शास्त्रोक्त आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच देवीच्या मूर्ती संवर्धनाचे कार्य हाती !
सप्तश्रृृंंगी निवासिनी देवी मंदिराच्या विश्वस्त मंडळाची माहिती
नाशिक – उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तश्रृंगी निवासिनी जगदंबेच्या मुख्य मंदिरातील मूर्ती संवर्धनाचे कार्य हे पूर्णतः कायदेशीर गोष्टी पार पाडून, शास्त्रोक्त पद्धतीने, तसेच पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसारच हाती घेण्यात आले आहे, असा दावा मंदिराच्या विश्वस्त मंडळाने नुकताच प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. संवर्धनाचा कालावधी २१ जुलै ते ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत निश्चित केला आहे. या कालावधीत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले, तरी पहिली पायरी येथे पर्यायी दर्शनव्यवस्था म्हणून श्री भगवतीची प्रतिकृती ठेण्यात येणार आहे. भक्तनिवास आणि महाप्रसाद यांच्यासह इतर सुविधा सुरळीत चालू रहाणार आहेत, असे येथील विश्वस्त मंडळाने म्हटले आहे.
१. अतीप्राचीन स्वरूप असलेल्या मूर्तीवर वर्षानुवर्षे शेंदूर लेपन चालू असून आजपावेतो प्राप्त संदर्भानुसार वज्रलेख अथवा इतर प्रकारांत तिचे संवर्धन झाल्याचे तपशील उपलब्ध नाहीत.
२. नैसर्गिक वातावरण आणि डोंगरकपारीतून मंदिरात झिरपणारे पाणी यांमुळे मूर्तीच्या काही भागांत क्षती पोचल्याचे लक्षात येताच पुजार्यांनी विश्वस्तांना याची माहिती दिली.
३. तत्कालीन विश्वस्त मंडळाने भारतीय आणि राज्य पुरातत्व विभागाचे सहकार्य घेऊन संबंधित संस्थांकडून मार्गदर्शन मागवले. विश्वस्त संस्था आणि जिल्हा प्रशासन यांनी तज्ञांना वर्ष २०१४ मध्ये प्रत्यक्ष श्री भगवतीच्या मूर्ती परीक्षणासाठी पाचारण केले.
४. पुरातत्व विभाग आणि आयआयटी, पवई यांनी संयुक्तिक क्षेत्रभेट देऊन झालेल्या निरीक्षणाचा अहवाल विश्वस्त मंडळाकडे सादर केला. वर्ष २०२० मध्ये याच संस्थांनी पुन्हा प्रत्यक्ष पहाणी करून विश्वस्त मंडळाला अहवाल सादर केला.
५. विश्वस्त मंडळाने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, धर्मादाय आयुक्त, जिल्हा परिषद प्रशासन, ग्रामस्थ, पुजारी, स्थानिक व्यापारी, महंत आणि धार्मिक संस्था यांसह मूर्ती संवाद संवर्धन समितीच्या संयुक्तिक सभेत वरील निर्णय घेतला. वाराणसी येथील धर्ममार्तंड गणेश्वरशास्त्री यांच्यासह नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाकडून धार्मिक विधी समजावून घेत मूर्ती संवर्धनाची प्रक्रिया चालू केली आहे. भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.