कुंकळ्ळी येथील १६ महानायकांच्या हुतात्मा स्मारकाला गोव्यातील विविध मंदिरांच्या जलाभिषेकाच्या माध्यमातून मानवंदना
शांतादुर्गा सेवा समितीचा उपक्रम
मडगाव, १८ जुलै (वार्ता.) – शांतादुर्गा सेवा समितीने कुंकळ्ळी येथील १६ महानायकांच्या हुतात्मा स्मारकाला गोव्यातील विविध मंदिरांच्या जलाभिषेकाच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा उपक्रम राबवला.
पोर्तुगिजांनी गोव्यात चालवलेला मंदिरांचा विध्वंस आणि धर्मांतराचे लोण धर्माभिमानी कुंकळ्ळीवासियांनी रोखून धरले. असहकार चळवळीच्या माध्यमातून क्रूर पोर्तुगीज सत्तेला हादरवून सोडले. ‘१६ महानायकांनी स्वीकारलेले हौतात्म्य हे स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांच्या रक्षणासाठी होते’, याची जाणीव प्रत्येक हिंदूच्या हृदयात असली पाहिजे. या उद्देशाने शांतादुर्गा सेवा समितीच्या वतीने गेल्या ४ वर्षांपासून १६ महानायकांच्या हुतात्मा स्मारकाला जलाभिषेक घालण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंदिरे ही हिंदूंची सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रे आहेत. यामुळे गोव्यातील सर्व मंदिरांमधून जलकलश पूजन करून त्या जलाचा अभिषेक हुतात्मा स्मारकाला घालणे, असा समितीचा उपक्रम असतो. यंदाही गोव्यातील नामवंत अशा ५० मंदिरांतून जलकलश आणून त्या जलाद्वारे स्मारकावर अभिषेक करण्यात आला.
प्रारंभी कुंकळ्ळी गावचे आराध्य दैवत श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिण देवस्थान समिती आणि १२ गावकर यांनी मिळून स्मारकावर जलाभिषेक केला. कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठ श्री क्षेत्र तपोभूमी यांच्या वतीनेही स्मारकावर विधीपूर्वक जलाभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव चौगुले, तसेच कुंकळ्ळीतील ज्येष्ठ नागरिक आणि स्वातंत्र्यसैनिक आदींची उपस्थिती होती. या वेळी अशोकराव चौगुले यांच्या हस्ते गोमंतकीय राष्ट्रवादाचे जनक टी.बी. कुन्हालिखित पुस्तकाच्या पुनर्प्रकाशित केलेल्या आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला ७०० हून अधिक लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला सांघिक गीताने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने घोषाद्वारे (बँड किंवा तुतारी वाजवून) मानवंदना देण्यात आली. १६ महानायकांच्या वीरगाथेचे सतत स्मरण व्हावे, या हेतूने कार्यक्रमात १६ मशाली पेटवून ठेवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाची सांगता वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून झाली.