बालपणापासूनच धार्मिकतेचे संस्कार झालेल्या लांजा (रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७७ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
१३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा झाली. त्यानिमित्त आपण गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. आज आपण लांजा (रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले यांचा साधनाप्रवास पाहू.
(भाग १)
१. बालपण आणि शिक्षण
१ अ. कुळ कायद्यात बरीचशी शेती गेल्याने बालपण सर्वसाधारण परिस्थितीत जाणे : ‘३०.१०.१९४४ या दिवशी माझा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावी झाला. आमची भरपूर शेती आणि मोठे घर होते. आम्हाला ‘इनामदार’ ही पदवी होती. आमचा गोठा जनावरांनी भरलेला होता; पण कुळ कायद्यात आमची बरीचशी शेती गेली आणि काही कारणाने राहिलेली बरीचशी शेती विकावी लागली. त्यामुळे माझे बालपण सर्वसाधारण परिस्थितीत गेले.
१ आ. घरचे वातावरण धार्मिक असल्याने लहानपणापासून धार्मिकतेचे संस्कार होणे : माझे वडील शिवभक्त होते आणि आईही श्रद्धाळू होती. माझी आजी हुशार होती. तिला झाडपाल्यांची औषधे ठाऊक होती. तिला ‘कोणत्या मंत्राने कोणता रोग बरा होतो ?’, याविषयी चांगले ठाऊक होते. तिच्याकडे ‘दृष्ट काढणे’ आणि ‘मंत्राने भारित करून गंडा देणे’, यांसाठी बरेच जण यायचे. आजी पहाटे ४ वाजता उठून सडा-रांगोळी करतांना, चूल पेटवतांना आणि लादी पुसतांना स्तोत्रे म्हणायची. त्यामुळे आम्ही आजीच्या समवेत पहाटे ४ वाजताच उठायचो. घरी पूजा करायला भटजी येत असत. आमच्या घरात मोठा देव्हारा आणि त्यात बरेच देव होते. पूजा झाल्यावर वैश्वदेव (घरी बनवलेले अन्न अग्नीला अर्पण करणे) इत्यादी करून जेवण होत असे. घरचे वातावरण धार्मिक असल्याने लहानपणापासून माझ्यावर धार्मिकतेचे संस्कार झाले.
१ इ. संतांविषयीचे चित्रपट पाहिल्यावर ‘त्यांच्यासारखे भक्त व्हावे’, असे वाटणे : आमच्या घरी गावात नवीन आलेले लोक, वारकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जेवायला येत असत. मला लहानपणापासूनच साधे रहाणीमान आवडत असे. संत जनाबाई, संत सखू आणि संत मीराबाई यांच्याविषयीचे चित्रपट पाहिल्यावर किंवा त्यांच्याविषयी पुस्तके वाचल्यावर ‘आपणही त्यांच्यासारखे भक्त व्हावे’, असे मला वाटे.
१ ई. शिक्षण : आमच्या गावी ११ वीपर्यंत शाळा होती. त्यामुळे माझे शिक्षण जुन्या ११ वीपर्यंत (मॅट्रिकपर्यंत) झाले. त्यानंतर माझी ५ वर्षे ‘वाचनालयातील पुस्तके वाचणे, प्रतिदिन रवळनाथाच्या (शंकराच्या) दर्शनाला जाणे, आईला घरकामात साहाय्य करणे, भरतकाम आणि शिवणकाम शिकणे’, यामध्ये गेली.
