(म्हणे) ‘शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरे यांच्याएवढा अन्याय अन्य कुणी केला नाही !’ – शरद पवार
दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांना अनावश्यक महत्त्व दिल्याचे वक्तव्य !
पुणे – बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लिखाण पाहिल्यास माझ्या मते ‘शिवछत्रपती यांच्यावर इतका अन्याय अन्य कुणी केलेला नाही !’ त्यांनी जे काही लिखाण केले, ती ‘ज्या घटकाला सत्यावर विश्वास आहे’, तो कधीही मान्य करणार नाही. नको त्या व्यक्तींचे महत्त्व वाढवण्यासाठी काळजी घेण्यात आली. रामदास (समर्थ रामदासस्वामी) आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय ? असे बिनबुडाचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. (सज्जनगड येथील श्री रामदासस्वामी संस्थानच्या वतीने ‘श्रीशिवछत्रपती-समर्थ योग’ या नावाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांच्यामध्ये झालेले विविध पत्रव्यवहार प्रसिद्ध करण्यात आले आहेत, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. त्याचप्रकारे दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असलेले अनेक ऐतिहासिक पुरावे आणि पत्रेही उपलब्ध आहेत. सत्ता गेल्यानंतर केवळ ब्राह्मणद्वेषापोटी आणि समाजाची दिशाभूल करण्यासाठीच शरद पवार वारंवार अशी विधाने करत आहेत ! – संपादक)
शरद पवार यांच्या हस्ते डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र’ आणि ‘विचारप्रवाह’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास छत्रपती शाहू महाराज, माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील उपस्थित होते.
१. महाराष्ट्र सरकारने एके काळी उत्तम खेळाडूंना ‘दादोजी कोंडदेव’ पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर वाद झाले आणि वर्ष २००८ मध्ये राज्य सरकारने ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक गुरु होते कि नाही’, याचा सखोल अभ्यास करण्याचे काम एका समितीवर सोपवले. त्या समितीने सखोल अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला की, दादोजी कोंडदेव आणि शिवछत्रपती यांचा काहीच संबंध नव्हता’, शिवाजी महाराजांना जर कुणी दिशा दिली असेल, तर ती राजमाता जिजाऊंनी दिली आहे. यानंतर ‘दादोजी कोंडदेव’ हा पुरस्कार रहित करण्यात आला. (त्या काळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच शासन सत्तेत होते. त्यामुळे या समितीने त्यांना आवडेल असाच निर्णय घेतला, हे लक्षात घ्या ! – संपादक)
२. ‘श्रीमंत कोकाटे यांनी हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यांनी सर्व गोष्टींचे वास्तव चित्र दर्शवले आहे. शिवछत्रपती यांचा उल्लेख करतांना काही जणांनी धर्मांध, तसेच संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला; पण श्रीमंत कोकाटे यांनी सत्य मांडले आहे. अशाच प्रकारचे काम कॉ. गोविंद पानसरे यांनीही केले होतेे’, असेही पवार म्हणाले. (जातीभेदाचा पुरस्कार करण्यासाठी धादांत खोटा इतिहास मांडणार्यांच्या पाठीशी उभे रहाणे, हा हिंदूंसह संपूर्ण समाजाचा द्रोह आहे. राजकीयदृष्ट्या इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असलेल्या अशा नेत्यांना जनता आता कायमची घरी बसवेल, हे त्यांनी ध्यानात घ्यावे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|