शरद पवार यांनी शिवसेना फोडली, हे उद्धव ठाकरे यांना कधी लक्षात येणार ? – शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शिवसेना फोडली आहे, हे उद्धव ठाकरे यांच्या कधी लक्षात येणार ? शिवसेनेचे ५० आमदार पक्ष सोडून का गेले ? याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. १९ जुलै या दिवशी ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
रामदास कदम पुढे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना संपवण्याचा डाव आखला होता. शिवसेनेच्या आमदारांच्या वाट्याचा निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मिळाला. त्यामुळेच एकनाथ शिंदे गटाने हे पाऊल उचलले. वर्ष १९७० पासून मी शिवसेनेत सक्रीय आहे. गेली ५२ वर्षे मी पक्षासाठी दिली. ‘एक दिवस मला या पदाचे त्यागपत्र द्यावे लागेल’, असे मला मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. आम्ही उभे केलेले हे साम्राज्य पत्त्यासारखे कोसळतांना पाहून वाईट वाटते.