गर्व से कहो…!

संपादकीय 

‘इस्रो’चे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ नंबी नारायणन्

भारताची ‘हिंदु राष्ट्र’ ही दैदिप्यमान ओळख पुसल्यानंतर आता हिंदु धर्मियांचीही ‘हिंदु’ ही ओळख पुसण्याचे षड्यंत्र चालू आहे. भारताची ‘हिंदु राष्ट्र’ ही ओळख पुसणारे मोगल आणि इंग्रज आक्रमक होते, तर हिंदूंची ‘हिंदु’ ही ओळख पुसण्यासाठी त्या आक्रमकांची पिलावळ असलेले काँग्रेसवाले, पुरो(अधो)गामी, साम्यवादी, धर्मांध आदी अहोरात्र कार्यरत आहेत. याचीच प्रचीती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (‘इस्रो’चे) माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांच्या जीवनावर आधारित ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आली. या चित्रपटात त्यांना पूजाविधी करतांना दाखवण्यात आले आहे. त्यावरून चित्रपट समीक्षकांनी टीका केली आहे. त्यांना उत्तर देतांना नंबी नारायणन् म्हणाले, ‘‘मी हिंदु आहे आणि मला हे सांगण्याची लाज वाटत नाही. हिंदु असणे, हे पाप आहे का ? मी हिंदु असल्याने चित्रपटात मला हिंदु दाखवण्यात आले आहे. मला मुसलमान किंवा ख्रिस्ती दाखवता येऊ शकत नाही.’’ नंबी नारायणन् यांनी दिलेले रोखठोक प्रत्युत्तर प्रत्येक हिंदूसाठी प्रेरणादायी आहे.

समीक्षकांचा हिंदुद्रोह !

खरे तर कुठल्याही समीक्षकाने तटस्थ राहून समीक्षण केले पाहिजे. समोर आलेल्या कुठल्याही गोष्टींचे, मग ते पुस्तक असो, साहित्य असो किंवा चित्रपट असो, त्यांचे वस्तूनिष्ठ मूल्यमापन केले पाहिजे. त्यासाठी तटस्थतेची दृष्टी समीक्षकांमध्ये असणे आवश्यक असते. दुर्दैवाने आज हिंदु धर्म, हिंदू, देवता, संत, राष्ट्रपुरुष, परंपरा आदींकडे हिंदुद्वेषी चष्म्यातून बघितले जाते. या मंडळींचा हिंदु धर्माविषयी प्रचंड आकस, द्वेष आणि पूर्वग्रह दिसून येतो. हा द्वेष केवळ हिंदु धर्मापुरताच मर्यादित असल्याचे आढळून येते; कारण इस्लाम आणि ख्रिस्ती यांच्या विरोधात ही मंडळी कधी ‘ब्र’ही काढतांना दिसत नाहीत. एवढेच काय चित्रपट, कादंबरी आदींमधील अश्लीलताही त्यांना चालते. त्यांची समीक्षक बुद्धी केवळ हिंदु धर्माच्या विरोधात तल्लख असते; म्हणूनच तर अशा लोकांना चित्रपटातही नंबी नारायणन् यांनी पूजाविधी करणे नको असते आणि ते त्यावर आक्षेप घेतात. भारतीय चित्रपटसृष्टीत असे असंख्य चित्रपट असतील, ज्यांत कलाकारांना नमाजपठण करतांना किंवा चर्चमध्ये प्रार्थना करतांना दाखवले गेले आहे; परंतु याविषयी ही मंडळी चिडीचूप असतात. हे चालते; पण पूजविधी नाही, हा समीक्षकांचा हिंदुद्वेषच नव्हे का ? चित्रपटांत दाखवण्यात येणार्‍या लव्ह जिहादच्या प्रकरणीही ही मंडळी मूग गिळून गप्प बसतात. एकूणच सदैव हिंदूंचे दमन करणार्‍या अशा फुटकळ समीक्षकांच्या हिंदुद्वेषी समीक्षणाला महत्त्व देण्याची अजिबात आवश्यकता नाही. ‘हाती चले अपनी चाल, भौंके कुत्ते हजार’, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.

‘इस्रो’ला विद्वान शास्त्रज्ञांची एक मोठी परंपरा लाभली आहे. यांतील अनेक शास्त्रज्ञ आस्तिक आहेत; म्हणूनच तर ‘इस्रो’चे यान पाठवण्यापूर्वी श्री बालाजीसमोर अनेकदा त्याची प्रतिकृती ठेवली जात असल्याचे आपण सर्वांनी ऐकले किंवा वाचले असेल. हेच हिंदुद्वेष्ट्यांना खटकणारे आहे. त्यामुळे ‘शास्त्रज्ञांना आणि पर्यायाने ‘इस्रो’ला अपकीर्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साखळीच कार्यरत आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. याच नंबी नारायणन् यांच्यावर ‘इस्रो’तील हेरगिरीप्रकरणी ठपका ठेवून त्यांना अटक करण्यात आली होती. कालांतराने न्यायालयात त्यांचे निर्दाेषत्व सिद्ध झाले. तथापि यामध्ये नंबी नारायणन् यांच्या प्रतिमेची आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची ‘इस्रो’ची जी हानी झाली, ती कोण भरून देणार ? नारायणन् यांना ज्या श्रीकुमार नावाच्या पोलीस अधिकार्‍याने अडकवले, तो आता गुजरात दंगलीच्या प्रकरणी कारागृहाची हवा खात आहे. यावरून या षड्यंत्राची व्यापकता लक्षात यावी. अशा वेळी नंबी नारायणन् यांच्यामागे उभे रहाणे, हे केवळ एका व्यक्तीच्या मागे उभे रहाणे नसून सज्जनांना सतावणार्‍या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात उभे रहाणे आहे. नारायणन् यांनी त्यांच्यावरील चित्रपटाच्या निमित्ताने मांडलेले परखड मत समस्त हिंदूंना पुष्कळ काही शिकवणारे आहे. ‘गर्व से कहो हम हिन्दू है ।’ ही आतापर्यंत घोषणा होती; पण गेल्या काही वर्षांत तसे वातावरण प्रत्यक्ष निर्माण होतांना दिसत आहे. याचेच हे उदाहरण आहे. हा कालमहिमा आहे; कारण संतांनी सांगितले आहे की, हिंदु राष्ट्र येणार आहे. ‘अशा घटना ही त्या दिशेने पडणारी पावले आहेत’, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये !

सर्व क्षेत्रांतील हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयी अभिमान निर्माण होणे, हा काळाचा महिमाच !