रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट
‘पूर्वी मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे महत्त्व ठाऊक असूनही अन् २ – ३ वेळा प्रक्रिया राबवूनही मी प्रक्रियेतील आनंद अनुभवला नव्हता. त्यामुळे माझ्या मनात प्रक्रियेविषयी एक प्रकारची उदासीनता होती. त्यानंतर गुरुकृपेने मला रामनाथी आश्रमरूपी वैकुंठात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याची संधी मिळाली.
१. ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाचा विसर पडणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यावर मनातील अयोग्य विचारांची जाणीव होऊन ‘प्रत्येक गोष्टीतून साधना व्हायला पाहिजे’, असे वाटणे
देवाच्या कृपेने मी पूर्णवेळ साधिका झाले; पण मध्यंतरी मला माझ्या ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाचा विसर पडला होता. त्यामुळे माझे मन व्यवहारातील लोकांप्रमाणे ‘स्वतःचे श्रेष्ठत्व, अधिकार, अपेक्षा, अनुभवाचा अहं’ इत्यादींमध्ये अडकायला लागले होते. आता रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यावर देवाच्या कृपेमुळेच मला माझ्या मनातील अयोग्य विचारांची जाणीव व्हायला लागली अन् माझ्या मनात योग्य विचार येऊ लागले. ‘माझ्यात इतके स्वभावदोष आणि अहं असूनही देवाने मला साधनेची संधी दिली आहे’, या विचाराने माझ्याकडून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होते आणि ‘प्रत्येक गोष्टीतून साधना व्हायला पाहिजे’, असे मला वाटते.
२. आढावासेविकेने योग्य दृष्टीकोन दिल्यावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयीचा दृष्टीकोन पालटून कृतज्ञता वाटणे
मी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात माझी चूक सांगत असतांना दुसर्या एका साधिकेने २ वेळा ‘तुम्ही प्रक्रिया राबवत आहात का ?’, असे सर्वांसमोर विचारल्यावर मला न्यूनता वाटली. ‘या सर्वांसमोर असे का विचारत आहेत ?’, अशी मला त्या साधिकेविषयी प्रतिक्रिया आली. आढावासेविकेने माझी विचारप्रक्रिया जाणून घेतली आणि माझ्या अंतर्मनावर प्रक्रियेचे महत्त्व बिंबवले. त्यामुळे प्रक्रियेविषयी माझा दृष्टीकोन पालटून माझे मन सकारात्मक झाले.
त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘प्रक्रियेमुळेच आपले मन शुद्ध होऊन आपल्याला देवापर्यंत जाता येते, आपण स्वतःला ओळखायला शिकतो, देवाला शरण जाता येते आणि ‘आनंदी कसे रहायचे ?’, ते शिकता येते. साधना, म्हणजे मनातल्या विचारांना योग्य दिशा देणे. आपल्या मनातल्या विचारांवर आपली साधना अवलंबून असते; म्हणून प्रत्येक वेळी आपण ‘आपले विचार साधनेला पूरक आहेत कि हानीकारक आहेत ?’, हे शोधायला पाहिजे.’ त्यानंतर मला आतून कृतज्ञता वाटत होती. मी माझ्या मनातील अयोग्य विचारप्रक्रियेविषयी देवाकडे क्षमायाचना केली.
३. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने स्वतःत जाणवलेले पालट
३ अ. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात मनातले विचार सांगून योग्य दृष्टीकोन मिळाल्यामुळे मला देवाविषयी कृतज्ञता आणि प्रेम वाटू लागले.
३ आ. आढावा झाल्यावर शिकण्यातला आनंद मिळून मला हलकेपणा जाणवत असे.
३ इ. स्वयंसूचना दिल्यावर सहसाधकांविषयीची मनातील नकारात्मकता उणावणे आणि साधनेतला आनंद मिळू लागणे : मी सहसाधकांविषयीच्या अयोग्य विचारांमुळे साधनेतील आनंद आणि मोकळेपणा गमावून बसले होते. प्रत्येक वेळी ‘मी देवाला अपेक्षित असे वागते का ?’, असा प्रश्न स्वतःला विचारल्यावर स्वतःची अयोग्य विचारप्रक्रिया देवाने लक्षात आणून दिली. त्यानुसार स्वयंसूचना दिल्यावर सहसाधकांविषयी जवळीक वाटायला लागली आणि अयोग्य विचारांची तीव्रता न्यून व्हायला लागली. मनातील नकारात्मकता उणावून मला साधनेतील आनंद मिळू लागला.
३ ई. अन्नपूर्णाकक्षामध्ये स्वतःकडून झालेल्या चुकांसाठी सर्वांसमोर स्वतःचे कान धरून क्षमायाचना केल्यावर मनाला हलकेपणा जाणवून हळूहळू प्रतिमा नष्ट होण्यास साहाय्य झाले.
३ उ. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी जाणीव करून दिल्यामुळे स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचे लिखाण करण्यातील अडथळा दूर होणे : पूर्वी स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचे लिखाण करण्यासाठी माझ्या मनाचा मोठा अडथळा होता. केवळ सद्गुरु अनुताई (सद्गुरु अनुराधा वाडेकर) आणि सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांच्या तळमळीमुळे आणि त्यांनी सतत जाणीव करून दिल्यामुळे माझा तो अडथळा दूर झाला.
४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यामुळे रक्तदाबाचा त्रास उणावणे
साधनेचे प्रयत्न चालू झाल्यानंतर माझा रक्तदाबाचा त्रास वाढला. त्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी सांगितलेला नामजप केल्याने माझी त्रास सहन करण्याची क्षमता वाढली. ते पुष्कळ आत्मीयतेने साधकांना नामजपादी उपाय सांगतात. त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळे माझा रक्तदाबाचा त्रास बर्याच प्रमाणात उणावला.
‘हे भगवंता, तुझ्या या अपार कृपेसाठी माझ्या मनात केवळ एकच शब्द आहे, तो म्हणजे कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता !’
– सौ. शर्मिला सतीश बांगर, ठाणे सेवाकेंद्र (२६.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |