ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाचा काही भाग १८.७.२०२२ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/597517.html
१८. संतपदी विराजमान होणे
१३.३.२०२२ या दिवशी पू. आबा संतपदी विराजमान झाले.
१८ अ. पू. आबा संतपदी विराजमान झाल्यावर ‘आरंभापासूनच ईश्वर त्यांच्याकडून साधना करवून घेत आहे’, हे लक्षात येणे : पू. आबांच्या योग्य आचरणामुळे आणि त्यांनी ‘प्रत्येक सेवा ईश्वराने दिली आहे’, या भावाने केल्यामुळे त्यांचे कर्म चांगले झाले. ‘कर्मफलन्यायानुसार भगवंतही त्यांच्या समवेतच असतो’, हे यावरून लक्षात येते. ‘प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होते’, हा त्यांचा भाव असल्यामुळे त्यांच्या मनात सुख-दुःखाचे विचार नसून ते सतत आनंदी असतात. पू. आबा संतपदी विराजमान झाल्यावर उलगडा झाला की, आरंभापासूनच ईश्वर त्यांच्याकडून साधना करवून घेत आहे.
१८ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. आबांचे संतत्व समाजासमोर प्रकट करून त्यांच्या साधनाप्रवासाला गती दिली’, असे जाणवणे : पू. आबांनी प्रत्येक कृती देवाला समवेत घेऊन केल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपातील भगवंताने त्यांचे संतत्व जाणले आणि ते समाजासमोर प्रकट केले. पू. आबांमधील संतत्व कोणाला जाणता आले नाही. ते केवळ भगवंतच जाणू शकतो. भगवंत भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जाणतो. त्याची कृपादृष्टी एखाद्या जिवावर पडली की, त्या जिवाचा आतापर्यंतचा साधनाप्रवास जाणून त्याला पुढच्या साधनाप्रवासासाठी आशीर्वाद देणे, म्हणजेच गती देणे, हे भगवंताचे परम कर्तव्य असते. तेच परम कर्तव्य परात्पर गुरु डॉक्टरांनी केले.
१८ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. आबांमधील संतत्व प्रगट केल्यावर त्यांची आंतरिक साधना जन्मापासूनच चालू असल्याचे लक्षात येणे : मी गेल्या २१ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. तेव्हापासून मी ‘पू. आबांनी साधना करावी. त्यांचा सनातनशी परिचय व्हावा’, यासाठी प्रयत्न करत होतो; पण तो योग जुळून येत नव्हता. ‘त्यांची साधना चालू आहे. त्यांच्या संप्रदायानुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार ते करत आहेत’, असे मला वाटत होते. खरेतर त्यांची आंतरिक साधना जन्मापासूनच होत होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचे संतत्व प्रकट केल्यावर त्याविषयी माझ्या लक्षात आले. आतापर्यंत आमच्या घरी सनातनचे काही संत आणि साधक येऊन गेले. ‘पू. आबांची साधना चांगली चालू आहे’, हे सर्वांच्याच लक्षात येत होते.
१८ ई. परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेल्या प्रथम भेटीतच पू. आबांनी सहजतेने बोलणे आणि त्यांची आंतरिक साधना चालू असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी जाणणे : पू. आबा परात्पर गुरु डॉक्टरांशी सहजतेने बोलले. पू. आबा म्हणाले, ‘‘यापूर्वी मी बाहेर कधी बोललो नाही.’’ परात्पर गुरु डॉक्टरांची कृपादृष्टी पू. आबांवर पडल्यामुळे ‘त्यांची आंतरिक साधना कशी आहे ?’, ते त्यांच्या मुखातून बाहेर आले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी ‘आबा संत आहेत’, असे सांगितले. खरेतर या वेळी पू. आबा प्रथमच परात्पर गुरु डॉक्टरांना भेटले; पण परात्पर गुरु डॉक्टरांची दृष्टी सूक्ष्म रूपाने पू. आबांवर अनेक जन्मांपासून होती.
१९. परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रथम भेटीनंतर पू. आबांच्या संदर्भात जाणवलेले पालट
१९ अ. ‘परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे सांगणे : पू. आबा त्यांच्या संप्रदायाच्या ‘कलंकी केशव’ अवतारी कार्याविषयी सांगतात. परात्पर गुरु डॉक्टरांना ते कार्य आवडले. पू. आबांची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे कार्य श्रीविष्णूच्या दशावतारांप्रमाणेच आहे’, असे पू. आबांच्या लक्षात आले. ‘परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णूचा अवतार आहेत’, असे पू. आबा भेटीनंतर म्हणू लागले.
१९ आ. पू. आबांचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप चालू झाला.
१९ इ. परात्पर गुरु डॉक्टरांना भेटल्यापासून त्यांचा उत्साह वाढला. त्यांच्या तोंडवळ्यावरील भाव आणि चैतन्य यांत वाढ झाली.
१९ ई. पुराणातील कथा सांगणार्या पू. आबांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीनंतर अध्यात्माविषयी बोलणे : पू. आबा आतापर्यंत पुराणातील कथा सांगत होते; पण परात्पर गुरु डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘हा देह नाशवंत आहे. भगवंताने हा देह साधना करण्यासाठी दिला आहे. जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत ‘त्याची सेवा करणे, म्हणजे प्रतिदिन अंघोळ करणे, जेवणे, इतर सगळ्या गोष्टी करणे’, हे सर्व साधना म्हणून नियमित करणे आणि देहाची काळजी घेणे’ हीसुद्धा सेवाच आहे.’’
२०. पू. आबांविषयी जाणवलेली अन्य सूत्रे
अ. ‘पू. आबांची साधना भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्ग यांनुसार चालू आहे’, असे वाटते. त्यांच्याकडून घडणारे कर्म योग्यच असते.
आ. पू. आबांकडे पाहिल्यावर त्यांच्यातील भाव जाणवतो. त्यांचा तोंडवळा निरागस वाटतो.
इ. त्यांच्या त्वचेवर चैतन्याचे वलय असल्यासारखे जाणवते.
ई. ‘ते सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे वाटते.
उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार पू. आबा नामजप करतात. त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा आहे.’
– श्री. शंकर नरुटे (मुलगा, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०२२) (समाप्त)
उतारवयातही उत्तम आरोग्याची दैवी देणगी लाभलेले पू. राजाराम नरुटे (वय ९० वर्षे) !
१. ‘पू. आबा ९० वर्षांचे आहेत. या वयातही त्यांची प्रकृती चांगली आहे.
२. सतत कार्यरत असणे
पू. आबा कधीही झोपून रहात नाहीत. ते सतत काहीतरी करत रहातात. आम्हाला ते नेहमी सांगत, ‘‘शरिराला व्यायाम मिळाला पाहिजे.’’ त्याप्रमाणे ते स्वतः करतात; म्हणून त्यांची शारीरिक स्थिती चांगली आहे.
३. डोळ्यांनी व्यवस्थित दिसणे आणि कानांनी नीट ऐकू येणे
पू. आबांना अजूनही डोळ्यांनी चांगले दिसते. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे किंवा अन्यही वाचन सहजतेने करू शकतात. त्यांना कानांनीही नीट ऐकू येते. कुणी हळू आवाजात बोलले, तरी त्यांना सहज ऐकू येते.
४. दात नसतांनाही हिरड्यांनी व्यवस्थित खाता येणे
पू. आबांचे ३० वर्षांपूर्वीच सर्व दात काढले आहेत, तरीही ते नेहमीचे जेवण व्यवस्थित जेवतात. दात नसणार्या व्यक्तीला पदार्थ मऊ करून द्यावे लागतात; पण पू. आबांचे तसे नसते. पू. आबा जे आहे, ते खातात. त्यांच्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. त्यांच्या हिरड्याही मजबूत झाल्या आहेत आणि त्या दातांचे काम करतात.
५. पू. आबांनी काठीचा आधार न घेणे आणि आयुष्यभर पायांत पादत्राणे न घातल्याने त्यांचे पाय घट्ट होणे
पू. आबा काठीचा किंवा ‘वॉकर’चा आधार घेत नाहीत. त्यांनी कधीच पायांत पादत्राणे घातली नाहीत. ते शेतात जातांनाही पादत्राणांचा वापर करत नाहीत. त्यांचे पाय माती आणि खड्डे यांतून चालून इतके घट्ट झाले आहेत की, त्यांच्या पायांत एखादा काटा मोडणे कठीण जाते. यातून त्यांची ‘जिद्द आणि चिकाटी’, हे गुण दिसून येतात. पू. आबा ‘आहे त्या स्थितीत देवाने दिलेल्या अवयवांचा वापर करून त्यांची क्षमता वाढवतात; म्हणून त्यांना बाह्य गोष्टींचा आधार लागत नाही’, असे यातून लक्षात येते.’
– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |