अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने केली होमी जहांगीर भाभा आणि लाल बहादूर शास्त्री यांची हत्या !
|
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतीय परमाणू कार्यक्रमाचे जनक असलेले होमी जहांगीर भाभा आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची हत्या अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’ने केली, असा दावा वर्ष २०१३ मध्ये प्रकाशित एका पुस्तकातून करण्यात आला होता. ‘सीआयए’चे माजी अधिकारी रॉबर्ट क्राउले यांच्या कबूलीजबाबांवर आधारित या पुस्तकात ‘भाभा आणि शास्त्री यांची हत्या करण्यात आली होती’, असे सांगण्यात आले आहे. हे पुस्तक ग्रेगोरी डगलस यांनी लिहिले आहे. हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या दोघांच्या हत्येचे नव्याने अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक माध्यमांतून करण्यात येत आहे.
‘सीआयए’ने घडवून आणला होमी भाभा यांचा विमान अपघात !
रॉबर्ट क्राउले यांनी होमी जहांगीर भाभा यांना ‘जोकर’ संबोधून ‘ते अमेरिकेसाठी अत्यंत धोकादायक होते’, असे या पुस्तकात म्हटले आहे. पुस्तकात लिहिले आहे की, भाभा एक गोप्रेमी असले, तरी ते भारताला परमाणू शक्ती बनवण्यासाठी कटीबद्ध होते. ते म्हणत, ‘भारताला परमाणू शक्ती होण्यापासून कुणी रोखू शकत नाही’ ते आमची समस्या वाढवण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रियाच्या विएन्ना येथे जात होते. तेव्हा त्यांच्या ‘७०७’ या विमानाचा स्फोट झाला. ‘अॅल्प्स’च्या पर्वतरांगांमध्ये त्यांचे विमान उडवण्यात आले. भाभा यांचा मृत्यू २४ जानेवारी १९६६ मध्ये झाला.
माजी पंतप्रधान शास्त्री यांचा मृत्यू !
रॉबर्ट क्राउले यांनी माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्यूवरही भाष्य केले. ते म्हणाले की, लाल बहादुर शास्त्री हे आणखी एक गोप्रेमी होते. भारतातून भाताची शेती नष्ट करण्यासाठी ‘सीआयए’ने एक रोग निर्माण केला होता. भात हे भारतियांचे मुख्य अन्न असून रोगाच्या माध्यमातून भाताची शेती नष्ट करण्यासाठी सीआयए प्रयत्नशील होती. भाभा एक बुद्धीमान व्यक्ती होते आणि शास्त्री त्यांचे काम सोपे करत होते. त्यामुळेच ‘सीआयए’ने त्यांचा काटा काढला. क्राउले यांनी दोघांना त्यांच्या देशासाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर झालेल्या विषप्रयोगात त्यांचा ११ जानेवारी १९६६ या दिवशी उज्बेकिस्तानमधील ताश्कंद येथे मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकाकेंद्रातील भाजप सरकारने याचे अन्वेषण करून सत्य जनतेसमोर आणावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! |