‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ याची प्रचीती : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
साधकांना राजयोग्याप्रमाणे सुविधा देणारे परात्पर गुरु डॉक्टर स्वतः संन्यस्त जीवन जगतात. सनातनच्या रामनाथी आश्रमात एका खोलीत परात्पर गुरु डॉक्टरांचे वास्तव्य आहे. त्या खोलीत एक साधी आसंदी, एक छोटे पटल (जे ते जेवणासाठीही वापरतात) आणि एक छोटा पलंग आहे. त्यावरील गादीही साधीच आहे. असे मोजकेच साहित्य असले, तरी तेही नीटनेटके ठेवण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच प्रयत्न करतात. आश्रमातील परात्पर गुरु डॉक्टरांचा वावर ‘मी प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य आहे’, या भावानेच असतो. त्यांचे वागणे-बोलणे, रहाणीमान यांत कुठेच मोठेपणा दिसून येत नाही. या लेखात परात्पर गुरु डॉक्टर किती साधेपणाने रहातात, यासंदर्भात संक्षिप्त रूपाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
वास्तविक परात्पर गुरु डॉ. आठवले हे पूर्वी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संमोहनउपचार तज्ञ होते. त्यांनी जीवनातील काही काळ इंग्लंडसारख्या ठिकाणीही व्यतित केला आहे. आताही ते अध्यात्मातील उच्च स्थानी आहेत. त्यांनी इतके त्यागमय आणि साधेपणाने रहाणे, हेच त्यांच्यातील देवत्व ठळक करणारे आहे. सनातनच्या आश्रमांमध्ये साधकांची साधना सुकर व्हावी, यासाठी अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. स्वतःसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध होणे सहज शक्य असूनही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एक एक पैसा साठवण्यासाठी ही सर्व धडपड चालू आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवन हा ‘काटकसर’ या गुणाचा आविष्कार आहे !
पायमोजे सैल झाल्यानंतर शिवून पुन्हा वापरणे
‘माझ्या पायाला सूज येते; म्हणून प.पू. गुरुदेवांनी पायमोजे दिले होते. वापरल्यामुळे आता ते रूंद झाले आहेत, हे त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी ते आपल्याला शिवून परत घालता येत असल्याचे सांगितले. प्रत्यक्षातही त्यांनी त्यांच्या पायात असलेले पायमोजे कशाप्रकारे शिवून घेतले आहेत, हे दाखवले. यावरून ‘ते स्वतः काटकसर करत असतात आणि तोच आदर्श आपणही सतत घेतला पाहिजे’, असे वाटले.’
– सद्गुरु सत्यवान कदम, सिंधुदुर्ग
२० वर्षांपूर्वीच यंत्राचा वापर करून स्वतःच केस कापण्यास आरंभ करणे
‘केस कापण्यासाठी केश कर्तनालयात गेल्यास अधिक पैसे खर्च होतात, हे लक्षात आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० वर्षांपूर्वी केस कापण्यासाठीच्या यंत्राचा वापर करून स्वतःच केस कापण्यास आरंभ केला.’ – पू. संदीप आळशी
स्वतःच्या कृतीतूनच ‘साधकाने कसे वागावे ?’, याचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘सनातन संस्थेचे प्रसारकार्य चालू झाले, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांचे चिकित्सालय बंद झाल्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले होते. जेव्हा ते प.पू. भक्तराज महाराजांकडे (प.पू. बाबांकडे) जायचे, तेव्हा परतीच्या प्रवासासाठी प.पू. बाबाच त्यांच्या गाडीत पेट्रोल भरून द्यायचे. प्रसाराला जातांना पेट्रोलची गाडी आर्थिकदृष्ट्या महाग पडते; म्हणून प.पू. बाबांनी त्यांची स्वतःची डिझेलवर चालणारी चारचाकी गाडी परात्पर गुरु डॉक्टरांना वापरण्यासाठी दिली होती. अशी आर्थिक स्थिती असतांनाही त्यांनी पुढील कृती करून समष्टीला आणि साधकांना त्यागाची उच्च शिकवण दिली.
१. स्वतःच येण्या-जाण्याचा व्यय करून आणि मानधनही न घेता अध्यात्मावर विनामूल्य प्रवचने करणे
बर्याच ठिकाणी अनेक प्रवचनकार किंवा मार्गदर्शक आयोजकांकडून कार्यक्रमस्थळी येण्या-जाण्याचा व्यय (खर्च) घेतात. तसेच प्रवचन केल्यावर त्याचे मानधनही घेतात. याउलट परात्पर गुरु डॉक्टर जेव्हा अनेक जिल्ह्यांत किंवा शहरांत प्रवचनासाठी जात, तेव्हा ते स्वतःच गाडी चालवायचे. ते अनेक घंट्यांचा प्रवास करून साधकांना विनामूल्य मार्गदर्शन करत आणि प्रवचनही विनामूल्यच घेत असत. त्यांनी कधीही जाण्या-येण्याचा किंवा कसलाच व्यय (खर्च) घेतला नाही.
२. प्रवचनातील हार-तुरे इत्यादींवरील अनावश्यक व्यय टाळण्यास सांगणे
परात्पर गुरु डॉक्टर नेहमी ‘प्रवचनाच्या आरंभी हार नको, तर त्याऐवजी एखादे फूल किंवा फुलांचा गुच्छ द्या’, असे सांगत. ‘ते पैसे धर्मकार्यासाठी वापरता येतील’, असा त्यांचा उद्देश असे.
३. मिळालेले अर्पणही साधकांना धर्मकार्यासाठी परत देणे
व्यासपिठावर किंवा अन्य ठिकाणी त्यांचा सत्कार करतांना त्यांना काही वेळा धन अर्पण म्हणून दिले जायचे. मिळालेले सर्वच धन ते त्या जिल्ह्यातील कार्य वाढवण्यासाठी तेथील दायित्व असणार्या साधकाला द्यायचे; एवढेच नव्हे, तर ‘आणखी काही लागल्यास तेही सांगा’, असेही सांगायचे.’
– श्री. दिनेश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी. (१७.५.२०१६)
४. अर्पण मिळालेले कपडे वापरणे
‘मुंबई येथे असतांना एकदा आश्रमात अर्पण म्हणून जुने कपडे आले होते. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी त्या कपड्यांतील एक पँट शोधली आणि ती ते नेहमीसाठी वापरू लागले. प.पू. डॉक्टर कपड्यांचे मोजकेच जोड वापरतात. ’ – सौ. स्मिता नवलकर, देवद (९.२.२०१७)
५. अंघोळीच्या साबणानेच दाढी करणे
‘प.पू. डॉक्टर दाढी करण्यासाठी शेव्हींग क्रीम न वापरता अंघोळीच्या साबणाचे उरलेले तुकडे वापरतात.’ – अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी. (२४.३.२०१६)
कार्यासाठी पै-पै वाचावा, यासाठी ८० व्या वर्षीही काटकसर करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. परात्पर गुरु डॉक्टरांना अंघोळीनंतर अंग पुसण्यासाठी नवीन पंचा दिल्यावर ते त्याचे दोन भाग करतात आणि त्याचे कापलेले काठ शिवून आणण्यास सांगतात. त्यानंतर ते त्यातील एक भाग वापरण्यास घेतात. तो काही महिने वापरल्यावर त्याचे कापड विरून एके ठिकाणी फाटते. तेव्हा फाटलेल्या भागावर ते अन्य कापडाचा जोड शिवून घेतात आणि परत तोच पंचा वापरतात. अशा प्रकारे ते तो पंचा ७ – ८ महिन्यांहून अधिक काळ वापरतात. (वरील छायाचित्र पहावे.)
२. कोरोनामुळे परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांच्या आजारपणात भेटायला कुणी येत नसल्यामुळे सध्या ते बंडी घालत नाहीत. त्यामुळे त्यांनी सध्या एकच बंडी वापरात ठेवली आहे. तसेच अंतर्वस्त्र हे इतरांना दिसत नसल्यामुळे ते फाटले, तर परात्पर गुरु डॉक्टर त्याला अन्य कापडांचा अनेकदा जोड देऊन वापरतात.
३. पायजमा, बंडी इत्यादी कपडे जीर्ण होऊन वापरणे शक्य नसल्यास त्या कपड्यांचा चांगला भाग काढून खोलीतील साहित्य, खिडक्या, फरशी इत्यादी पुसण्यासाठी शिवून घेतात.
४. एखादी छायांकित प्रत काढल्यावर खाली २ – ४ सें.मी.चा कोरा भाग असल्यास ते तेवढा कागद लिखाणासाठी काढून ठेवतात. तसेच तिकिटे, पोस्टाची पत्रे यांच्यातीलही कोरा भाग कापून त्यावर लिखाण करतात.
– परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सेवेतील साधक (१०.८ २०२१)
फाटलेले कपडे पुन्हा शिवून (रफू करून) वापरणे
नोव्हेंबर १९९७ मधील दौर्याच्या वेळी सांगली येथे असतांना परात्पर गुरु डॉक्टर श्री. एच्.एन्. पाटील यांच्याकडे निवासाला होते. आरंभी श्री. पाटील यांच्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे एक मोठे प्रस्थ असणार. त्यांनी बोटांत अंगठ्या घातलेल्या असणार. ते मोठ्या आसंदीवर (खुर्चीवर) बसत असणार. त्यांच्या बाजूला सुकामेवा ठेवलेला असणार. ते भक्तांना आशीर्वाद देणार’, अशा कल्पना होत्या. प्रत्यक्षात परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांच्या सगळ्या कल्पनांचा भ्रमनिरास झाला; कारण परात्पर गुरु डॉक्टरांचे रहाणे, वागणे आणि बोलणे एकदमच साधे होते. रात्री परात्पर गुरु डॉक्टरांची घरात वापरायची पँट इस्त्री करण्यासाठी श्री. पाटील यांच्याकडे दिली. त्या पँटला एका ठिकाणी रफू केलेले होते. ते पाहून श्री. पाटील यांचा भाव जागृत झाला आणि रफू केलेली ती पँट छातीशी धरून ते रडू लागले. त्यांच्या मनात आले, ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांविषयी काय काय कल्पना केली होती आणि प्रत्यक्षात ते किती साधे आणि थोर आहेत !’’ – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (कान-नाक-घसातज्ञ), राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (५.४.२०१७)
परात्पर गुरु डॉ. आठवले खोली स्तरावर करत असलेली काटकसर
पलंगपोस, स्वच्छतेचे कपडे आदीही पुन्हा शिवून वापरणे
पलंगपोस आणि उशीचा अभ्रा हेही अगदी वापरणे अशक्य होईपर्यंत ते वापरतात. जुने झाले, फाटले, तरी त्यालाच जोड देऊन जमेल तेवढा काळ ते वापरतात. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत पलंगपोसवर घालण्यासाठी असणारे कापड फाटले असतांनाही त्यांनी तेच कापड शिवण विभागातून शिवून आणण्यास सांगितले.
– सौ. पूजा सागर गरुड, सनातन आश्रम, गोवा. (१६.२.२०१३)
गुरुदेवांचा असीम त्याग हा साधकांच्या आध्यात्मिक वाटचालीचा पाया असणे‘गुरुदेव, तुम्ही इतका त्याग केला नसता, तर आम्ही साधक देवत्वाच्या दिशेने छोटी-छोटी पावले कशी टाकू शकलो असतो ? आमच्या साधनेतील प्रगतीचा प्रत्येक टप्पा गाठणे केवळ तुमच्यामुळे आणि तुमच्या असीम त्यागामुळेच आम्हाला शक्य होत आहे. ‘तुम्ही तुमचा प्रत्येक श्वास आणि शरिरातील पेशीन्पेशी अखिल मानवजातीसाठी कशा प्रकारे खर्ची करत आहात ?’, हे गेली कित्येक वर्षे साधक पहात आहेत. हे श्री गुरु, आम्ही सर्व साधक आदराने तुमच्या चरणी नमन करतो. आम्ही आमची घरेदारे सोडली, त्याग केला; म्हणून तुम्ही आमचे कौतुक करता; परंतु आमचा भार कुणाच्या खांद्यावर आहे ? आमच्या साधनेतील प्रयत्नांना कुणाचे पाठबळ आहे ? केवळ तुमचे आणि तुमचेच ! तुम्ही साधकांसाठी ठिकठिकाणी आश्रम बांधले आणि त्या आश्रमांतून निवास, अन्न आणि इतर सुविधा पुरवल्या. त्यामुळे जगभरातील साधक पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकतात. तुमचा त्याग हा आमच्या आध्यात्मिक वाटचालीचा पाया आहे.’ – सौ. श्वेता क्लार्क, फार्मागुडी, फोंडा, गोवा. (१७.५.२०१७) |