सनातनच्या ११६ व्या संत पू. (सौ.) माला संजीव कुमार यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन आल्यावर आलेल्या अनुभूती

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार

१ अ. ‘कर्तेपणा’ या अहंच्या पैलूची जाणीव होणे

१ अ १. सनातनला धन अर्पण करण्याचा विचार येणे; पण ‘सर्वकाही गुरुदेवांचेच आहे’, याची जाणीव सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी करवून देणे : एकदा ‘सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण केल्यानंतर वितरक म्हणून मला जे पैसे मिळतात, ते संस्थेच्याच कार्यासाठी वापरावेत’, असे मला वाटले. त्याविषयी मी सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांना म्हणाले, ‘‘आपल्याला कधीही कोणत्याही कार्यासाठी आवश्यकता पडली, तर आपण माझ्याकडून पैसे घ्या.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आता तर तुम्हाला गुरुदेवांनी ‘आपले’ म्हटले आहे. आता तुम्ही आणखी काय त्याग करणार ? आता तुमचे जे काही आहे, ते सर्व गुरुदेवांचेच आहे.’’

१ अ २. ‘संत नामदेवांनी एका राजाचे केलेले गर्वहरण’, या कथेवरून ‘मी त्याग करणार’, हा माझ्यातील अहं आहे’, याची जाणीव होणे : एकदा एका राजाने संत नामदेवांना बोलावले आणि म्हटले, ‘‘तुम्हाला जेवढे सोने पाहिजे, तेवढे तुम्ही घ्या. मला तुम्हाला सोने अर्पण करायची इच्छा आहे.’’ तेव्हा संत नामदेव म्हणाले, ‘‘आता मला ईश्वराविना दुसरे काहीच नको’’; परंतु राजाने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा नामदेवांनी तराजूच्या एका पारड्यात झाडाचे एक पान ठेवले आणि ते राजाला म्हणाले, ‘‘तुम्हाला द्यायचेच असेल, तर या पानाच्या वजनाएवढे सोने द्या.’’ तेव्हा राजा हसायला लागला. राजा तराजूच्या दुसर्‍या पारड्यात सोने ठेवत गेला; परंतु पारडे जागेवरून मुळीच हालले नाही. शेवटी राजाने त्याच्या पत्नीचे दागिने काढून त्या पारड्यात ठेवले; तरीही ते तसूभरही हालले नाही. राजाने तेथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांना विचारले, ‘‘आता मी कोणता उपाय करू ?’’ त्यांनी सुचवले की, तुम्ही नामदेवांनाच विचारा. त्यावर नामदेवांनी सांगितले, ‘‘राजन्, मला ईश्वराविना काहीच नको. तुम्हाला द्यायची इच्छा असेल, तर तुमच्या मनात त्याग करण्याचा जो अभिमान (अहं) आहे, तोच तुम्ही संकल्प करून पारड्यात अर्पण करावा.’’ राजाने तसे केल्यावर पारडे त्वरित हलले. या कथेवरून ‘मी त्याग करणार, मी सनातनला पैसे अर्पण करणार’, हा माझा अहं आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांच्या माध्यमातून स्थुलातून आणि संत नामदेव यांच्या कथेच्या माध्यमातून सूक्ष्मातून गुरुदेवांनी हे शिकवले’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्री गणेश आणि श्री लक्ष्मीदेवी यांच्या अत्यंत सुंदर मूर्ती भेट म्हणून देणे अन् त्या मूर्ती देवघरात ठेवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मी आणि माझे यजमान पू. संजीव कुमार यांना एक भेट पाठवली. त्याविषयी आम्हाला कृतज्ञता वाटली. आरंभी भेट पाठवलेले दोन्ही डबे सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांनी आमच्या समोर ठेवले आणि ते म्हणाले, ‘‘यांमध्ये काय आहे ?’, हे मलाही ठाऊक नाही. आपण दोघांनी निवडून प्रत्येकी एक डबा घ्यावा. नंतर हवे तर डब्यांची अदलाबदल करू शकता.’’ पू. संजीव कुमार यांनी जो डबा उचलला, त्यात श्री गणेशाची मूर्ती होती आणि मी जो डबा उचलला, त्यामध्ये श्री लक्ष्मीदेवीची मूर्ती होती. या दोन्ही सुंदर मूर्ती मी देवघरात ठेवल्या.

