चीनने डोकलामजवळ भूतानमध्ये घुसखोरी करून वसवले नवे गाव !
नवी देहली – चीनने लडाखच्या सीमेवरील डोकलामपासून ९ किमी दूर अमो चू खोर्यात गाव वसवले आहे. भूतानच्या परिसरात असलेल्या या गावाला चीनने ‘पंगडा’ असे नाव दिले आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये या गावाच्या बांधकामाची उपग्रहाद्वारे काढण्यात आलेली छायाचित्रे समोर आली होती आणि आता हे गाव लोकांनी भरले आहे. जवळपास प्रत्येक घरासमोर गाड्या दिसत आहेत. पंगडाजवळील एक रस्ता चीनने भूतानच्या भूमीवर अवैध नियंत्रण मिळवून बांधला आहे. हा रस्ता वेगाने वहाणार्या अमो चू नदीच्या काठावर असून तो भूतानच्या आत १० किमी आहे. डोकलाममध्येच चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात झटापट झाली होती.
China’s Doklam designs exposed; Provokes India with new village | Satellite pics pic.twitter.com/UHn9wIB73H
— Hindustan Times (@htTweets) July 20, 2022
ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा भारत आणि चीन यांच्यामध्ये पूर्वेकडील लडाखमधील तणाव न्यून करण्यासाठी चर्चेच्या १६ फेर्या झाल्या आहेत; मात्र त्यानंतरही लक्षणीय परिणाम दिसून आलेला नाही. दुसरीकडे चीन भूतानच्या भूभागाचे तुकडे करत आहे; परंतु भूतान त्याला रोखू शकत नाही. भूतानचे भारतातील राजदूत मेजर जनरल व्हेटसॉप नामग्याल यांनी अमो चू खोर्यात चीनच्या बांधकामांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
भारतावर होणारा परिणाम !
या गावामुळे आणि रस्त्यामुळे चिनी सैन्य सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या डोकलाम पठारावर सहज पोचू शकते. याद्वारे चीन भारताच्या संवेदनशील सिलीगुडी महामार्गावर सहज प्रवेश करू शकतो. सिलीगुडी महामार्ग ईशान्येकडील राज्यांना देशाच्या इतर भागांशी जोडतो. चिनी व्यवहारतज्ञ डॉ. ब्रह्म चेलानी म्हणाले की, चीन भूतानच्या भागात बांधकामे करून भारताविरुद्ध सैन्यक्षमता भक्कम करत आहे.
संपादकीय भूमिकाभूतानच्या संरक्षणाचे दायित्व भारताकडे असतांना चीन भूतानमध्ये घुसखोरी करतो आणि भारत काहीही करत नाही, हे लज्जास्पद ! |