परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बंधू डॉ. विलास आठवले यांनी दिलेल्या (त्यांच्या संत आई-वडिलांनी उपयोगात आणलेल्या) जुन्या ‘फर्निचर’मधून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचे बालपण ज्या घरात व्यतीत केले, तेथील जुने फर्निचर (पटल, आसंद्या, कपाट, पलंग इत्यादी साहित्य. यातील काही साहित्य लाकडाचे अन् काही लोखंडाचे आहे.) त्यांचे बंधू डॉ. विलास आठवले यांनी वर्ष २०२१ मध्ये सनातनच्या आश्रमात पाठवले. या साहित्यामध्ये चैतन्य असल्याचे त्याच्या सूक्ष्मातील स्पंदनांवरून लक्षात आले.
या साहित्याची (पटल, आसंद्या, कपाट, पलंग इत्यादी वस्तूंची) ‘यू.ए.एस्. (युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. तुलनेसाठी म्हणून सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातील फर्निचरचीही निरीक्षणे करण्यात आली.
१. डॉ. विलास आठवले यांनी दिलेल्या साहित्यामध्ये पुष्कळ चैतन्य असणे
या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. यातील काही निवडक वस्तूंतील सकारात्मक ऊर्जेची निरीक्षणे पुढे दिली आहेत.
१ अ. डॉ. विलास आठवले यांनी दिलेल्या साहित्यामध्ये पुष्कळ चैतन्य असण्याचे कारण : सामान्यतः वस्तू जुन्या झाल्या की त्यांकडे पाहून चांगले वाटत नाही. डॉ. विलास आठवले यांनी दिलेले साहित्य पुष्कळ जुने असूनही त्यांकडे पाहून चैतन्य जाणवते. याचे कारण हे की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आई-वडीलही संत होते. संतांमध्ये पुष्कळ चैतन्य असते. संतांकडून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होते. संतपद प्राप्त केलेल्या आई-वडिलांमधील चैतन्याचा सकारात्मक परिणाम त्यांनी वापरलेल्या वस्तूंवर (फर्निचरवर) होऊन त्या वस्तू चैतन्याने भारित झाल्या. विशेष म्हणजे इतक्या वर्षांनंतरही त्यांतील चैतन्य टिकून आहे.
२. सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातील फर्निचरमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा असणे
सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातील फर्निचरमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा आहे. यातील काही निवडक वस्तूंतील नकारात्मक ऊर्जेची निरीक्षणे पुढे दिली आहेत.
२ अ. सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातील फर्निचरमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा असण्याचे कारण : कलियुगात सर्वसामान्य व्यक्तीमध्ये रज-तमाचे प्रमाण अधिक आहे. समाजातील बहुतांश लोक साधना करत नाहीत. तसेच बहुतेकांना अल्प-अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तीमध्ये सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अत्यल्प आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक आढळते. या चाचणीतील सर्वसामान्य व्यक्तीला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. तिच्यातील त्रासदायक स्पंदनांचा परिणाम तिने वापरलेल्या साहित्यावर होऊन ते नकारात्मक स्पंदनांनी भारित झाले. त्यामुळे तिच्या घरातील साहित्यामध्ये सकारात्मक ऊर्जा नसून नकारात्मक ऊर्जा आढळली.
व्यक्ती साधना करू लागली की, तिच्यातील रज-तमाचे प्रमाण घटून तिच्यातील सत्त्वगुण वाढू लागतो. जसजशी तिची साधना वाढते, तसतसे तिच्यामध्ये चैतन्य निर्माण होते. याचा चांगला परिणाम तिचा देह, तिची वास्तू, तिच्या वापरातील वस्तू यांवर होऊन तेही चैतन्याने भारित होतात. कालांतराने तिची आध्यात्मिक उन्नती होऊन ती जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटते. हे लक्षात घेऊन सर्वांनी साधनेस आरंभ करा !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.४.२०२२)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |