‘हळद’ या पिकाची लागवड कशी करावी ?
कृषी विचार
हळदीची योग्य वेळी लागवड, सुधारित वाणाचा (जातींचा) वापर, सेंद्रिय खतांचा भरपूर वापर, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास निश्चितच शेतकर्यांना हळदीचे भरघोस उत्पन्न मिळण्यास साहाय्य होईल.
१. हवामान
हळद हे उष्ण कटिबंधीय वातावरणात घेतले जाणारे महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे. हळद हे वाळवलेले कंद, तसेच मृदकाष्ठीय झाड आहे. हळदीचे उगमस्थान आग्नेय आशिया हे आहे. हळदीचा वापर मसाला, तसेच औषधे आणि सौंदर्यप्रसाधने यांमध्ये होतो. भारतात हळदीखालील क्षेत्र १ लाख ७२ सहस्र हेक्टर (१ हेक्टर म्हणजे अडीच एकर) आणि उत्पादन ८ लाख ५१ सहस्र ७०० टन इतके आहे. भारतात आंध्रप्रदेश हे राज्य हळदीच्या उत्पादनात अग्रेसर आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, ओडिशा, केरळ, कर्नाटक आणि बिहार या राज्यांतही हळदीचे पीक घेतले जाते. पावसाच्या सर्व भूप्रदेशांमध्ये हे पीक घेतले जाते.
२. भूमी
उत्तम निचर्याची, मध्यम काळी, नदीकाठची पोयटा माती हळदीसाठी अतीउत्तम आहे. चुनखडीयुक्त आणि चोपण भूमी टाळावी.
३. पूर्वमशागत
हळद हे भूमीत वाढणारे खोड आहे. त्यामुळे भूमी जितकी भुसभुशीत, तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते. त्यासाठी भूमी उभी-आडवी २ ते ३ वेळा १८ ते २२ सें.मी. खोल नांगरून घ्यावी. पहिली नांगरणी मार्चमध्ये करावी. भूमी १५ ते २० दिवस उन्हात तापू द्यावी. त्यानंतर दुसरी नांगरणी करून आणि ढेकळे फोडून २५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत मिसळून घ्यावे. (गोमय उपलब्ध असल्यास त्याचाही उपयोग करू शकतो.) एक-दोन कुळवाच्या पाळ्या देऊन इतर पिकांचे अवशेष आणि धसकटे वेचून भूमी स्वच्छ करावी. काही ठिकाणी मेंढ्याही बसवतात.
४. हंगाम आणि लागवडपद्धती
४ अ. हंगाम : हळदीची लागवड अक्षय्य तृतीयेपासून म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे मासाच्या शेवटपर्यंत करणे आवश्यक आहे. उशिरात उशिरा हळदीची लागवड जून मासाच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. हळदीच्या लागणीस विलंब झाल्यास त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येतो.
४ आ. लागवड पद्धती : हळदीची लागवड दोन पद्धतींनी केली जाते.
४ आ १. सरी-वरंबा पद्धत : या पद्धतीने हळद लागवड करण्यासाठी ७५ सें.मी. अंतरावर सर्या पाडाव्यात. सरीच्या दोन्ही बाजूस दोन गड्ड्यांमध्ये ३० सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी.
४ आ २. रुंद-वरंबा पद्धत (गादी वाफे पद्धत) : या पद्धतीने लागवड करायची झाल्यास १.५ मीटर अंतरावर सर्या पाडाव्यात, म्हणजे दोन सर्यांच्या मध्ये ९० सें.मी. ते १ मीटरचा गादी वाफा सिद्ध होतो. या गादीच्या वाफ्यावर किंवा रुंद वरंब्यावर दोन ओळीतील आणि दोन झाडांतील अंतर ३० सें.मी. इतके ठेवून लागवड केली जाते; मात्र या पद्धतीत भूमी समपातळीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे वाफ्यांना सोडलेले पाणी व्यवस्थित देता येते आणि उत्पादनही चांगले येण्यास साहाय्य होते. रुंद वरंबा पद्धतीमध्ये रान बांधणी करून काही ठिकाणी उत्पादन अधिक घेता येते.
५. हळद बेण्याची निवड आणि बीजप्रक्रिया
हळदीची लागवड करण्यासाठी बेणे (कंद) निवडण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते. प्रत्येक जेठा (मुख्य कोंब) गड्ड्यावर ८ ते १० कोंब असतात. लागवडीसाठी वापरण्यात येणारे बेणे जून किंवा डोळे फुटलेले ४० ग्रॅम वजनाचे आणि मुळ्याविरहीत असावे. नासके आणि कुजके गड्डे बियाण्यासाठी वापरू नयेत. लागवडीपूर्व किडींचा आणि बुरशीजन्य रोगजंतूचा नाश करण्याचे दृष्टीने बीजप्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ‘क्विनॉलफॉस’ २५ टक्के प्रवाही २० मि.ली. + १० ग्रॅम ‘कार्बेन्डेझिम’ १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण सिद्ध करावे. या द्रावणात बियाणे न्यूनतम १५ ते २० मिनिटे बुडवून घेऊन ते सावलीत सुकवावे आणि मग लागवडीसाठी वापरावे. हेक्टरी साधारणपणे २५ ते ३० क्विंटल बियाणे लागते.
५ अ. हळदीचे सुधारित वाण (जाती) : फुले स्वरूपा, सेलम, कृष्णा, टेकूरपेटा, राजापुरी, आंबेहळद (औषधी) आणि काळी हळद (तांत्रिक विधीसाठी)
६. खते आणि पाणी व्यवस्थापन
हळद पिकासाठी सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करावा. भूमीच्या प्रकारानुसार हेक्टरी २५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी देऊन मातीत चांगले मिसळावे. कोकण किनारपट्टीसाठी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. किनारपट्टी सोडून उर्वरित भागांसाठी २०० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश प्रत्येकी १०० किलो प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीपूर्वी द्यावे अन् नत्र खताची मात्रा २ किंवा ३ हप्त्यांत विभागून लागवडीपासून दीड, तीन आणि साडेचार मासांनी द्यावे. हळदीच्या ओळीलगत चर घेऊन त्यात खत टाकून मातीने झाकून घ्यावे आणि नंतर पाणी देण्यात यावे. तसेच दोन टन निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर भरणीच्या वेळी करावा आणि थिमेट २० किलोग्रॅम प्रति हेक्टरी जुलै, ऑगस्ट अन् सप्टेंबर या कालावधीत झाडाच्या बुंध्याजवळ टाकावे. पावसाळ्यात पडणारा पाऊस आणि भूमीतील ओल लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार वेळोवेळी ७-८ दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. हळद हे बागायती पीक आहे. हळदीला वेळेवर पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यानंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने भूमीच्या प्रकारानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
७. आंतरपिके
हळद + श्रावण घेवडा, हळद + मुळा, हळद + पालेभाज्या (राजगिरा, तांबडा माठ, मेथी), हळद + मिरची इत्यादी
८. आंतरमशागत
आवश्यकतेनुसार २ ते ३ वेळा खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. ३ मासांनी गड्ड्यांना सरीतील माती उकरून भर द्यावी.
९. पीक संरक्षण
हळदीवर पडणार्या करपा आणि ठिपके रोगांच्या नियंत्रणासाठी ‘कॉपरऑक्झिक्लोराईड’ २.५ ग्रॅम किंवा ‘बाविसस्टिन’ २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून रोगाची लक्षण दिसतात त्या भागात फवारावे आणि नंतर १५ ते २० दिवसांनी फवारावे.
१०. काढणी
हळदीचे पीक ८.५ ते ९ मासांत सिद्ध होते. गड्डे पक्व झाल्यावर हळदीची पाने पिवळी पडून सुकू लागतात आणि भूमीवर लोळतात. काढणीच्या अगोदर १५ दिवस पिकास पाणी देणे बंद करावे. वाळलेला पाला भूमीलगत विळ्याने कापून घ्यावा. भूमीत योग्य ओल असतांनाच हळदीचे कंद कुदळीने खणून काढावेत. काढणीच्या वेळी गड्ड्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. हळदीचे जेठे गड्डे आणि हळकुंडे वेगळी करावीत. जेठे गड्डे पुढील वर्षी बियाणासाठी सावलीत ढिग करून साठवावेत.
११. हळदीवरील प्रक्रिया तंत्रज्ञान
११ अ. हळद शिजवणे : हळद लोखंडी कढई किंवा काईल यांमध्ये शिजवली जाते. सर्वसाधारणपणे दोन क्विंटल ओली हळद बसेल, या क्षमतेपासून ८ ते १० क्विंटल हळद मावणार्या कढया किंवा लोखंडी काईल उपलब्ध असतात. या कढईत हळद भरून त्यावर ५ ते ८ सें.मी. पाणी राहील इतके पाणी आणि हळदीचा पाला घालून गोणपाटाने झाकून घ्यावे. यामुळे अल्प वेळ आणि इंधन यांत हळद शिजवता येते. हळद शिजण्यास दीड ते २ घंटे लागतात. हळद शिजली आहे का ? हे ओळखण्यासाठी तुरीची काडी हळकुंडात घुसवल्यास ती लगेच आरपार जाते.
हळद शिजवण्याची आणखी एक नवीन पद्धत आहे. तेलाच्या बॅरलचे सच्छिद्र ड्रम सिद्ध करून त्यामध्ये हळद भरून मूळच्या कढईत पाणी टाकावे. उकळत्या पाण्यात हे ड्रम ठेवून हळद शिजवली असता ती योग्य प्रकारे शिजते. यात अल्प वेळ, मनुष्यबळ आणि इंधन लागते. अशा मालास चकाकी येते. परिणामी बाजारभावही चांगला मिळतो. अशा पद्धतीचा वापर केल्यास अल्प वेळेत हळद व्यवस्थित शिजवली जाते आणि कामगार, श्रम अन् इंधन यांचा अपव्यय टाळता येतो.
११ आ. वाळवणे : शिजवलेली हळद ही चांगल्या कठीण फरशीच्या किंवा सिमेंट-काँक्रिटच्या खळ्यावर वाळवावी लागते. (हळद वाळवण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिकचा कागदसुद्धा वापरता येतो.) हळद चांगली वाळण्यास १० ते १५ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. हळद वाळवतांना ती पावसात भिजणार नाही किंवा दव आणि धुके यांमुळे ओली होणार नाही, याची काळजी घ्यावी.
११ इ. हळद पॉलिश करणे आणि त्याविषयीची प्रक्रिया : शिजवून आणि वाळवून सिद्ध झालेली हळद आपण विक्रीसाठी पाठवू शकत नाही; कारण ती आकर्षक दिसत नाही. हळकुंडावरील साल आणि माती यांचा थर काही अंशी हळकुंडावर बसलेला असतो. त्यामुळे हळद कठीण पृष्ठभागावर घासावी लागते. त्यानंतर हळकुंडावरील साल आणि मातीचे काही कण निघून जाऊन हळकुंड गुळगुळीत होते. त्याला चकाकी आणि पिवळेपणा येतो. त्यामुळे हळद आकर्षक दिसते. अशा मालास चांगला बाजारभाव मिळतो. यासाठी हळदीला पॉलिश करणे आवश्यक असते. हळद अल्प असल्यास हातात गोणपाट घेऊन पॉलिश केले जाते. जास्त हळद असल्यास पाण्याच्या बॅरलचा ड्रम सिद्ध करून, त्याला सर्वत्र छिद्रे पाडून, स्टँड आणि कणा बसवून त्याचा उपयोग पॉलिशसाठी करता येतो. याच तत्त्वावर मोठे डबे सिद्ध करून ते इलेक्ट्रिक मोटरवर फिरवून हळदीचे पॉलिश व्यापारी तत्त्वावर करून मिळते. हळद पॉलिश केल्यानंतर ती विक्रीसाठी सिद्ध होते किंवा तिची पावडर करून अर्धा ते एक किलोग्रॅमच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून विक्रीही करता येते.
१२. हळदीचे उत्पन्न
सुधारित तंत्रानुसार लागवड केल्यास ओल्या हळदीचे हेक्टरी २५० ते ३५० क्विंटल आणि वाळलेल्या हळदीचे ६० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते.
१३. हळदीचे ‘प्रो ट्रे’ (रोपांची लागवड करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे ट्रे) रोपवाटिका आणि उत्पादन तंत्रज्ञान
या पद्धतीमध्ये एक डोळ्याची रोपे सिद्ध करून हळदीची लागवड केली जाते. त्यामुळे बियाणे अल्प लागते आणि उत्पादन खर्चही अल्प करता येतो.
१३ अ. एक डोळा पद्धतीचे लाभ
१. लागवडीसाठी अल्प बियाणे लागते.
२. हेक्टरी खर्चही अल्प येतो.
३. पीक अधिक प्रमाणात जगते.
४. कंद लवकर (३ मासांत) निर्माण होतात.
५. चांगल्या प्रतीचे कंद उत्पादित होतात.
६. सिद्ध रोपे गादीवाफा किंवा सरी वरंब्यावर लावता येतात.
७. लागवडीचा कालावधी वाढवणे शक्य आहे.
८. ताज्या कंदाचे उत्पादन हे साधारण कंदाच्या सरासरी २५ टक्क्यांनी अधिक मिळते.
१३ आ. कंद लागवडीची प्रक्रिया
१. कंद प्रक्रिया (१ ते १.५ मास) काढणीनंतर
२. कंद प्रक्रिया (कॉबॅन्डेझिम २ ग्रॅम + मोनोक्रोटोफॉस २ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात १५ ते २० मिनिटे या द्रावणात बुडवून काढावेत आणि सुकवून घ्यावेत.)
३. कंद एक डोळा ठेवून कापणे. (५-६ ग्रॅम वजन).
४. एक डोळा असलेले कंद नारळाच्या झावळ्यांवर वाळवावे.
५. एक डोळा असलेले कंद कोकोपीटमध्ये (मातीला पर्याय म्हणून नारळाच्या शेंड्यांपासून बनवले जाणारे एक नैसर्गिक माध्यम) झाकावे.
६. वाफ्यावर (४ दिवस) पाणी शिंपडावे.
७. कोंब आलेले कंद प्रो ट्रे मध्ये लावावे.
८. कोकोपीट/१००ग्रॅम + सुडोमोनास फ्लुरोसन्स ५ ग्रॅम घालावे.
९. प्रो ट्रे प्लास्टिक पेपरने (७ दिवस) आच्छादित करावेत.
१०. फुटलेल्या काेंबाचे निरीक्षण करावे. प्रो ट्रे ५० टक्के सावलीत ठेवून नियमित पाणी द्यावे.
११. फुटवे आल्यानंतर ०.५ टक्के ‘ह्युमिक ॲसिड’ फवारावे. रोपे पूर्ण लागवडीसाठी ३० ते ३५ दिवसांनी सिद्ध होतात.
संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), एम्.एस्सी. (ॲग्रिकल्चर), पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०२२)