गोपालन केंद्र हटवून ती जागा नगरपालिकेने आरक्षित करू नये ! – सुनील पावसकर, अध्यक्ष, गोरक्षण बचाव समिती
कराड येथील गोरक्षण बचाव समितीच्या वतीने मुख्याधिकार्यांना निवेदन !
कराड – ‘श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट’च्या वतीने १०० वर्षांहून अधिक काळ असलेले गोपालनाचे सेवाकार्य यापुढेही असेच चालू रहावे, अशी समस्त गोप्रेमींची भावना आहे. या ठिकाणी पुन्हा आरक्षणाच्या हालचाली चालू झाल्याचे वृत्तपत्रातून समजत आहे. महाराष्ट्र शासनाने कराड नगरपालिकेला संबंधित जागा गोरक्षणासाठी मिळावी, यासाठी पत्र पाठवले होते; परंतु नगरपालिकेने याविषयी आम्हाला अंधारात ठेवून कोणतीही माहिती अद्यापपर्यंत दिलेली नाही. तरी या ठिकाणचे गोपालन केंद्र हटवून त्या जागेवर आरक्षणाची कोणतीही कारवाई नगरपालिकेने करू नये आणि त्या ठिकाणी गोरक्षणाचेच आरक्षण असावे, या मागणीचे निवेदन १९ जुलै या दिवशी कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना देण्यात आले.
या वेळी राष्ट्रीय गोरक्षा वाहिनी, गोसेवा संघ, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रसाद साळुंखे, गोरक्षा समितीचे सुनील पावसकर, अश्विन शहा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. रवींद्र डोंबे, हिंदु जनजागृती समितीचे मदन सावंत, तसेच सनातन संस्था, इस्कॉन आदी संस्थांचे साधक, स्थानिक व्यापारी, गोरक्षक आणि गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.