हिंदु धर्माचा प्रसार केल्यास धर्माधिष्ठित राष्ट्र स्थापन होऊ शकते ! – सौ. गीता अच्युतन्, श्री श्री नारायणीय सत्संग
पालक्काड (केरळ) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा
पालक्काड (केरळ) – सनातन हिंदु धर्म टिकून राहिला आहे, तो केवळ सद्गुरु आणि संत यांच्यामुळेच ! गुरु-शिष्य परंपरेमुळेच गुरूंकडील ज्ञान देण्याची प्रक्रिया अनेक पिढ्या पुढे चालू आहे. धर्मावर आघात होतांना ते रोखण्यासाठी परब्रह्म तत्त्वच गुरूंच्या रूपात अवतार घेते.
आजच्या शिक्षणात केवळ जीवन जगण्यासाठी पैसा कसा मिळावा, हे शिकवले जाते; पण धर्म कुठेच शिकवला जात नाही. धर्म असेल, तरच आपले जीवन संतुलित रहाते. धर्म शिकून त्याचा प्रसार करणे आवश्यक आहे. तसे झाल्यासच धर्माधिष्ठित राष्ट्र स्थापन होऊ शकते, असे मार्गदर्शन मूतांतरा येथील ‘श्री श्री नारायणीय सत्संगा’तील सौ. गीता अच्युतन् यांनी केले. येथील वडक्कांतरामधील राधानाथ सभागृहात १३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुपूजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) रश्मी परमेश्वरन् यांनी ‘धर्माधिष्ठित समाजाची निर्मिती आणि सुराज्याची आवश्यकता’, या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा लाभ १०० हून अधिक जणांनी घेतला. या कार्यक्रमात हिंदु धर्म कार्यासाठी प्रयत्नरत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांचा सत्कार करण्यात आला.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाच्या वेळी पुष्कळ पाऊस असूनही जिज्ञासू गुरुपौर्णिमेसाठी उपस्थित होते.
२. कार्यक्रमाला २ स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. त्यांच्यासह अनेकांनी कार्यक्रम आवडल्याचे सांगितले.