लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७७ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
२३ जुलै या दिवशी आपण लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले यांच्या साधनाप्रवासातील बालपण, शिक्षण आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यापूर्वी केलेली साधना हा भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/598793.html
४. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला प्रारंभ
४ अ. सनातनने आयोजित केलेले प्रवचन ऐकल्यावर ते आवडणे आणि त्यानुसार कृती करणे; परंतु साप्ताहिक सत्संगाला जाण्याचे टाळणे : ‘वर्ष २००० मध्ये मी सनातनने आयोजित केलेले प्रवचन ऐकले. मला ते आवडले आणि त्यात सांगितल्याप्रमाणे मी शास्त्रानुसार देवघरात देवांची मांडणी केली. साधकांनी मला बर्याच वेळा साप्ताहिक सत्संगाला येण्यास सांगितले होते; पण मी त्यांना अडचणी सांगत असे, उदा. मला वेळ नसतो. घरात पुष्कळ अडचणी असून आजारपणे आहेत. त्यातच माझ्या जवळच्या प्रेमळ व्यक्तींचे निधन झाल्याने माझे मन दुःखी आणि अस्वस्थ झाले होते.
४ आ. घरी सत्संग चालू झाल्यावर साधनेची गोडी लागणे आणि ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सनातन संस्थेत आणले’, अशी श्रद्धा असणे : त्यानंतर आमच्या घरी प्रवचन घ्यायचे ठरले. प्रवचनाला आमचे कुटुंबीय आणि शेजारचे, असे १० – १२ जण होतो. आम्हा सर्वांनाच प्रवचन आवडले. त्यामुळे आमच्या घरीच सत्संग चालू झाला. आम्हाला सत्संगाची गोडी वाटू लागली. घर सोडून कुठेही न जाणारी मी इतर ठिकाणी होणारे सत्संग आणि सेवा, यांसाठी बाहेर पडू लागले. माझे सर्व कुटुंबीयही सत्संगाला जात आणि सेवा करत. ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनीच मला बोटाला धरून सनातन संस्थेत आणले’, अशी माझी श्रद्धा आहे.
४ इ. कुटुंबातील सर्वांनी सेवा चालू करणे आणि जीवनात दुःखाचे प्रसंग घडत असतांनाही साधनेमुळे दिवस आनंदात जाणे : माझे यजमान दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करायचे. माझा मुलगा (श्री. पराग गोखले (आताची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)) आणि सून (सौ. मेधा पराग गोखले) ‘प्रवचन करणे, सत्संग घेणे, अध्यात्मप्रसार करणे’ इत्यादी सेवा करू लागले. मीही मला जमेल, तशी सेवा करू लागले, उदा. बालसंस्कारवर्ग घेणे, ग्रंथप्रदर्शन लावणे इत्यादी. मला प्रासंगिक सेवांतूनही आनंद मिळू लागला. आमचे दिवस आनंदात जात होते. कधीतरी दुःखदायी प्रसंग घडत होते. मला जवळच्या प्रेमळ नातेवाइकांचे मृत्यू पहावे लागले आणि इतर नातेवाइकांचीही आजारपणे चालूच होती.
४ ई. यजमानांचे निधन झाल्यावर गुरुदेवांच्या कृपेमुळे स्वतःला सावरू शकणे : वर्ष २००७ मध्ये माझ्या यजमानांचे निधन झाले. या प्रसंगातून मी केवळ गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच) कृपेने सावरू शकले. मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असल्यानेच सावरले, नाहीतर सैरभैर झाले असते. या प्रसंगात गुरुदेवांविषयी जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे.
५. रामनाथी आश्रमात गेल्यावर आलेल्या अनुभूती
५ अ. रामनाथी आश्रमात जायला निघाल्यापासून घरी परत येईपर्यंत ५ दिवस सतत नामजप चालू असणे : वर्ष २०११ मध्ये माझा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचा योग आला. तिथे मला पुष्कळ आनंद मिळाला. रामनाथी आश्रमात जाण्यासाठी घरून निघाल्यापासून माझा नामजप आपोआप चालू झाला. तो घरी परत येईपर्यंत ५ दिवस सतत चालू होता.
५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने मन शांत होऊन आनंद मिळणे : गुरुदेवांच्या दर्शनामुळे मनातील निरर्थक विचारही न्यून झाले. माझे मन एकदम शांत झाले. माझ्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले आणि मला वेगळाच आनंद मिळू लागला.
६. आध्यात्मिक पातळी ६० टक्के होणे
रामनाथी आश्रमातून परत घरी आल्यानंतरही मला आनंद जाणवत होता. त्यानंतर अनुमाने ३ आठवड्यांनंतर ३०.३.२०११ या दिवशी ‘माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली आहे’, असे घोषित करण्यात आले. गुरुदेवांच्या कृपेमुळेच माझी आध्यात्मिक प्रगती होत होती.
७. त्यानंतर पुढे अनुमाने १० मास गुरुदेवांनी माझ्याकडून साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची सेवा करवून घेतली.
