पुष्कळ शारीरिक वेदना होत असतांनाही कसलेही गार्‍हाणे न करता शांतपणे मृत्यूला सामोरे जाणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. महादेव बाबुराव जगताप (वय ८९ वर्षे) !

१. गुरुमाऊलींच्या कृपेने कोरोना महामारीच्या कालावधीत कुटुंबियांसाठी औषधोपचार आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय मिळणे

कै. महादेव जगताप

‘गुरुमाऊलींची कृपा आम्हा कुटुंबियांवर अखंड आहे’, हे या कोरोना महामारीच्या काळात मला अनुभवायला मिळाले. घरी आम्ही सगळे एका पाठोपाठ आजारी पडलो होतो; पण गुरुमाऊलींची एवढी कृपा होती की, आम्हाला औषधे घरपोच मिळत होती. भ्रमणभाषवर साधक आधुनिक वैद्यांना संपर्क करताच आम्हाला सर्व उपचार आणि त्याच समवेत आश्रमातून आध्यात्मिक स्तरावरील उपायही कळत होते. औषधे, आध्यात्मिक उपाय आणि ‘इंद्राक्षी स्तोत्र’ ऐकणे यांमुळे आमचा ताप लगेच उतरत होता.

२. वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करणे, औषधोपचार आणि आध्यात्मिक उपाय केल्यावर त्यांना घरी सोडणे

याच कालावधीत माझ्या वडिलांनाही (वय ८९ वर्षे) ताप आला. त्यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याचे कळले. वडिलांची प्राणवायूची पातळी बरी होती; पण त्यांचे डोळे उघडत नव्हते. आम्ही वडिलांना गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात घेऊन गेलो. ते बेशुद्धावस्थेत असल्यामुळे माझ्या मनात विचार आले, ‘या कोरोनाच्या स्थितीत वडिलांचा मृत्यू झाला, तर त्यांचे अंत्यविधी करता येणार नाहीत. तसे होऊ नये’, यासाठी देवाच्या चरणी प्रार्थना केली. दुसर्‍या दिवशी वडील उठून बसले; पण पुन्हा तिसर्‍या दिवशी त्यांची प्रकृती बिघडली; मात्र त्यांची प्राणवायूची पातळी सामान्य (नॉर्मल) होती. त्यानंतर ५ दिवसांनी आधुनिक वैद्यांनी त्यांना रुग्णालयातून सोडले.

३. मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्यामुळे वडील पुन्हा रुग्णाईत होणे

दोन दिवसांनी वडिलांना पुन्हा ताप आला; म्हणून त्यांना एका रुग्णालयात नेले. तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘त्यांच्या मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्यामुळे त्यांना स्मृतीभ्रंश होऊन ते ‘कोमा’मध्ये गेल्यासारखी स्थिती आहे.’’ त्यामुळे त्यांना अन्नासाठी नळी, कॅथेटर (Catheter) (मूत्र नैसर्गिक रित्या होत नसल्याने मूत्राशयात लावलेली लवचिक नळी) आणि ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ (Oxygen Concentrator) (रुग्णाला वातावरणातील प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठी घरातही वापरू शकतो, असे यंत्र) लावावे लागले. रुग्णालयात १२ – १३ दिवस ठेवूनही त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती.

४. वडिलांना पुष्कळ शारीरिक वेदनाहोऊनही त्यांनी कसलेही गार्‍हाणे न करणे

श्री. जयवंत जगताप

या रुग्णालयात पंख्याची व्यवस्था नीट नसल्यामुळे बाबांची पाठ आणि कंबर यांठिकाणी ‘बेड सोर’ (Bed Sore) (शय्याव्रण) झाले अन् त्या जखमा चिघळून त्यांतून रक्त येऊ लागले. त्यामुळे त्यांना पाठीवर झोपता येत नव्हते. अशा स्थितीतही ते वेदनेने कधी कळवळले किंवा ओरडले नाहीत. जखमा स्वच्छ करतांना त्यांच्या डोळ्यांतून पाणी यायचे आणि शरीर थरथरायचे. त्यांना एवढ्या वेदना होत असूनही ते कसलेही गार्‍हाणे करायचे नाहीत. त्यानंतर १ आठवड्याने बाबांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांच्या प्राणवायूची पातळी सामान्य झाली. त्यानंतर आम्ही ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ परत केला.

५. वडील अत्यवस्थ असतांनाही घरातील वातावरण शांत असणे

आमच्या शेजारचे एक गृहस्थ २ वेळा बाबांना भेटायला घरी आले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमच्या घरी एक रुग्णाईत व्यक्ती आहे’, असे जाणवतच नाही. कसलाही आवाज, त्रास किंवा दुर्गंधही नाही. घरचे वातावरण अगदी शांत आहे.’’

६. वडिलांना होणार्‍या असह्य वेदना !

बाबांना लावलेली अन्नाची नळी आणि ‘कॅथेटर’ प्रत्येक मासाला पालटावा लागे. अन्नासाठी नळी बसवतांना त्यांना पुष्कळ त्रास व्हायचा. एकदा तर रक्तही आले; पण बाबांनी थोडाही आरडा-ओरडा केला नाही. केवळ त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले. त्यांची सहनशक्ती फार होती. बाबांना १९.९.२०२१ या दिवशी रात्री ९.३० वाजता उचकी लागली आणि ते दीर्घ श्वास घेऊ लागले.

७. १९.९.२०२१ या दिवशी वडिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागणे, त्यांना गंगाजल पाजल्यानंतर काही वेळाने त्यांचा त्रास वाढणे, नंतर त्यांनी साधकाच्या खांद्यावरच शांतपणे प्राणत्याग करणे

मी, माझी पत्नी आणि मुलगा शुभम् तेथेच त्यांच्याशी बोलत होतो. रात्री १० वाजता ते जोरजोराने श्वास घेऊ लागले; म्हणून त्यांची प्राणवायूची पातळी तपासली. आधुनिक वैद्यांना विचारून घेतले. रात्री ११ वाजता सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपायही विचारले. त्यांनी ‘ॐ’ चा नामजप १ घंटा करायला सांगितला. मी नामजप करत असतांना मला ‘त्यांचा त्रास न्यून होत नाही’, असे वाटले. माझ्या पत्नीला बाबांच्या विशुद्धचक्राकडे काहीतरी येऊन अडकत असल्यासारखे वाटू लागले. नंतर आम्ही (पत्नी, मी आणि शुभम्) त्यांना गंगाजल पाजले. पत्नी आणि शुभम् त्यांना कुलदेवी अन् श्री गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांची आठवण करून देत होते. रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी त्यांना पुष्कळ त्रास होऊ लागला; म्हणून मी त्यांना बसवण्यासाठी वर केले. तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावरच प्राण सोडला. एवढ्या त्रासातही त्यांनी कसलाच आवाज केला नाही. ते एकदम शांत होते. ते गेल्यानंतर त्यांच्या शांत तोंडवळ्यावर एक निश्चिंतता दिसत होती.

८. सनातन पाठशाळेचे पुरोहित अंतिम विधी भावपूर्ण करतांना चैतन्य अनुभवणे

सनातन पाठशाळेचे पुरोहित आले होते. त्यांनी सगळे विधी अत्यंत भावपूर्ण केले. विधी चालू असतांना पुष्कळ चैतन्य अनुभवायला मिळत होते.

श्री गुरूंनी आमच्याकडून बाबांची सेवा शेवटपर्यंत करवून घेतली. याविषयी कोटीशः कृतज्ञता.’

– श्री. जयवंत जगताप, फोंडा, गोवा. (२.११.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक