सप्तर्षींनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दत्तरूपच आहेत’, असे सांगून गुरुपौर्णिमेला त्यांचे प्रत्यक्ष पूजन करण्याविषयी केलेले मार्गदर्शन !
१. अत्री गोत्रात जन्म घेतलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे साक्षात् दत्तगुरुच असून त्या भावाने त्यांचे पूजन केल्यास साधकांना दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभणार असणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी सप्तर्षी (गुरुदेवांविषयी) म्हणतात, ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गोत्र ‘अत्री’ आहे. ऋषीपत्नी अनुसूया हिच्या तपोबळाने ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी श्री दत्तगुरूंच्या रूपात ज्यांच्या घरी जन्म घेतला, ते अत्री ऋषीच आहेत. अत्री गोत्रात जन्म घेतलेले गुरुदेव हे साक्षात् दत्तगुरुच आहेत; म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांच्या माध्यमातून साधकांना ‘श्री गुरु दत्तात्रेयांचे’ आशीर्वाद लाभणार आहेत. साधकांनी ‘गुरुदेवांच्या ठायी साक्षात् दत्तगुरुच आशीर्वाद द्यायला आले आहेत’, असा भाव ठेवल्यास त्यांना तसा आशीर्वाद लाभेल.’
२. गुरुपूजनाच्या वेळी तीन गुरूंनी परिधान करायच्या वस्त्रांच्या रंगांचे महत्त्व !
सप्तर्षी म्हणाले, ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी चंदनाच्या रंगाचे रेशमी सोवळे नेसावे; कारण श्रीमन्नारायणाला उगाळलेले चंदन अतिशय प्रिय आहे. श्री महालक्ष्मीदेवीची कांती सुवर्णासारखी आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक असल्याने त्यांनी सुवर्ण रंगाची रेशमी साडी नेसावी. श्रीचित्शक्ति ही देवी सरस्वतीशी संबंधित आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामध्ये श्री सरस्वतीदेवीचे तत्त्व अधिक असल्याने त्यांनी पांढर्या रंगाची रेशमी साडी नेसावी.’
(‘सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुरूंनी त्या त्या देवतांच्या तत्त्वाशी संबंधित वस्त्र धारण केले होते.’ – संकलक)
३. गुरुपूजनानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मोगरा आणि गुलाब या फुलांचे हार अर्पण करण्याचे महत्त्व !
सप्तर्षींनी पुढे सांगितले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शिष्या आणि आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी गुरुदेवांना फुलांचे हार अर्पण करायचे आहेत. आधी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ गुरुदेवांना मोगर्याच्या फुलांचा हार अर्पण करतील आणि त्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ गुरुदेवांना गुलाबांच्या फुलांचा हार अर्पण करतील. मोगर्याचे फूल हे आदिशक्ति जगदंबेशी संबंधित आहे, तर गुलाबाचे फूल गुरुतत्त्वाशी संबंधित आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनाही (प.पू. बाबांनाही) गुलाबाचे फूल अत्यंत प्रिय होते.’
(‘सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे गुरुदेवांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.’ – संकलक)
४. सनातनच्या महान गुरुपरंपरेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेली या वर्षीची गुरुपौर्णिमा !
सप्तर्षी सांगतात, ‘सनातनच्या गुरुपरंपरेतील आधीचे तिन्ही गुरु, म्हणजे श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद, श्री अनंतानंद साईश आणि प.पू. भक्तराज महाराज हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यात सूक्ष्मातून वास करत आहेत. या वर्षीची गुरुपौर्णिमा सनातनच्या महान गुरुपरंपरेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी एकत्रित गुरुदेवांची पाद्यपूजा करावी. नंतर ‘सामवेद गायनासह गुरुदेवांची आरती करावी.’ (‘असे केले.’ – संकलक)
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नावाच्या मंत्राच्या उच्चारणेसह भावपूर्ण पुष्पार्चना करावी !
सप्तर्षी पुढे म्हणाले, ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांच्या चरणी पुष्पार्चना करायची आहे. गुरुपौर्णिमेपासून सर्वत्रच्या साधकांनी गुरुदेवांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ या नावानेच संबोधायचे आहे; म्हणून पुष्पार्चना करतांनाही त्यांच्या नावाच्या मंत्राचा उच्चार करायचा आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी १०८ वेळा ‘ॐ ऐं क्लीं श्रीं श्रीं श्रीं सच्चिदानन्द-परब्रह्मणे नमः ।’ या मंत्रघोषात गुरुदेवांच्या चरणी पुष्पे अर्पण करावीत. (‘असे केले.’ – संकलक)
६. गुरुपरंपरेशी संबंधित असलेला मंत्रजप !
या मंत्रातील ‘ॐ’ हा बीजमंत्र निर्गुण ईश्वराशी संबंधित आहे. ‘ऐं’ हे बीज श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद यांच्याशी संबंधित आहे. ‘क्लीं’ हे बीज श्री अनंतानंद साईश यांच्याशी संबंधित आहे. पहिले ‘श्रीं’ हे प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी संबंधित आहे, तर नंतरचे दोन ‘श्रीं’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी संबंधित आहे.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.७.२०२२)