८. धाकट्या सुनेचे निधन झाल्याने दुःख होणे
वर्ष २०१३ मध्ये आमच्यावर दुःखाचा प्रसंग ओढवला. माझ्या धाकट्या सुनेचे निधन झाले. त्यामुळे मला मुलाची काळजी वाटत होती.
९. साधनेत पुढे जाण्यासाठी संत आणि कुटुंबीय यांनी केलेले साहाय्य
९ अ. मला सद्गुरु स्वाती खाडये, सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८८ वर्षे) आणि सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८६ वर्षे) यांचे मार्गदर्शन मिळायचे; पण मीच ते घ्यायला न्यून पडत होते.
९ आ. मायेतील गोष्टी आणि स्वभावदोष यांमध्ये अडकणे अन् त्यातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबियांनी पुष्कळ साहाय्य करणे : वर्ष २०१७ पर्यंत मी मायेत अडकत होते. माझी प्रकृतीही बिघडायची. माझे स्वभावदोष उफाळून यायचे. माझ्यात ‘काळजी करणे, भावनाशीलता आणि भीती वाटणे’, हे प्रबळ स्वभावदोष होते. मला त्यांचा पुष्कळ त्रास होत असे. सर्व जण मला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करायचे. मलाही त्यातून बाहेर पडायचे होते; पण मार्ग मिळत नव्हता. तेव्हा मी देवाशी बोलत असे आणि त्याला शरण जात असे. मला कुटुंबियांचेही साहाय्य होत होते. आम्ही चौघे जण (मुलगा, सून, नात (कु. मधुरा) आणि मी) घरी एकत्र बसून एकमेकांच्या चुका सांगून साधनेत साहाय्य करत होतो. ‘माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी घरातील सर्व जण, विशेषतः सौ. मेधा (मोठी सून) मला पुष्कळ साहाय्य करत होती. ती माझे स्वभावदोष दाखवून ‘ते कसे घालवायचे ?’, हेही मला सांगत होती.
१०. रुग्णाईत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !
१० अ. रुग्णाईत असतांना कुटुंबियांनी पुष्कळ काळजी घेतल्याने कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव वाढणे : जेव्हा माझे मन अस्वस्थ असायचे, तेव्हा कुटुंबीय ‘मला आनंद वाटेल’, अशा गोष्टी करू लागले, उदा. मला मोकळ्या हवेत फिरायला नेणे, भजने लावणे, चांगल्या गोष्टी सांगणे, नामजपादी उपायांची आठवण करून देणे इत्यादी. यामुळे माझे मन स्थिर होई. ‘मला साधना करण्यासाठी वेळ देणे, माझी काळजी घेणे, रुग्णाईत असतांना आधुनिक वैद्यांकडे नेणे, वेळेवर औषधे देणे’, हे सर्व माझी दोन्ही मुले, सुना आणि दोन नाती (कु. मधुरा अन् कु. मंजिरी) प्रेमाने करत असत. मी रुग्णाईत असतांना माझ्यातील कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव वाढत होता. देवच माझ्याकडून प्रार्थना करवून घेत होता.
१० आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर व्याधीचे निदान होऊन त्यातून वाचणे : वर्ष २०१८ च्या गुरुपौर्णिमेपूर्वी दीड मास मी रुग्णाईत होते. माझ्यावर वैद्यकीय उपचार चालू होते; पण माझ्या व्याधीचे निदान होत नव्हते. त्या वेळी माझ्याकडून गुरुदेवांनी प्रार्थना करवून घेतल्या. त्यामुळे आधुनिक वैद्यांना माझ्या व्याधीचे निदान झाले आणि त्यावर औषधोपचार केल्यावर मी बरी झाले. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी त्यातून वाचले.
११. गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला गेल्यावर संत आणि साधक यांच्या भेटी झाल्यावर मन आनंदी होणे अन् त्यानंतर संतपद घोषित होणे
‘रुग्णाईत असल्याने मी वर्ष २०१८ च्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला जाऊ शकेन कि नाही ?’, असे मला वाटत होते. गुरुदेवांच्या कृपेने मला तिथे जाता आले आणि सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. माझ्या सर्व साधकांशी भेटी झाल्या. त्यामुळे माझे मन उत्साही आणि आनंदी झाले. पुढे तो उत्साह आणि आनंद ४ दिवस टिकून होता. त्यानंतर ४ दिवसांनी, म्हणजे १.८.२०१८ या दिवशी गुरुकृपेने सद्गुरु स्वातीताईंनी मला संत घोषित केले.
१२. कृतज्ञता आणि प्रार्थना
मी गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. सर्व संत आणि साधक यांनी मला साहाय्य केले. त्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता ! देवा, मला काहीच येत नाही. अशा अज्ञानी लेकरावर गुरुदेवांनी कृपा केली. ‘आपली अशीच अखंड कृपा रहावी आणि या अज्ञानी लेकराकडून शेवटपर्यंत सेवा करून घ्यावी’, अशी गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’ (समाप्त)
– गुरुदेवांच्या चरणांची धूळ,
(पू.) श्रीमती माया गोखले, लांजा, रत्नागिरी. (१३.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |