक भरून ‘व्हीलचेअर’ (चालता न येणार्यांसाठी वापरायची चाकांची आसंदी) आल्याचे अपंग बांधवांना समजले. त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
अपंग बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याविषयी आपण लक्ष घालावे. अपंग बांधवांना व्हीलचेअरचे वाटप न करता त्या भंगाराच्या दुकानात का देण्यात आल्या ? कोणत्या शासकीय विभागातून किंवा कुणाच्या सूचनेवरून या व्हीलचेअर भंगारात देण्यात आल्या ? याविषयी संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.