शिंदे गटाकडून वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरून हकालपट्टी !

किरण साळी यांची शिंदे गटाकडून युवासेना राज्य सचिवपदी निवड

वरुण सरदेसाई आणि किरण साळी 

मुंबई – शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव किरण साळी यांची शिंदे गटाकडून युवासेना राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरून हकालपट्टी करण्यात आली. गेल्या आठवड्यातच शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव किरण साळी यांनी पदाचे त्यागपत्र दिले होते. यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले.

‘१७ वर्षांत गटप्रमुख ते युवासेना सहसचिव या पदावर काम करतांना पक्षाचे संघटन वाढीसाठी योगदान दिले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी माझी निष्ठा आहे. मी शिवसेनेचा आहे आणि शिवसेना माझी आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिलेदारांना बळ देणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मी पदाचे त्यागपत्र देत आहे’, असे किरण साळी म्हणाले.

येणार्‍या काळात युवक-युवतींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीन ! – किरण साळी, राज्य सचिव, युवासेना

श्री. किरण साळी म्हणाले की, १८ जुलै या दिवशी झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी युवासेना राज्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. हा माझ्यासाठी अनपेक्षित, तसेच सुखद धक्का आहे. युवासेना राज्य सचिव या नव्या दायित्वासह नव्या संकल्पाने कार्यरत असतांना येणार्‍या काळात युवक-युवतींचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन. राज्यातील तरुणांना हक्काचे शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि युवक-युवतींची सुरक्षितता तसेच, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्व स्तरावर झोकून देऊन काम करीन.

ते म्हणाले की, आजपर्यंत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांना अनुसरून पक्षबांधणीसाठी सक्रियतेने कार्यरत असून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने केली आहेत. माझ्याविरुद्ध गुन्हे नोंदवले गेले, तरीही मी डगमगलो नाही; कारण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला देशभरात पोचवण्याचा ध्यास या ध्येयाने झपाटून मी कार्यरत आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या विश्वासाने दायित्व दिले, ते पुढे नेण्यासाठी दिलेला विश्वास आणि आपुलकीची वागणूक माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांसाठी आजवर केलेल्या कार्याची पोचपावती आहे. गेल्या १७ वर्षांत गटप्रमुख ते भारतीय विद्यार्थी सेना, शहराचा युवासेनेचा प्रथम अध्यक्ष, शिवसेना उपशहर प्रमुख, युवासेना सहसचिव, अशी विविध दायित्वे पार पाडण्याची आणि काम करण्याची संधी मिळाली. मिळालेले प्रत्येक दायित्व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मी कायमच कटीबद्ध होतो आणि यापुढेही असेन.