दिघा येथील माजी नगरसेवक नवीन गवते आणि अपर्णा गवते यांचा भाजपमध्ये प्रवेश !
नवी मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – दिघा विभागातील माजी नगरसेवक नवीन गवते आणि अपर्णा गवते यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी ऐरोली विधानसभेचे माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी गणेश नाईक म्हणाले, ‘‘नवीन गवते यांना विशिष्ट परिस्थितीत पक्ष सोडवा लागला, तरी ते मनाने आमच्यासमवेत होते. गवते हे संदीप नाईक यांच्या संपर्कात होते. सरकारकडे पाठपुरावा करून आपण दिघा येथील प्रलंबित प्रश्न सोडवू.’’
संदीप नाईक म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीत कामे होत नसल्याने गवते यांची घुसमट होत होती. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये पुन्हा येण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नगरसेवकासमवेत सुसंवाद ठेवून काम करू.’’ नवीन गवते म्हणाले की, सर्व घटकांचा विकास करण्याची भाजपची भूमिका असल्याने पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार संदीप नाईक यांनी नेहमी आधार दिल्यामुळे मी दिघा विभागात १५० कोटी रुपयांची विकासकामे करू शकलो.