आमदार मुख्तार अन्सारी यांच्यासारखे अपराधी कायद्याचे निर्माते असणे, हा भारतीय लोकशाहीवरील डाग ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ

आमदार मुख्तार अन्सारी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारतीय लोकशाहीची शोकांतिका ही आहे की, आमदार मुख्तार अन्सारी यांच्यासारखे अपराधी येथे कायदा करणारे आहेत. हा भारतीय लोकशाहीवर डाग आहे, अशी टीका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने अन्सारी यांचा जामीन अर्ज फेटाळतांना केली. अन्सारी हे उत्तरप्रदेशातील ‘सुहेलदेव भारतीय समाज पक्षा’चे आमदार आहेत.

१. मुख्तार अन्सारी यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या ५६ गुन्ह्यांचा संदर्भ देत न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, लोकांच्या मनात आरोपीविषयी भीती आहे. (५६ गुन्हे असलेल्या व्यक्तीला जनता मत देते आणि ती निवडून येते, हे केवळ भारतातच घडू शकते ! याला ‘महान लोकशाही’ म्हणायचे का ?, असा प्रश्‍न पडतो. हे भारतियांना लज्जास्पद होय ! – संपादक) त्यामुळे अन्सारी किंवा त्यांचे समर्थक यांना आव्हान देण्याचे धाडस कुणी करत नाही. त्यामुळे आरोपी जामिनावर बाहेर येऊन पुरावे नष्ट करून साक्षीदारांवर दबाव आणू शकेल, अशी भीती फिर्यादी पक्षाला नाकारता येत नाही. (जे न्यायालयाच्या लक्षात येते, ते पोलिसांच्या आणि शासनकर्त्यांच्या लक्षात का येत नाहीत ? – संपादक)

२. २१ डिसेंबर २०१३ या दिवशी राज्यातील बाराबंकीच्या परिवहन विभागात डॉ. अलका राय यांच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे रुग्णवाहिका नोंदणीकृत करण्यात आली होती. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले, तेव्हा डॉ. अलका राय यांनी, ‘मुख्तार अन्सारी यांच्या लोकांनी माझ्याकडे काही कागदपत्रे आणली होती. भीतीपोटी आणि दबावाखाली मी त्यांच्यावर स्वाक्षरी केली’, हे मान्य केले.

३. या रुग्णवाहिकेचा वापर अवैध शस्त्रांसह मुख्तार अन्सारी यांच्या लोकांची ने-आण करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप आहे. (पोलीस अशा वेळी झोपलेले असतात कि लाच घेऊन दुर्लक्ष करतात ? – संपादक)

संपादकीय भूमिका

देशात असे शेकडो ‘डाग’ आहेत, पूर्वीही होते आणि पुढेही असतील, यात जनतेला शंका नाही ! ही स्थिती पालटायची असेल, तर मोठा संघर्ष करावा लागेल; मात्र त्यासाठी जनतेची सिद्धता नाही, ही वस्तूस्थिती आहे !