रशिया-युक्रेन युद्ध संपता संपेना… !

‘२४ फेब्रुवारीपासून चालू झालेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला ५ मास उलटले, तरी ते संपतांना दिसत नाही, तसेच त्यावर काही तोडगाही निघतांना दिसत नाही. रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी युक्रेनला धमकी दिली की, तुम्ही क्रिमियावर आक्रमण केले, तर तिसर्‍या महायुद्धाला प्रारंभ होईल. आम्ही तुम्हाला पूर्णपणे नष्ट करू. त्याला प्रत्युत्तर देतांना युक्रेनच्या झेलेन्स्की यांनी सांगितले की, आता आमचे सैन्य अधिक आक्रमक झाले आहे आणि रशियाकडे गेलेला हा भाग आम्ही परत घेणार आहोत. तुर्कस्ताननेही धमकी दिली आहे. याविषयीचे विश्लेषण या लेखात पहाणार आहोत.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. युरोप आणि अमेरिका यांच्या साहाय्यावर युद्ध लढणारा युक्रेन युद्धात अधिक काळ तग धरण्याची शक्यता अल्प असणे

सैनिकीदृष्ट्या पाहिले, तर असे समजले जाते की, रशियाला लागून असलेल्या युक्रेनच्या १५ ते २० टक्के भागावर रशियाचे नियंत्रण आहे; परंतु रशियाला युक्रेनची राजधानी आणि अन्य मोठी शहरे कह्यात घ्यायची होती, ती घेता आलेली नाहीत. रशियाला युक्रेनचे वायूदल आणि नौदल तोडून त्यांची संपूर्ण किनारपट्टी घ्यायची होती, तसेच त्यांना शरणागतीही पत्करायला लावायची होती. यापैकी कोणतेही ध्येय साध्य झालेले नाही आणि ती साध्य होण्याची शक्यताही पुष्कळ अल्प आहे. युक्रेनने लढाई चांगल्या प्रकारे केली आहे; पण त्यांची पुष्कळ हानी झाली आहे. त्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सध्या त्यांना युरोप आणि अमेरिका यांच्याकडून मिळत असलेल्या साहाय्याच्या आधारे ते लढत आहेत. अशा बाहेरून मिळणार्‍या साहाय्यावर ते किती दिवस तग धरू शकतील ?

२. रशिया-युक्रेन युद्धाचे जगावर होणारे दुष्परिणाम

सध्या या युद्धाचे आर्थिकदृष्ट्या महाभयंकर परिणाम होत आहेत. युक्रेनची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. ‘रशियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल’, असे वाटत होते; पण तसे काही होतांना दिसत नाही. रशियाचे चलन ‘रुबेल’ हे अधिक प्रबळ झाले असल्याने त्याला आर्थिकदृष्ट्या हे युद्ध अधिक काळ चालवता येणार आहे. युरोप किंवा ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) यांच्या अर्थव्यवस्थेची स्थितीही वाईट होतांना दिसत आहे. त्यांचे चलन ‘युरो’चे मूल्य न्यून झाले आहे. तेथे महागाई वाढलेली आहे. अन्न आणि ऊर्जा यांची कमतरता निर्माण झालेली आहे. येत्या हिवाळ्यामध्ये रशियाकडून तेल आणि वायू (गॅस) मिळाला नाही, तर तेथील परिस्थिती भयानक होऊ शकते. रात्रीचे दिवे लावण्याचे टाळावेत, तसेच गॅसचा वापर अल्प करावा आदी सूचना तेथे देण्यात येत असल्याची विविध वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. या युद्धाचा युरोपच्या इंधन सुरक्षेवर मोठा परिणाम झाला आहे. युक्रेन हे युद्ध जिंकू शकेल, एवढे साहाय्य करण्याची क्षमता अमेरिकेतही नाही.

३. रशिया-युक्रेन युद्धाचे भारतावरील बरे-वाईट परिणाम

अ. जगात युद्ध चालू झाल्यामुळे भारतात अन्नधान्याच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे अन्नसुरक्षेवर परिणाम होत आहे.

आ. ‘डॉलर्स’च्या तुलनेत ‘रुपया’चे मूल्य घटले आहे. त्यामुळे इंधनाच्या किंमती, तसेच विदेशातील प्रवास महागणार आहे. त्यासाठी भारताला आयात-निर्यात यांमधील तफावत अल्प करावी लागेल.

इ. भारतीय अन्नधान्याला किंमत मिळत आहे. भारताने गहू आणि तांदूळ निर्यात करण्याचे ठरवले आहे. नुकतीच अर्थमंत्र्यांनी ‘डब्लूटीओ’कडे (जागतिक व्यापार संघटनेला) धान्याच्या निर्यातीची अनुमती मागितली आहे.

४. रशिया-युक्रेन युद्ध महायुद्धात परिवर्तित होईल का ? हे येणारा काळच सांगेल !

भारताने या युद्धात कुणाचीही बाजू न घेता राष्ट्रीय हित जपले पाहिजे, जे आपण जपत आहोत. भारताला रशियाकडून कच्चे तेल मिळते. त्यामुळे भारतात इंधनाच्या किंमती अधिक प्रमाणात वाढू न देण्यात सरकारला यश मिळत आहे. रशियावर बहिष्कार टाकण्यासाठी युरोप आणि अमेरिका भारतावर दबाव निर्माण करत होते; पण भारताने तो दबाव फेटाळून लावला. या युद्धाचा भारताला लाभ होत आहे; पण हे युद्ध महायुद्धात परिवर्तित होईल का ? हे येणारा काळच सांगेल. महायुद्ध करण्याची रशिया, युक्रेन किंवा अमेरिका आदी कुणाचीही क्षमता नाही, तरीही हे युद्ध निश्चितच लांबेल. त्यामुळे जगाची अधिक प्रमाणात हानी होईल. हे युद्ध थांबण्याची शक्यता पुष्कळ अल्प दिसत आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.