६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे (वय ७४ वर्षे) यांच्या अंत्यविधीचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘१६.७.२०२२ या दिवशी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. कै. (सौ.) शालिनी मराठे यांच्या पार्थिवाचे सूक्ष्म परीक्षण
अ. मराठेकाकूंच्या पार्थिवाच्या भोवती ‘सूक्ष्मातून पिवळ्या रंगाची दैवी आभा निर्माण झाली आहे’, असे मला दृश्य दिसले.
आ. ‘काकूंच्या पार्थिवापासून काही अंतरावर त्यांचा लिंगदेह उपस्थित आहे’, असे दृश्य मला दिसले. तो लिंगदेह पिवळ्या रंगाचा होता.
इ. काकूंच्या कपाळावरील कुंकवाभोवती सूक्ष्मातून गोल आकारात दैवी ऊर्जा निर्माण झाली होती. ही ऊर्जा त्यांच्या आज्ञाचक्रातून प्रक्षेपित होत होती, तसेच ‘ही ऊर्जा त्यांच्या पतिव्रतेच्या तपश्चर्येने निर्माण झाली आहे’, असे मला जाणवले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कै. मराठेकाकूंच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे
अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काकूंच्या पार्थिवाचे दर्शन घेतले, तेव्हा काकूंचा लिंगदेह पुष्कळ आनंदी झाला होता आणि तो काव्यस्वरूपात त्याचा आनंद व्यक्त करत होता; परंतु त्याच्या कवितेतील शब्द मला नीट समजले नाहीत.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची दृष्टी काही वेळ काकूंच्या पार्थिवावर होती, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे पार्थिवाच्या भोवती असलेल्या दैवी आभेत आणखी वाढ झाली, तसेच काकूंच्या लिंगदेहाला चैतन्य प्राप्त झाले.
३. मराठेकाकूंची ओटी भरणे
एका साधिकेने काकूंची ओटी भरली, त्या वेळी काकूंचा लिंगदेह त्या साधिकेवर संतुष्ट झाला. त्यामुळे त्याने त्या साधिकेला आशीर्वाद दिला.
४. मराठेकाकूंच्या पार्थिवाला शेवटी तुळशीहार अर्पण करणे
काकूंचे पती श्री. प्रकाश मराठे यांनी विधीच्या शेवटी काकूंना तुळशीहार अर्पण केला, तेव्हा काकूंच्या लिंगदेहातून भावाश्रू आले आणि तो ‘कृतज्ञतेने काव्य म्हणत आहे’, असे मला जाणवले. त्या काव्यातील काही अस्पष्ट शब्द सूक्ष्मातून माझ्या कानी पडत होते.
५. काकूंच्या लिंगदेहाने माझ्याकडे त्यांची पुढील इच्छा व्यक्त केली, ‘मला शेवयांची खीर आवडते. १२ व्या दिवशी मला शेवयांची गरम खीर हवी. तसा तू निरोप सांग.’ ( ‘या प्रसंगानंतर मी श्री. मराठे यांना अनौपचारिक बोलतांना विचारले, ‘‘काकूंना शेवयांची खीर आवडायची का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्ही गोव्यातील असल्याने आमच्याकडे शेवयांची खीर फारशी केली जात नव्हती; परंतु आम्ही पुण्याला जायचो, तेव्हा तिला तेथे केलेली शेवयांची खीर आवडायची.’’ यानंतर माझ्या लक्षात आले की, काकूंना प्रत्यक्षातही शेवयांची खीर आवडत होती.’)
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२२)
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |