सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या प्रवचनाचे वृत्त देण्यासाठी संभाजीनगर येथील दैनिक ‘लोकमत’च्या कार्यालयात गेल्यावर आलेली अनुभूती
‘जानेवारी १९९७ मध्ये मी प.पू. गुरुदेवांना दूरभाष केला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपल्याला अध्यात्मप्रसार करायचा आहे. तुमच्या साहाय्याला श्री. दिलीप आठलेकर आणि अधिवक्ता रामदास केसरकर (सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) येतील. ‘लातूर पॅटर्न’सारखा (त्या वेळी लातूर येथील मुले दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने येत असत.) ‘आठलेकर पॅटर्न’ (पुष्कळ अध्यात्मप्रसार) करायचा आहे. तेव्हा या आठवड्यात त्यांच्या प्रवचनाचे अधिकाधिक ठिकाणी आयोजन करा. त्यांच्या समवेत पुष्कळ साधक येतील. त्यांचेही नियोजन करायचे आहे.’’ त्यानुसार सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या प्रवचनांविषयी वृत्त देण्यासाठी दैनिक ‘लोकमत’च्या कार्यालयात जाण्याचे ठरले. त्या वेळी मला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
१. साधिकेच्या समवेत दैनिक ‘लोकमत’च्या कार्यालयात जाऊन त्या वृत्तपत्रातील ‘आजचे कार्यक्रम’ या सदरात छापण्यासाठी वृत्त देणे
मी माझ्या धाकट्या मुलाकडून प्रवचनाचे वृत्त लिहून घेतले; पण ‘मी ते पुढे पाठवले कि नाही ?’, हे माझ्या लक्षात राहिले नाही; परंतु दैनिक ‘लोकमत’च्या कार्यालयात वृत्त द्यायला कुणीच उपलब्ध नव्हते. दुपारी माझ्या लक्षात आल्यावर ‘काय करावे ?’, ते मला सुचेना. मी एका साधिकेला (सौ. रिता सावरिया यांना (आताची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)) घेऊन संध्याकाळी दैनिक ‘लोकमत’च्या ‘आजचे कार्यक्रम’ या सदरात छापण्यासाठी वृत्त द्यायला गेले.
२. दैनिक ‘लोकमत’च्या कार्यालयातून परत येतांना तेथे काम करणार्या एका व्यक्तीची अकस्मात् भेट होणे आणि त्यांनी ‘कुणीतरी आधीच वृत्त दिले आहे’, असे सांगणे
आम्ही घरी जाण्यासाठी दैनिक ‘लोकमत’च्या कार्यालयाजवळील बसच्या थांब्यावर उभे राहिलो. तेव्हा एक गृहस्थ आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही वृत्त द्यायला आला होतात का ? कसले वृत्त आहे ? मी याच कार्यालयात असतो.’’ आम्ही त्यांना सांगितले, ‘‘सनातन संस्थेच्या प्रवचनांविषयी वृत्त आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘अहो, हे वृत्त दुपारीच माझ्याकडे आले.’’ मी त्यांना ‘कुणी दिले ?’, असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘एक वृद्ध व्यक्ती आली होती. ती देऊन गेली. मी ते छापायलाही दिले आहे. ते आमच्या २ आवृत्यांमध्ये छापून येईल.’’
३. त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला काही समजेना. आमच्या अंगावर रोमांच आले. मला वाटले, ‘प.पू. भक्तराज महाराज, तर आले नसतील ना ?’
४. त्या गृहस्थांनी त्यानंतर प्रत्येक प्रवचनाचे वृत्त दूरभाषवरच घेणे
तेवढ्यात ते गृहस्थ मला म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही किती लांबून आलात ! तुम्ही माझा दूरभाष क्रमांक घ्या. माझे नाव पाटोळे. यापुढे तुम्ही वृत्त देण्यासाठी कार्यालयात येऊ नका. तुम्ही मला दूरभाषवरच माहिती सांगत जा. मी लगेच लिहून घेईन आणि छापायला देईन.’’ त्यांनी त्यांच्या विभागाचा संपर्क क्रमांक दिला.
अशा प्रकारे देवाने लीला केली की, त्यानंतर मला खरोखरच वृत्त द्यायला जावे लागले नाही. ते प्रत्येक प्रवचनाचे वृत्त दूरभाषवरच घ्यायचे आणि त्यांच्या दैनिकात छापायचे.
‘देवा, तू अशा अनेक लीला आम्हाला अनुभवायला दिल्यास ! देव किती सर्वव्यापी, सर्वशक्तीमान आणि सर्वसाक्षी आहे ! देवा, मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती जयश्री मुळे (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |