सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील काही विभाग प्राध्यापकांच्या अभावी बंद पडण्याच्या स्थितीत !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये अनुदानित पदांपैकी तब्बल ५६ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक विभाग प्राध्यापकांविना बंद करण्याची नामुष्की येत आहे. सध्या विद्यापिठामध्ये अनुदानित विभागात केवळ १४ प्राध्यापक  ३५ सहयोगी, तर साहाय्यक पदावर १२० प्राध्यापक कार्यरत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून विद्यापिठामध्ये प्राध्यापकांची भरती करण्यात आली नसल्याने ही स्थिती ओढावली आहे.

प्राध्यापकांची संख्या अल्प असल्याने प्राध्यापकांना एकापेक्षा अधिक विषय शिकवावे लागत आहेत. प्रयोगशाळेतील अनेक प्राध्यापक निवृत्त झाल्याने पर्यायी संशोधन किंवा काही विभाग बंद पडण्याची स्थिती निर्माण होत आहे. दोन विभागांना एकच प्राध्यापक असल्याचे दिसून येत आहे; तर काही विभागांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकच नाहीत; तर काही विभागांमध्ये प्राध्यापकच दिसून येत नाहीत. या संदर्भात प्र-कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, ‘‘संमत ३८४ पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त आहेत. प्राध्यापकांच्या भरतीला तातडीने प्राधान्य देत आहोत. शासनाच्या स्तरावर प्राध्यापकांच्या भरतीला अनुमती मिळावी म्हणून आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तातडीची आवश्यकता म्हणून विद्यापीठ निधीतून तात्पुरती प्राध्यापकांची भरती निकषांच्या आधारे करण्याचा आमचा विचार आहे.’’

संपादकीय भूमिका

इतकी वर्षे प्राध्यापकांची भरती होण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत, याविषयी कुलगुरूंनी सांगणे अपेक्षित आहे !

प्राध्यापकांच्या पुरेशा संख्येअभावी विद्यार्थ्यांची होणारी हानी आणि अन्य प्राध्यापकांवर येणार्‍या ताणामुळे त्यांची अन् विद्यार्थ्यांची होणारी हानी कोण भरून काढणार ?