मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनांना टाळे !
समस्या घेऊन येणार्या नागरिकांची गैरसोय !
श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई
मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे दालन वगळता अन्य सर्व मंत्र्यांच्या दालनांना टाळे लावण्यात आले आहे. राज्यातील विविध ठिकाणांहून तक्रारी किंवा निवेदने घेऊन येणार्या पीडितांच्या समस्या समजून घेण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. मागील २२ दिवसांपासून मंत्र्यांच्या दालनांना टाळे असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ३० जून या दिवशी पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पदभार स्वीकारला आहे; परंतु शासनाच्या विभागातील अन्य सर्व मंत्र्यांची दालने मागील २२ दिवसांपासून बंद आहेत.
मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे तक्रारी घेऊन येणार्या नागरिकांची संख्या न्यून आहे; परंतु येणार्या नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याची व्यवस्था सरकारकडून करणे अपेक्षित आहे. सरकारने मंत्रीमंडळाचा विस्तार केलेला नसला, तरी सर्व शासकीय व्यवस्थेचे दायित्व सरकारचे आहे.
कोरोना महामारीच्या कालावधीत सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेशबंदी असल्यामुळे मंत्रालयाच्या बाहेर नागरिकांच्या तक्रारी आणि निवेदने स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु सद्यस्थितीत सरकार स्थापनही होऊनही नागरिकांच्या तक्रारी आणि निवेदने स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील निवेदने स्वीकारण्याची व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे आणि मंत्र्यांची दालनेही बंद आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे.