कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही आनंदी रहाणार्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या नाशिक येथील (कै.) सौ. दीपाली आव्हाड (वय ५५ वर्षे) !
नाशिक येथील सौ. दीपाली दिलीप आव्हाड (वय ५५ वर्षे) यांचे २८.१०.२०२१ या दिवशी निधन झाले. आषाढ कृष्ण अष्टमी (२०.७.२०२२) या दिवशी त्यांचे ९ वे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. श्री. दिलीप काशिनाथ आव्हाड (यजमान (वय ६८ वर्ष))
१ अ. ‘कै. (सौ.) दीपाली यांना पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे आणि अन्नदान करणे आवडत असे.
१ आ. ‘व्यष्टी आणि समष्टी साधना हेच पत्नीच्या आयुष्याचे ध्येय होते’, असे वाटणे : ती १६ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होती. व्यष्टी आणि समष्टी साधना हेच तिच्या आयुष्याचे ध्येय होते. तिच्या साधनेमुळे तिला भविष्यात घडणार्या घटनांविषयी आधीच जाणवायचे.
१ इ. साधनेमुळे शारीरिक त्रासातही स्थिर असणे : वर्ष २०१५ ते २०२० पर्यंत कर्करोगाने ग्रस्त असूनही तिने सेवेमध्ये कुठलाच खंड पडू दिला नाही. पहिला कर्करोग बरा झाल्यावर पुन्हा वर्ष २०२१ मध्ये तिला दुसर्यांदा कर्करोग झाला. तेव्हाही तिने धीर सोडला नाही. तिला पुष्कळ शारीरिक त्रास होत असतानांही केवळ साधनेमुळे ती नेहमी स्थिर असायची. अखेरच्या श्वासापर्यंत तिने साधनेची कास सोडली नाही.
१ ई. सद्गुरु नंदकुमार जाधवकाका आमच्या ‘डेअरी पॉवर’ या दूध आस्थापनाला भेट देण्यास आल्यावर तिला पुष्कळ आनंद झाला होता.
१ उ. मृत्यूपर्यंत तिची श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भक्ती पुष्कळ वाढल्याचे मला जाणवायचे.’
२. श्री. दीपक आव्हाड (थोरला मुलगा) आणि श्री. सागर आव्हाड (धाकटा मुलगा)
२ अ. प्रेमभाव : ‘आई आमच्याकडे येत असलेली भावंडे आणि नातवंडे, तसेच सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्यासह नेहमी समानतेने वागून त्यांच्यावर तिच्या पोटच्या मुलांप्रमाणेच प्रेम करायची. सनातनचे साधक आणि समाजातील सर्व प्रकारच्या लोकांशी आई नेहमी प्रेमानेच बोलायची. तिच्यातील प्रेमभावामुळे तिची सर्वांशी जवळीक होती.
२ आ. सतत प्रार्थना आणि कृतज्ञता यांद्वारे श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करणे : वर्ष २०१५ मध्ये तिच्या कर्करोगाचे निदान झाले. तेव्हा ‘आजपर्यंत मला केवळ श्रीकृष्ण आणि गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या कृपेने साधना करण्याची संधी मिळाली आहे’, असा आईचा कृतज्ञताभाव होता. ती म्हणायची, ‘अखेरच्या क्षणापर्यंत साधना करत राहीन आणि इतरांनाही साधनेविषयी सांगत राहीन.’ सतत प्रार्थना करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे यांद्वारे आई नेहमी श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करायची.
२ इ. जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सुटण्याची तळमळ : एखाद्या साधकाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यावर आईला पुष्कळ आनंद व्हायचा. आई तिच्या आजारपणामुळे नेहमी म्हणायची, ‘मला पुनर्जन्म नको. मला नित्य गुरुचरणी (परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी) रहायचे आहे.’
२ ई. मागील एक वर्षापासून आईमध्ये जाणवलेले पालट आणि तिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१. कुटुंबीय आणि इतर नातेवाइक यांच्या संदर्भात एखादी आनंददायी किंवा दुःखदायक घटना भविष्यात घडायची असेल, तर ते आईला आधीच कळायचे. ती माझ्याकडे त्याविषयी बोलूनही दाखवायची आणि खरोखरच तसे घडायचे.
२. आईच्या हातावर स्वस्तिक उमटल्याचे दिसून आले होते.
३. मागील वर्षभरात रुग्णालयात जाण्याच्या वेळी मी नेहमी आईच्या समवेत होतो. त्या वेळी ‘आईच्या शरिराला एक वेगळ्या प्रकारचा दैवी सुगंध येत आहे’, असे मला नेहमी जाणवायचे.
४. अलीकडच्या काळात आई आमच्यासह नेहमीप्रमाणे प्रेमाने बोलायची; परंतु तिच्या प्रेमात पुष्कळ निरपेक्षता जाणवायची. त्याच समवेत ‘श्री गुरु आणि श्रीकृष्ण यांच्याप्रती एक अगाध प्रेम अन् लळा असल्यासारखी आईची स्थिती आहे’, असे मला जाणवायचे.
५. वैद्यकीय उपचार घेण्यासाठी नाशिक येथून मुंबईला रुग्णवाहिकेने जातांनाही आईच्या हातात जपमाळ सतत असायची आणि ती सतत नामजप करायची.
६. चि. यशराज (धाकट्या मुलाचा मुलगा (वय ६ मास)) आईच्या खोलीत गेल्यावर पुष्कळ आनंदी असायचा. तो आईच्या खोलीतील गुरुदेवांचे छायाचित्र आणि देवतांची चित्रे यांकडे पाहून हसायचा. तो आईच्या खोलीत शांतपणे झोपल्याचे आम्ही अनेक वेळा पाहिले होते.
७. कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही आई ‘तिला होत असलेला त्रास केवळ भगवंताला सांगितल्यावर न्यून होतो’, अशी अनुभूती पदोपदी घ्यायची. त्या अनुभूती सांगतांना ती सतत इतरांना सांगायची, ‘श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती भक्तीभाव वाढवा.’
३. सौ. गायत्री दीपक आव्हाड (थोरली सून) आणि सौ. अक्षता सागर आव्हाड (धाकटी सून)
अ. ‘आईंनी (सासूबाईंनी) आम्हाला स्वयंपाक करतांना आनंदी रहाणे, तसेच चांगला आणि भावपूर्ण स्वयंपाक करणे शिकवले.
आ. त्यांनी नेहमी आमचा आत्मविश्वास वाढवला आणि प्रोत्साहन अन् सकारात्मकता दिली.
इ. आई नेहमी आनंदी राहून प्रत्येक गोष्ट उत्साहाने करायच्या.
ई. त्यांच्यात नेहमी पुष्कळ सेवाभाव जाणवायचा. त्यांचे शरीर साथ देत होते, तोपर्यंत त्या सकाळपासून सायंकाळपर्यंत सतत सेवेत मग्न असायच्या.
उ. त्या घरातील सर्वांशी प्रेमानेच वागायच्या. आम्ही त्यांना कधीही कुणाशी भांडण करतांना किंवा वाद घालतांना पाहिले नाही. त्यांचा समोरच्या व्यक्तीशी नेहमी आदराने आणि प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न असायचा.
ऊ. त्यांचा घरातील कामे करतांना, तसेच मुले आणि नातवंडे यांची काळजी घेतांना, ‘श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची सेवा करत आहे’, असा भाव असायचा.
ए. घरी कुणीही पाहुणे आल्यावर आई त्यांना नेहमी सनातनची ग्रंथसंपदा, सात्त्विक उत्पादने, सनातन पंचांग आणि शुभेच्छा पत्र भेट स्वरूपात द्यायच्या.
ऐ. त्यांनी आम्हाला कधीच सुनेप्रमाणे वागणूक दिली नाही. त्यांनी नेहमी आमचा स्वत:च्या मुलींप्रमाणेच सांभाळ करून आम्हाला सतत मार्गदर्शन केले.
ओ. आम्ही सर्व सुना आणि मुली त्यांची सेवा करायचो. तेव्हा ‘माझ्यामुळे इतरांना त्रास नको’, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे अत्यवस्थ असूनही त्या स्वतःची कामे स्वतःच करायच्या.
४. सौ. गायत्री आव्हाड
अ. ‘ मला आईंचा (सासूबाईंचा) सहवास १० वर्षे लाभला. मी त्या संपूर्ण १० वर्षांमध्ये त्यांना कधीच विनाकारण वेळ वाया घालवतांना पाहिले नाही. त्या इतरांशी बोलतांना नेहमी अध्यात्म, देव आणि गुरु याच विषयांवर बोलायच्या. त्या रुग्णाईत असतांनाही नियमितपणे मंदिरात देवदर्शनास जात असत. त्या दिवसाचा आरंभ साधनेने करून त्यानंतर इतर कामे करायच्या.
आ. त्यांच्या अखेरच्या क्षणी मी त्यांच्या समवेत रुग्णालयात असतांना अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा नामजप चालू असल्याचे मला लक्षात आले आणि ‘त्या सतत भगवंत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात होत्या’, असे मला जाणवले.’
५. श्री. नीलेश नागरे, नाशिक
रुग्णाईत असतांनाही आनंदी राहून सतत श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाणे : ‘पूर्वीची कठीण परिस्थिती जाऊन आता श्रीमंती आली असूनही काकूंना तिचा कुठेही अहं झाल्याचे दिसून आले नाही. काकू कर्करोगाने ग्रस्त असूनही त्या नेहमी आनंदी असायच्या. त्यांच्याकडे पाहून लक्षात यायचे, ‘त्या एका वेगळ्या प्रकारच्या भक्तीमध्ये मग्न आहेत.’ त्या सतत श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या अनुसंधानात असायच्या. काकूंचा श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती पुष्कळ भाव असल्याचे मला नेहमी जाणवायचे.’
६. श्री. भीमाशंकर पाटील (वय ८० वर्षे) आणि सौ. पद्मावती भीमाशंकर पाटील (वय ७५ वर्षे), नाशिक
६ अ. प्रेमभाव : ‘आव्हाड काकूंमध्ये पुष्कळ प्रेमभाव आणि आपुलकी होती. त्यांच्याकडे दूजाभाव नव्हता. त्यांना श्रीमंतीचा गर्व नव्हता. आम्ही दोघेही वयोवृद्ध आहोत. आम्हाला काही करणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक सणवार असतांना त्यांनी आम्हाला त्यांच्या घरातल्या सदस्यांप्रमाणे पक्वान्नाचे जेवण दिले. त्या स्वतः रुग्णालयात असतांनाही त्यांनी आमची काळजी म्हणून आमच्यासाठी दुसर्या व्यक्तीद्वारे डबा पोचवला. त्या नेहमी आमचे त्यांच्याशी पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असल्यासारख्याच वागायच्या.
६ आ. सेवाभाव : एकदा माझी पत्नी (सौ. पद्मावती पाटील) रुग्णाईत असतांना आणि तिच्या बोटांना जखम झाली असतांना काकू स्वतः येऊन एक मास न चुकता त्यांची वेणी घालून द्यायच्या. नियमितपणे आमची विचारपूस करायच्या. आम्हा वयोवृद्धांना त्यांचा पुष्कळ आधार होता. त्यांना बरे वाटत नसतानांही ‘केवळ चैतन्य घ्यायला मी तुमच्या घरात येते’, असा त्यांचा भाव होता. त्या नेहमी इतरांना आमची ओळख ‘स्वतःचे आई-वडील’, अशी करून द्यायच्या.
६ इ. ‘इतरांची साधना व्हावी’, अशी तळमळ असणे : आव्हाडकाकूंना साधकांच्या साधनेची अधिक काळजी असायची. ‘साधकांचे नामस्मरण होते का ? स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी स्वयंसूचना सत्रे होतात का ? प्रार्थना आणि कृतज्ञता होतात का ?’, असे त्या नेहमी साधकांना विचारायच्या. त्यांच्यामध्ये नेहमी साधकत्व जाणवायचे.
६ ई. समाधानी : काकूंनी कधीही त्यांच्या घरातील कुठल्याही व्यक्तीविषयी गार्हाणे केले नाही किंवा त्यांच्या स्वभावदोषांची चर्चा केली नाही. ‘त्या सर्व काही मनापासून स्वीकारून जीवन जगत होत्या’, असे मला नेहमी लक्षात यायचे.’
७. सौ. सुचेता पाटील (वय ५१ वर्षे), नाशिक
७ अ. प्रेमभाव : ‘काकू सेवेला येतांना साधकांसाठी डब्यातून नेहमी काहीतरी खाऊ घेऊन यायच्या. सर्वांची नेहमी प्रेमाने विचारपूस करायच्या.
७ आ. सेवेची तळमळ : त्यांना ‘समाजातील लोक आणि नातेवाईक यांच्यापर्यंत सनातनची सात्त्विक उत्पादने पोचावीत’, अशी तळमळ होती. काकू नियमितपणे त्यांच्या नातेवाइकांसाठी विविध विषयांवर प्रवचनांचे आयोजन करायच्या.’
८. सौ. मीनाक्षी कोल्हे (वय ५५ वर्षे), नाशिक
अ. ‘तीन वर्षांपासून ताई कर्करोगाशी झुंज देत होत्या. ‘त्या स्थितीतही त्यांच्या तोंडवळ्यावर त्यांना शारीरिक त्रास आहे’, असे कधी जाणवले नाही. त्या सतत आनंदी रहायच्या.
आ. ताई सेवेसाठी सतत तत्पर असायच्या. त्या गुरुपौर्णिमा आणि हिंदु-राष्ट्र जागृती सभा यांच्या प्रसाराची सेवा मनापासून करायच्या. त्या नाशिकहून मालेगाव आणि धुळे येथे त्यांच्या शारीरिक स्थितीची पर्वा न करता सेवेला जात असत.
इ. त्यांचा गुरुमाऊलींप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) उत्कट भाव होता.’
९. आव्हाडकाकूंच्या मृत्यूनंतर साधकांना जाणवलेली सूक्ष्मातील सूत्रे
९ अ. श्री. नीलेश नागरे
१. ‘मृत्यूनंतर काकूंच्या तोंडवळ्यावर समाधान जाणवत होते आणि शांतता दिसत होती.
२. ‘जिवंत असतांना ज्याला मी भजत होते, ज्याच्यावर प्रेम करत होते, तो ईश्वर आता मला खर्या अर्थाने भेटला आहे’, असे समाधान त्यांच्या मुखावर दिसत होते.
३. ‘काकूंच्या दर्शनासाठी सूक्ष्मातून देवता आणि परात्पर गुरु डॉक्टर उपस्थित आहेत’, असे मला जाणवले.
४. त्यांच्या लिंगदेहाभोवती संरक्षक कवच असून तो पुष्कळ आनंदी आहे आणि तो सर्वांना ‘श्रीकृष्ण आणि गुरु यांची भक्ती करा’, असे सांगत असल्याचे मला जाणवले.
५. ‘त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या समस्त नातेवाइकांमध्ये साधनेचा आणि नामाचा प्रसार व्हावा’, अशी त्यांची इच्छा असल्याने कदाचित् गुरुमाऊलींनी अंत्ययात्रेच्या दिवशी त्यांच्या रहात्या घराच्या परिसरात आम्हा सर्व साधकांकडून त्यांचे समस्त नातेवाइक जमलेले असतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करून घेतला. त्या वेळी सर्वांनी भावपूर्ण नामजप केला. साधकांनी अंत्ययात्रेला उपस्थित असलेल्या सर्वांना दत्ताच्या नामजपाचे वैशिष्ट्य सांगितले.’
९ आ. सौ. मीनाक्षी कोल्हे
‘मृत्यूनंतर त्या शांत झोपल्या असून त्यांचा नामजप चालू आहे’, असे मला जाणवले. मला तेथील वातावरणात दाब जाणवला नाही.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २.६.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |