काँग्रेस सरकारच्या निष्क्रीयतेमुळे एका संतांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न !

  • भरतपूर (राजस्थान) येथे अवैध उत्खनन प्रकरणी ५५० दिवसांपासून साधू, संत आणि गावकरी यांचे आंदोलन !

  • मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रियांका वाड्रा यांना सांगूनही कारवाई नाही !

भरतपूर (राजस्थान) – येथील डीग क्षेत्रातील आदिबद्री धाम आणि कनकाचल भाग येथे होत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणी साधू-संत आंदोलन करत आहेत. या वेळी ६५ वर्षीय विजय दास या संतांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यात होरपळल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दुसरीकडे १९ जुलैपासून बाबा नारायण दास येथील टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत. येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१. अवैध उत्खनन प्रकरणी गेल्या ५५० दिवसांपासून साधू, संत आणि गावकरी आंदोलन करत आहेत. १६ जानेवारी २०२१ या दिवसापासून हे आंदोलन चालू आहे. ६ एप्रिल २०२१ या दिवशी संतांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची, तर ११ सप्टेंबर २०२१ मध्ये शिष्टमंडळाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.

२. संतांचे म्हणणे  आहे की, आतापर्यंत १०० हून अधिक आमदार आणि मंत्री यांनी ३५० हून अधिक निवेदने देण्यात आली. प्रत्येक वेळेला केवळ आश्‍वासने देण्यात आली. गेल्या ५५० दिवसांत साधू-संतांनी आजूबाजूच्या गावांमध्ये जनसंपर्क अभियान, पदयात्रा, धरणे, निदर्शने, ट्रॅक्टर मोर्चा, रस्ता बंद, आमरण उपोषण, क्रांती यात्रा आदी आंदोलने केली; मात्र तरी अवैध उत्खनन थांबलेले नाही. (जर लोकशाही मार्गाने करण्यात आलेल्या विरोधानंतरही कारवाई होत नसेल आणि त्यातून जनतेचा उद्रेक होऊन कायदा हातात घेण्यात आला, तर त्याला उत्तरदायी कोण ? असा प्रश्‍न उपस्थित होतो ! – संपादक)

संपादकीय भूमिका

काँग्रेसचे राज्य म्हणजे अधर्मियांचे राज्य ! ‘काँग्रेसच्या राज्यात साधू, संतांना कोणताही मान नसतो’, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार खाण माफियांच्या पाठीशी रहाणार यात आश्‍चर्य काहीच नाही !