२. वैवाहिक जीवन
२ अ. सासरी गेल्यानंतर दीर आणि नणंदा यांनी बहिणीप्रमाणे प्रेम देणे : मला मोठ्या भावाने ((कै.) विठ्ठल आपटे यांनी) आणि बहिणीने ((कै.) लीला वालावलकर यांनी) पुण्यात आणले. त्यानंतर अनुमाने एक वर्षानंतर माझे लग्न झाले. वर्ष १९६८ मध्ये पुण्यातील गजानन गोखले यांच्याशी माझा विवाह झाला. माझ्या सासरी २ मोठ्या नणंदा ((कै.) विमल गोरे आणि (कै.) मंगला लिमये)) आणि ३ मोठे दीर ((कै.) मोहन गोखले, श्री. शाम गोखले (वय ८८ वर्षे) आणि श्री. अरविंद गोखले (वय ८० वर्षे)) होते. लग्नानंतर सर्वांनी मला प्रेम दिले. दीर आणि नणंदा मला मोठ्या भाऊ-बहिणीप्रमाणे वाटत असत.
२ आ. नणंदांनी काटकसरीने संसार करायला शिकवणे : मी माझ्या दोन्ही नणंदांकडे माझ्या लग्नानंतर प्रत्येकी एक वर्ष राहिले. ‘मला त्यांच्याकडून काटकसरीने संसार कसा करायचा ?’, हे शिकायला मिळाले.
२ इ. नणंदांच्या समवेत कीर्तन-प्रवचनाला गेल्यावर अध्यात्माची गोडी लागणे : माझ्या नणंदा मला कीर्तन-प्रवचनाला घेऊन जात असत. त्यामुळे मला अध्यात्माची गोडी लागली. त्या मला देवता आणि संत यांच्या गोष्टी सांगायच्या. त्यांच्यामुळेच मला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ठाऊक झाले.
२ ई. प्रत्येक २ – ३ वर्षांनी यजमानांची नोकरी जाणे, दुसरी नोकरी शोधणे कष्टदायी होणे; परंतु नंतर त्यांना चांगली नोकरी मिळणे : आम्हाला यजमानांच्या नोकरीनिमित्त वेगवेगळ्या गावी जावे लागले. लहानपणापासून मला मोठ्या परिवारात रहाण्याची सवय असल्यामुळे यजमानांच्या नोकरीच्या गावी रहायला जड गेले. मी, आमची २ मुले (श्री. पराग गोखले आणि श्री. योगेश गोखले) आणि यजमान, असे आम्ही चौघे जण राहू लागलो. यजमानांचा चांगला स्वभाव आणि दोन गोड मुले यांच्या सहवासात माझा वेळ मजेत जाऊ लागला. मी ‘आदर्श संसार करायचा’, असे ठरवले; पण संसारात पुष्कळ अडचणी येत होत्या. प्रत्येक २ – ३ वर्षांनी यजमानांची नोकरी जायची. पुन्हा दुसरी नोकरी शोधणे पुष्कळ कष्टदायी व्हायचे. त्यातच मुलांची आणि आमची दुखणी असायची. अशी ७ – ८ वर्षे गेली आणि त्यानंतर यजमानांना चांगली नोकरी मिळाली.
३. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यापूर्वी केलेली साधना
३ अ. २० वर्षे श्रीरामाचे नामस्मरण करणे आणि प्रतिदिन ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने वाचणे : मला रक्तदाबाचा त्रास चालू झाला. तेव्हा आमचे आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘प्रतिदिन ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे एक प्रवचन वाचा.’’ तेव्हा ‘देवानेच त्यांच्या रूपाने मला हे सांगितले’, असे समजून मी प्रतिदिन एक प्रवचन वाचू लागले. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावर माझी पुष्कळ श्रद्धा होती. मी जमेल, तेव्हा गोंदवले येथे जात असे. अशा प्रकारे माझ्याकडून देवाने २० वर्षे श्रीरामाचे नामस्मरण आणि महाराजांच्या प्रवचनांचे वाचन करवून घेतले. मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनाच माझ्या मनातले सर्व सांगायचे आणि ‘ते माझ्या सुख-दुःखात मला साहाय्य करत आहेत’, असे मला जाणवायचे.’
(क्रमशः)
– गुरुदेवांच्या चरणांची धूळ,
(पू.) श्रीमती माया गोखले, लांजा, रत्नागिरी. (१३.४.२०२२)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/599249.html |