दुर्ग (छत्तीसगड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. शर्वरी हेमंत कानस्कर (वय १५ वर्षे) हिने अनुभवलेली गुरुकृपा !
१. निरपेक्ष राहून प्रार्थना केल्यावर आलेली अनुभूती
१ अ. परीक्षेपूर्वी ‘गुरुदेवांना अपेक्षित असे होऊ दे आणि ते स्वीकारता येऊ दे’ अशी प्रार्थना होणे : ‘पूर्वी परीक्षा चालू होण्यापूर्वी मी नेहमीप्रमाणे स्वेच्छेनुसार होण्यासाठी प्रार्थना करत होते; पण आता माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी पुढील प्रार्थना होते, ‘गुरुदेव, तुमची इच्छा आणि केवळ योग्य असेल, तेच होऊ दे अन् मला ते स्वीकारता येऊ दे.’
१ आ. देवाने ‘कोणता अभ्यास करायला हवा ?’, हे सुचवणे आणि त्यानुसार अभ्यास केल्यावर चांगले गुण मिळणे : परीक्षेच्या वेळी माझा अभ्यास पूर्ण झाला नव्हता; पण गुरुकृपेने ‘मी कोणता अभ्यास करायला हवा ?’, हे मला आतून कळायचे आणि त्यानुसार मी अभ्यास करायचे. प्रत्यक्षात गुरुकृपेने मी केलेल्या अभ्यासावरच परीक्षेत प्रश्न आल्यामुळे मला सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिता आली. त्यामुळे कोणतीही अपेक्षा नसतांनाही ईश्वराच्या अपार कृपेमुळे मला इयत्ता नववीत ७१ टक्के गुण मिळून मी चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले.
२. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत असलेले कार्य आवडल्यामुळे शाळेतून मिळालेले सहकार्य आणि झालेले कौतुक !
२ अ. शाळेच्या मुख्याध्यापकांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधनाचे कार्य आवडणे अन् त्यांनी ‘सर्वतोपरी साहाय्य करू’, असे आश्वासन करणे : सध्या मी इयत्ता दहावीचे शिक्षण घेत आहे. मला नृत्याविषयी संशोधन करण्यासाठी शाळेतून सुटी पाहिजे होती; म्हणून मी आणि बाबा (श्री. हेमंत कानस्कर, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), आम्ही दोघे माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटायला गेलो. आम्ही त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनाच्या कार्याविषयी सांगितल्यावर त्यांना ते आवडले. त्यांनी मला लगेच सुटी दिली. ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुम्हाला आमच्याकडून शक्य तेवढे साहाय्य करू.’’
२ आ. शाळेतील मैत्रिणीने केलेले सहकार्य ! : शाळेतील माझी एक मैत्रीण स्वतः माझ्याकडे येऊन मला म्हणाली, ‘‘या काळात शाळेत शिकवत असलेल्या अभ्यासाची तू काळजी करू नकोस. मी तुला त्याची छापील प्रत काढून पाठवून देईन.’’
‘शाळेचे मुख्याध्यापक आणि मैत्रीण यांनी मला साहाय्य केले. हे सर्व गुरुदेवांचे नियोजन होते आणि ही त्यांनी माझ्यावर केलेली अपार कृपाच आहे’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !
२ इ. अभ्यास आणि नृत्यातील संशोधन हे दोन्ही करत असल्यामुळे शाळेतील शिक्षकांनी कौतुक करणे : एकदा अकस्मात् आमच्या वर्गात एक शिक्षक आले आणि मला म्हणाले, ‘‘तू शर्वरी ना ?’’ मी त्यांना ‘हो’ म्हणाले. तेव्हा ते आमचा वर्ग घेत असलेल्या शिक्षिकेला म्हणाले, ‘‘तुम्ही हिला ओळखता का ? ही आपल्या शाळेची ‘स्टार’ विद्यार्थिनी आहे. ही गोव्याला जाऊन नृत्याविषयीच्या संशोधनाच्या कार्यात सहभागी असते. ती अभ्यास आणि नृत्यातील संशोधन हे दोन्ही करत आहे.’’
२ ई. शिक्षकांनी कौतुक केल्यावर ‘अहं वाढू देऊ नका आणि ईश्वराने केलेल्या कृपेसाठी त्याच्या चरणी कृतज्ञ रहाता येऊ दे’, अशी गुरुदेवांना प्रार्थना करणे : शिक्षकांनी ‘ही आपल्या शाळेची ‘स्टार’ विद्यार्थिनी आहे’, असे सांगितल्यावर मला ईश्वराप्रती कृतज्ञता वाटली. त्या क्षणी देवाच्या कृपेने माझ्याकडून पुढील प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेवा, शिक्षकांनी कौतुक केल्यावर माझ्या मनात अहंच्या विचारांची धूळ येऊ देऊ नका. कौतुक केवळ ईश्वराच्या गुणांचेच होऊ शकते. ईश्वराने माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मला त्याच्या चरणी सतत कृतज्ञ रहाता येऊ दे.’
२ उ. शाळेतील सर्वांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे नृत्यातील संशोधनाचे कार्य सांगितल्यावर पुष्कळ कौतुक वाटून त्यांनी साहाय्य करणे : आधी मी ‘गोव्याला जाते’, असे सांगितल्यावर शाळेतील सर्वांच्या मनात ‘गोवा म्हणजे समुद्रकिनारे !’, असे विचार असायचे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधनाचे कार्य सांगितल्यावर त्यांना पुष्कळ कौतुक वाटले. आता मला शाळेतील सगळे साहाय्य करतात. ही केवळ गुरुदेवांची कृपा आहे.
‘भगवंत सर्वत्र असून तो मला सदैव साहाय्य करतो’, याची देवाने मला अनुभूती दिली’, याबद्दल त्याच्या चरणी कृतज्ञता !’
– गुरुदेवांची, कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.४.२०२२ )
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |