श्वसनसंस्थेच्या विकारांमध्ये उपयुक्त आयुर्वेदातील काही औषधे
१. सितोपलादी चूर्ण
आयुर्वेदामध्ये राजयक्ष्मासारख्या गंभीर रोगांमध्ये श्वसनसंस्थेतील दूषित कफ बाहेर काढणे, शरिरातील अग्नीचे दीपन करणे (पचनशक्ती सुधारणे) आणि सर्व शरिराला बळ देणे यांसाठी हे औषध वापरले जाते. ‘राजयक्ष्मा’ या रोगामध्ये सर्व शरीर क्षीण होत जाते. खोकला, तसेच ताप ही लक्षणेही असतात. आधुनिक काळातील क्षयरोगामध्ये यातील काही लक्षणे आढळतात. त्यामुळे क्षयरोगामध्येही शरिराला शक्ती देण्यासाठी हे औषध वापरता येते. अर्धा ते एक चमचा औषध दिवसातून २ वेळा मध आणि तूप यांतून द्यावे. खोकल्यातून प्रत्येक वेळी कफ पडत असल्यास तुपाच्या दुप्पट मध घ्यावा. खोकला कोरडा असल्यास किंवा पोटात जळजळ होत असल्यास मधाच्या दुप्पट तूप घ्यावे. (मध आणि तूप हे कधीही समान प्रमाणात घेऊ नये.)
१ अ. खोकला आणि जुनाट ताप : श्वसनमार्गातून सुरळीतपणे दूषित कफ बाहेर काढणे आणि आवश्यक असा चांगला कफ निर्माण करणे, हे कार्य या औषधाच्या सेवनाने होते. साधारण १ आठवडा हे औषध घ्यावे.
१ आ. क्षय (शरीर क्षीण होणे) आणि रक्तज कास (रक्तदोषामुळे येणारा खोकला) : अन्य औषधांसह सितोपलादी चूर्णही १ ते ३ मास घ्यावे. यासह १ – १ चिमूट प्रवाळ पिष्टी घेतल्यास चांगला लाभ होतो.
१ इ. मंदाग्नी (पचनशक्ती मंद होणे किंवा खाल्लेले न पचणे) आणि अरुची (तोंडाला चव नसणे) : दोन्ही वेळा जेवणाच्या १५ मिनिटांपूर्वी घ्यावे. केवळ चूर्ण चघळून खाल्ले तरी चालते.
१ ई. उरोदाह (घशात आणि छातीत पित्तामुळे जळजळ होणे) : त्रास होतो त्या वेळेस पाव चमचा चूर्ण आणि २ चिमूट प्रवाळ पिष्टी यांचे मिश्रण चघळून खावे.
१ उ. गर्भवती स्त्रियांसाठी उपयुक्त : गर्भवतींच्या खोकल्यामध्ये हे उपयुक्त आहे. यासह होणारे बाळ सशक्त, तेजस्वी आणि बुद्धीमान होण्यास साहाय्य व्हावे, यासाठी प्रवाळ भस्म २ चिमूट अन् सितोपलादी चूर्ण पाव चमचा हे मिश्रण २ चमचे तूप आणि १ चमचा मध यांच्या मिश्रणातून ६ – ७ मास प्रतिदिन २ वेळा घ्यावे. हे औषध चालू करण्यापूर्वी वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.
१ ऊ. बाळाची हाडे बळकट होण्यासाठी, तसेच बाळ सशक्त होण्यासाठी : २ चिमूट सितोपलादी चूर्ण आणि १ चिमूट प्रवाळ भस्म यांचे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा तूप आणि पाव चमचा मध यांच्या मिश्रणातून दीर्घ काळ (३ ते ६ मास) द्यावे. यापूर्वी वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.
२. चंद्रामृत रस (गोळ्या)
कोणत्याही प्रकारच्या खोकल्यामध्ये वापरू शकतो, असे हे औषध आहे. १ – २ गोळ्या दिवसातून २ – ३ वेळा ५ ते ७ दिवस घ्याव्यात. गोळ्यांचे चूर्ण मधात मिसळून चघळून खाल्ल्यास अधिक लाभ होतो. खोकला येत असतांना १ – २ गोळ्या नुसत्याच चघळून खाल्ल्या तरी चालतात.
३. शृंगाराभ्र रस (गोळ्या)
आयुर्वेदामध्ये अभ्रक भस्म हे सर्व शरीरघटकांना पोषण पुरवणारे औषध म्हणून प्रसिद्ध आहे. शृंगाराभ्र रस या औषधामध्ये अभ्रक भस्म हा मुख्य घटक असल्याने हे औषधही शरीरघटकांना पोषण देण्यास उपयुक्त आहे. विशेषतः श्वसनसंस्थेला बळ देणारे हे औषध आहे. सकाळ – सायंकाळ एकेका गोळीचे चूर्ण मधासह चाटून खावे.
३ अ. श्वसनसंस्थेच्या सर्व विकारांमध्ये श्वसनसंस्थेला बळ देण्यासाठी उपयुक्त : १५ दिवस ते १ मास औषध घ्यावे.
३ आ. आम्लपित्त आणि पण्डुरोग : इतर औषधांसह हे औषध घेतल्यास त्या त्या शरीर अवयवांना शक्ती मिळून हे रोग लवकर बरे होण्यास साहाय्य होते. १५ दिवस ते १ मास औषध घ्यावे.
औषधे स्वतःच्या मनाने न घेता वैद्यांच्या मार्गदर्शनानुसारच घ्यायला हवीत; परंतु काही वेळा वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे आयुर्वेदाची काही औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे. |
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०२२)