रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची चैतन्यमय वातावरणात प्रतिष्ठापना !
रामनाथी (गोवा) – श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पावन वास्तव्याने सनातनचा रामनाथी आश्रम हे भूवैकुंठच झाले आहे. या आश्रमाला विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. आता सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाच्या रूपाने साक्षात् श्री महाविष्णूचे आगमन झाले आहे !
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात नुकतीच श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली. १४ आणि १५ जुलै २०२२ या दिवशी ‘उत्तराषाढा’ हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जन्मनक्षत्र असतांना संकल्प, गणपतिपूजन, पुण्याहवाचन, पिंडिकास्थापना, ब्रह्मादीमंडल देवतांचे आवाहन आणि पूजन करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सप्तर्षींच्या आज्ञेने प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला. प्रभु श्रीरामासाठी हवनही करण्यात आले. १५ जुलै या दिवशी पूर्णाहुतीने या विधींची सांगता करण्यात आली.
सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी या विधींचे पौरोहित्य केले. या मंगलप्रसंगी सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांनीही श्रीराम शाळिग्रामाच्या दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी साधकांना विविध अनुभूती आल्या.
क्षणचित्र : १४ जुलै २०२२ या दिवशी सकाळी पावसाने विराम घेतला होता. त्या दिवशी दुपारी ज्या वेळी श्रीराम शाळिग्रामाचा प्रतिष्ठापना विधी चालू होता, तेव्हाच जोरदार पाऊस आला. जणू श्रीराम शाळिग्राम प्रतिष्ठापना विधींना हा वरुणाशीर्वाद लाभला !