‘व्हायरल ताप’ (विषाणूजन्य ताप) आणि प्रतिजैविके !
१. ‘व्हायरल फिव्हर’ हा गांभीर्याने घेण्याचा; पण काळजी न करण्याचा आजार !
‘सध्या ‘व्हायरल फिव्हर’ या आजाराचे नाव आपल्याला वारंवार आणि मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळते अन् ते अत्यंत गांभीर्याने घेतले जाते. त्यामागे भावना असते की, आपल्याला कुठला तरी भयानक मोठा आजार झाला आहे. (खरेतर कुठलाही आजार झाला, तरी गांभीर्य हवे; पण भीती नसावी. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे उत्तम उपाय सर्वतोपरी केले जातात.) रुग्ण या ‘व्हायरल’वर प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) घेत असतात. कधी कधी तर आधुनिक वैद्य (डॉक्टर) एकाच आजारात २-३ प्रतिजैविकेही पालटून पालटून देत असतात. (तसाही भारत देश हा प्रतिजैविकांच्या अविवेकी वापराविषयी जगभर अपकीर्त आहे. त्याला आधुनिक वैद्यांचा निष्काळजीपणा जितका कारणीभूत आहे, त्याहून अधिक रुग्णांचा अधीरपणा उत्तरदायी आहे.) नक्की काय आहे हा आजार ? बरा होणारा आहे का ? त्यावर योग्य उपाय कोणता ? मुख्य म्हणजे आयुर्वेदात त्याला काही औषध आहे का ? (इंग्रजी नाव असलेल्या कुठल्याही आजाराला आयुर्वेदात औषध असणे अवघड असते. अलीकडे काही संशोधन झाले असेल, तर फक्त तेच औषध उपयोगी पडू शकते. अन्यथा ‘आयुर्वेदाचा सामान्य वैद्य’ या आजारांवर काय उपचार करणार ?’ असा लोकांचा सार्वत्रिक अपसमज आहे. दुर्दैवाने काही वैद्यही या अपसमजाचे बळी आहेत.) हे जाणण्यासाठी आपण ‘व्हायरल फिव्हर’ काय असतो, ते समजून घेऊ.
२. ‘व्हायरल फिव्हर’चे स्वरूप
२ अ. शरिरातील सूक्ष्म विषाणू आणि व्याधी निर्माण करण्याचे त्यांचे कार्य : विषाणू हे आजार निर्माण करणारे सूक्ष्म जीव आहेत. हे विषाणू अत्यंत सूक्ष्म असतात. केवळ ‘आर्.एन्.ए.’(रायबोन्यूक्लिइक ॲसिड – मानवी शरिरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल) चा धागा इतकेच त्यांचे शरीर असते. त्यांची रचना ते कधीही पालटू शकतात. केवळ जिवंत पेशींमध्येच त्यांची वाढ होऊ शकते. ते समस्त प्राणी आणि वनस्पती सृष्टीमध्ये व्याधी निर्माण करू शकतात. त्यांचे स्वरूप पालटत असल्याने त्यांच्याविषयी प्रयोगशाळेत परीक्षण करणे थोडे जिकिरीचे असते. त्यांनी शरिरात केलेल्या पालटांवरून ते शरिरात असल्याचे अनुमान करावे लागते.
२ आ. लागण होण्याचे मार्ग : त्यांची एका प्राण्यापासून दुसर्या प्राण्याला होणारी लागण झटपट असते. श्वास, स्पर्श, वस्त्र, पाणी, थुंकी, मल असा कुठलाही मार्ग या शत्रूला चालतो.
२ इ. डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यू, एड्स, मधुमेह इतकेच काय, आता तर कर्करोगही विषाणूजन्य असल्याचे शोध लागत आहेत. भेद इतकाच आहे की, या आजारांचे विषाणू विशिष्ट असून त्यांच्याविषयी संशोधनानंतर काही माहिती उपलब्ध झाली आहे. वरचेवर येणार्या तापाचे तसे नाही.
३. तापाची लक्षणे
एक ऋतू संपून दुसरा ऋतू चालू होण्याच्या ऋतुसंधीकाळात या विषाणूजन्य तापाची साथ येते. (भारतातील शहरांमध्ये लोकसंख्येची घनता पुष्कळ अधिक असल्याने आणि सोप्या भाषेत दरडोई जागा अगदी अल्प उपलब्ध असल्याने यांचा प्रसार पुष्कळ झपाट्याने होतो.) नाक किंवा घसा येथे काही पूर्वरूपे १-२ दिवस दिसतात. त्यानंतर ताप येतो. साधारणत: १०१ ते १०४ एफ् (फॅरनहाइट) या प्रमाणात ताप असतो. त्यासमवेत अंगदुखी, घसादुखी, घशात खवखव होणे, डोकेदुखी, नाकातून पाणी गळणे, नाक चोंदणे, खोकला, भूक मंदावणे, अशक्तपणा, कधी पोटदुखी, कधी जुलाब, मळमळ, क्वचित् उलटी अशी काही लक्षणे दिसतात. (सगळी लक्षणे एकाच वेळी एकाच रुग्णात दिसत नाहीत आणि दिसूही नयेत.) सामान्यत: ताप १ ते ४ दिवस टिकतो. कधी कधी ७ दिवसही रहातो; मात्र अन्य लक्षणे अल्प व्हायला १० ते १२ दिवस लागतात.
४. साध्या उपचारांनी ठीक होणार्या ‘व्हायरल तापा’वर प्रतिजैविके घेणे टाळा आणि धीर धरा !
सध्या विषाणूजन्य आजारांचा प्रतिकार करण्याचे २ उपाय उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे प्रतिबंधक लस ! विषाणूंची संख्या आणि प्रकार यांचा पसारा बघता तो व्यवहार्य नाही. दुसरा उपाय आहे, ‘अँटिव्हायरल’ची औषधे ! एकतर त्यांची उपलब्धता पुष्कळ अल्प आहे. तसेच त्यांच्या वापराचे दुष्परिणामही अधिक आहेत. अन्य साध्या उपचारांनी ठीक होणार्या तापावर अशी धोकादायक औषधे कशाला वापरायची ? १ – २ दिवसांत ताप न उतरल्यास लोक अधीर होऊन आधुनिक वैद्य पालटतात. आधुनिक वैद्यही मानहानी आणि अपयश यांना घाबरून असतात. मग आवश्यकता नसलेल्या प्रतिजैविकांचा वापर केला जातो. इतके करूनही आजार त्याचा ठराविक काळ घेतोच. यात केवळ प्रतिजैविके बनवणार्या औषधी आस्थापनांचा लाभ होतो आणि रुग्णांची केवळ हानीच होते. त्यामुळे धीर धरणे महत्त्वाचे आहे.’
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : ‘साप्ताहिक विवेक’)