सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेने प्रवासात मुलाने केलेल्या छेडछाडीच्या प्रसंगाला क्षात्रवृत्तीने सामोरे जाऊन पोलिसांच्या साहाय्याने त्याला धडा शिकवणार्या पुणे येथील कु. वैष्णवी देशपांडे !
१. सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात येतांना बरेच अडथळे येणे
‘मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पहिल्यांदाच सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात येण्याची संधी मिळाली. आश्रमात येतांना मला बरेच अडथळे आले. आरंभी मला रेल्वेचे तिकीट मिळत नव्हते आणि जेव्हा मिळाले, तेव्हा ते ३ वेळा रहित करावे लागले. माझी रामनाथी आश्रमात येण्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेली श्रद्धा यांमुळे त्यांनीच मला दिशा दाखवली अन् मला खासगी गाडीचे (ट्रॅव्हल्सचे) तिकीट मिळाले. मी निघतांना ‘प.पू. डॉक्टर आपल्या समवेत आहेत’, असा भाव ठेवला होता.
२. गाडीतील एका मुलाने त्रास देण्याचा प्रयत्न करणे आणि समजावून सांगूनही न ऐकल्याने असुरक्षित वाटणे
मी गाडीत बसले आणि गाडी गोव्याकडे निघाली. त्यानंतर गाडी जेवणासाठी थोडा वेळ थांबली; म्हणून मी पाणी घेण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्या वेळी ‘एक मुलगा मला त्रास देत आहे’, असे माझ्या लक्षात आले. तो मुलगा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला; म्हणून मी त्याला एक – दोनदा समजावून सांगितले, ‘‘मी त्या पद्धतीची मुलगी नाही, तरी तू मला त्रास देऊ नकोस’’; पण तो मुलगा ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. मी गाडीतून उतरल्यावर तो माझ्याकडे, ‘तुझा भ्रमणभाष क्रमांक दे’, असे म्हणू लागला. तेव्हा मला पुष्कळ असुरक्षित वाटत होते.
३. परात्पर गुरुदेवांना आळवल्यावर घरी भ्रमणभाष करण्याचे सुचणे आणि त्यांनी सांगितल्यानुसार पोलिसांच्या १०० या क्रमांकावर संपर्क करणे
मी माझ्या अंतर्मनाला सांगत होते, ‘आपण वैकुंठाला निघालो आहोत. रामनाथी आश्रम, म्हणजे साक्षात् वैकुंठ आहे.’ त्यानंतर मी प.पू. डॉक्टरांना आणि श्रीकृष्णाला आळवले. तेव्हा मला वाटले, ‘घरी भ्रमणभाष करून विचारावे, ‘मी अशा परिस्थितीत काय करू शकते ?’ त्याप्रमाणे मी घरी भ्रमणभाष करून घरच्यांना सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा माझ्या आतेभावाने सांगितले, ‘‘तू १०० क्रमांकावर भ्रमणभाष कर आणि घडलेली सर्व परिस्थिती सांग.’’ मी पुन्हा एकदा त्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. मी त्याला म्हणाले, ‘‘मी तुझे नाव पोलिसांना सांगेन. तू तुझे हे वागणे बंद कर.’’ तेव्हा तो मुलगा म्हणाला, ‘‘मी पोलिसांना घाबरत नाही.’’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘हा मुलगा ऐकण्याच्या स्थितीत नाही’; म्हणून मी माझ्या जागेवर जाऊन बसले आणि गाडी निघाली. गाडी चालू झाल्यावर मी १०० क्रमांकावर भ्रमणभाष लावला आणि पोलिसांना सर्व परिस्थिती सांगितली.
४. पोलिसांनी गाडीजवळ येऊन त्रास देणार्या मुलाला मारणे आणि समवेत घेऊन जाणे अन् साधिकेने क्षात्रवृत्ती दाखवल्याबद्दल तिचे कौतुक करणे
त्यानंतर १० मिनिटांत पोलीस गाडीजवळ आले. त्यांनी आमची गाडी थांबवली आणि म्हणाले, ‘‘या गाडीतून आम्हाला एका मुलीचा भ्रमणभाष आला होता.’’ तेव्हा मी गाडीच्या बाहेर आले आणि म्हणाले, ‘‘काका, मी भ्रमणभाष केला होता.’’ मी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांच्या समवेत एक महिला पोलीसही होती. त्या पोलिसांनी त्या मुलाला गाडीच्या बाहेर आणले आणि ‘एकट्या मुलीला पाहून त्रास देतोस का ?’, असे त्या मुलाला ओरडले. मी त्या महिला पोलिसाला सांगितले, ‘‘या मुलाला मी २ – ३ वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलिसांनाही सांगेन असे म्हणाले; पण तो ‘पोलिसांना घाबरत नाही’, असे मला म्हणाला.’’ हे ऐकून त्या महिला पोलिसांनी त्याला पुष्कळ मारले आणि मला जवळ बोलावून म्हटले, ‘‘तू आता या मुलाच्या कानाखाली मार.’’ तेव्हा मी त्या मुलाला मारले. त्यानंतर त्या मुलाला त्याच्या चुकीची जाणीव होऊन तो रडू लागला अन् विनंती करू लागला, ‘‘मला सोडून द्या. माझ्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही.’’ त्या मुलाला आपल्या चुकीची जाणीव व्हावी आणि त्याने पुन्हा अशी चूक करू नये; म्हणून पोलीस त्याला तेथून घेऊन गेले. या प्रसंगातून इतर प्रवाशांनाही शिकायला मिळाले. पोलिसांनी मला शाबासकी दिली आणि म्हणाले, ‘‘तू न घाबरता भ्रमणभाष केलास. तुझी ही कृती धाडसाची आहे.’’ त्यांनी माझे पुष्कळ कौतुकही केले.
‘प्रवासात घडणार्या अशा प्रसंगांना क्षात्रवृत्तीने सामोरे जायला हवे’, हे मला शिकायला मिळाले. त्यासाठी मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. वैष्णवी अनिरुद्ध देशपांडे, पुणे (१.७.२०२२)