राज्यातील ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा विधानसभा अधिवेशन

कुंकळ्ळी येथील १६ महानायकांचे हुतात्मा स्मारक

पणजी, १८ जुलै (वार्ता.) – गोव्यातील जी ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत नोंद झालेली नाहीत, ती सर्व स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणण्यात येणार आहेत. त्यानंतर या स्थळांची देखभाल पुरातत्व खाते करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या वेळी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आश्वासन दिले. प्रारंभी आमदार युरी आलेमांव यांनी त्यांचा प्रश्न मांडतांना म्हटले, ‘‘राज्यात एकूण ५१ वारसास्थळे आहेत; मात्र त्यामध्ये राज्यातील ऐतिहासिक स्थळांचा उल्लेख नाही. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. मडगाव येथील लोहिया मैदान, पणजी येथील आझाद मैदान, चांदर येथील पुरातन श्री महादेव मंदिर, असोळणा आणि पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक अन् कुंकळ्ळी येथील १६ महानायकांचे हुतात्मा स्मारक या ऐतिहासिक स्थळांची अजूनही पुरातत्व खात्यांतर्गत नोंदणी झालेली नाही.’’ (कोणती ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली हवीत, हेही सांगावे लागणारे निष्क्रीय पुरातत्व खाते ! – संपादक)