भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।। (भाव कसा असावा ?)
‘भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।।’ या संत तुकाराम महाराज यांच्या ओळींचा अर्थ सांगतांना संभाजीनगर येथील डॉ. विजयकुमार फड यांनी भावाविषयी केलेले विश्लेषण पुढे दिले आहे.
१. भावाच्या आधारे माणुसकीची इमारत पक्की ठेवण्याचा जो कसोशीने प्रयत्न करील, त्याचे जीवन सुखकर होईल !
‘भाव हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. एवढेच नव्हे, तर सखोल अर्थाने असे म्हणता येईल की, भाव हा माणुसकीचा आधारस्तंभ आहे. भाव डळमळीत झाल्यास माणुसकीची इमारत डळमळलीच म्हणून समजावे. जी व्यक्ती स्वतःच्या जीवनात भावाच्या आधारे माणुसकीची इमारत पक्की ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करील, तिचे जीवन सुखकर झालेच म्हणून समजावे.
२. मानवी जीवनात भावाला अनन्यसाधारण महत्त्व असणे आणि प्रत्येकाच्या भावानुसार त्याला भक्तीचे फळ मिळत असणे
‘मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असणारा भाव सर्वांकडे असला, तरीही प्रत्येकजण सकारात्मक आणि निःस्वार्थ भाव जोपासेलच’, असे नाही. माणसांच्या संदर्भात तर सोडाच; पण साक्षात् भगवंताच्या संदर्भातही काही लोक सकारात्मक आणि निःस्वार्थी भाव जोपासत नाहीत. ‘देव हा भावानेच अंकित केला जाऊ शकतो’, याची जाण या लोकांना नसते; म्हणून अशांना त्यांच्या व्यावहारिक भक्तीचे फळ व्यावहारिक रूपातच मिळते. देवाकडे शक्ती चालत नाही, तर निःस्वार्थ भक्ती आणि भाव चालतो अन् विशेष म्हणजे जसा भाव असतो, तसे त्या भक्तीचे फळ मिळते.
३. नाशवंत गोष्टींवरील अभिमानामुळे माणूस शाश्वत भगवंतापासून दूर जाणे
या अनुषंगाने बोलतांना तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।।’’ अनेकांना त्यांच्याकडील सत्ता, संपत्ती, सौंदर्य, संतान आदी गोष्टींचा अभिमान असतो. या नाशवंत गोष्टींच्या अभिमानामुळे माणूस शाश्वत भगवंतापासून दूर जातो. एवढेच काय तो ज्यांच्या सहवासात रहातो किंवा जे त्याच्या सहवासात रहातात, तेही खर्या अर्थाने त्याच्या जवळ असत नाहीत; कारण कुणालाही स्वार्थी, व्यवहारी, फसवा, खोटारडा भाव आवडत नाही. जे अज्ञानी असतात, त्यांनाही कालांतराने का होईना; पण खरा आणि खोटा भाव लक्षात येतो.
४. चांगला भाव जोपासणार्या आणि ज्याच्यावर भाव जोपासला जात आहे त्याला, म्हणजेच दोघांनाही आनंद मिळणे आणि फसवा अन् व्यवहारी भाव न जोपासणे सर्वांच्या हितावह असणे
खरे म्हणजे चांगला भाव जोपासला, तर भाव जोपासणार्या आणि ज्याच्यावर भाव जोपासला जात आहे त्याला, म्हणजेच दोघांनाही आनंद मिळतो. पुष्कळ वेळा माणूस दीर्घ काळाचा विचार न करता तातडीने स्वार्थ साधण्याचा विचार करतो आणि ‘समोरच्याचे काही झाले, तरी त्याच्याशी आपल्याला काय देणे-घेणे ?’, असा अविचार करतो. त्यामुळे त्याच्याकडून फसवा, खोटारडा आणि व्यवहारी भाव जोपासला जातो. अशा भावाची फळे ही वरकरणी चांगली वाटत असली, तरी ती खर्या अर्थाने विषारीच असतात; म्हणून ‘असा भाव न जोपासणे’, हेच सर्वांच्या हितावह असेल.’
– डॉ. विजयकुमार फड, संभाजीनगर (६.५.२०२०)