२ आ. ‘श्री गणेशाच्या हातातील गुलाबाचे फूल स्वतःच्या बाजूला पडत आहे’, असे वाटून आनंद होणे

त्यानंतर जेव्हा मी देवघराच्या समोरून जात होते, तेव्हा ‘श्री गणेशाच्या हातातील गुलाबाचे फूल माझ्या बाजूला पडत आहे’, असे मला वाटले. हा विचार एवढा आनंददायक होता की, तो लिहितांनाही मला पुष्कळ आनंद झाला.

२ इ. गणेशाचा ‘मला लाडू हवा आहे’, असा आवाज आल्यावर श्री गणेशमूर्तीसमोर लाडू ठेवणे आणि ‘गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाने तुमच्याकडे लाडू मागितला’, असे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगणे

४.२.२०२२ या दिवशी मी हातात लाडू घेऊन देवघराच्या समोरून जात होते. तेव्हा मला आवाज आला, ‘मला लाडू हवा आहे.’ ते विसरून मी माझ्या खोलीत गेले. तेव्हा पुन्हा मला तोच आवाज आला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘गणेशजी माझ्याकडे लाडू मागत आहे. त्यानंतर मी तो लाडू श्री गणेशमूर्तीसमोर ठेवला. तेव्हा मला आनंद झाला. याविषयी मी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना भ्रमणभाषवर सांगितल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘आज माघी गणेश जयंती आहे आणि गणपतीने तुमच्याकडे लाडू मागितला.’’ त्या वेळी माझी भावजागृती होऊन मला पुष्कळ आनंद मिळाला.

३. साधिकेची आठवण येऊन तिला भ्रमणभाष करणे आणि त्या वेळी तिची भावजागृती होऊन तिने तिला आलेली अनुभूती सांगणे

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने काही दिवसांपूर्वी माझ्या मनात वारंवार ‘एक साधिका सौ. संगीता गुप्ता यांना भ्रमणभाष करून त्यांची विचारपूस करावी’, असा विचार येत होता. तेव्हा माझी कन्या अनन्या म्हणाली, ‘‘कदाचित् हा गुरुदेवांचाच विचार असेल.’’ त्यानंतर मी त्या साधिकेला भ्रमणभाष केला. भ्रमणभाषवर माझा आवाज ऐकताच ती साधिका भावविभोर झाली. तिला आनंद होऊन तिच्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले आणि तिने सांगितले, ‘‘ज्या वेळी तुम्हाला व्यासपिठावर संत म्हणून घोषित केले जात होते, तेव्हा मला पुष्कळ चैतन्य मिळत होते. त्याविषयी मी व्यासपिठावर येऊन सांगू इच्छित होते; परंतु माझे तेवढे धाडस झाले नाही.’’

४. परात्पर गुरु डॉक्टरांचे बोल सत्यात उतरल्याची आलेली प्रचीती !

४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्यानुसार घरी मुलीच्या अंगावर दैवी कण दिसणे

एकदा रामनाथी आश्रमात असतांना परात्पर गुरुदेव आम्हाला म्हणाले होते, ‘‘आता साधकांच्या घरी दैवी कण दिसतील.’’ त्यानंतर घरी परत आल्यानंतर अगदी तसेच झाले. ३ – ४ दिवस माझी मुलगी अनन्या हिच्या अंगावर दैवी कण दिसत होते.

४ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्यानुसार मीठ-पाण्याचे उपाय केल्यावर आध्यात्मिक त्रास असणार्‍या मुलींना लाभ होणे

जेव्हा आम्ही रामनाथी आश्रमात होतो, तेव्हा परात्पर गुरुदेवांनी आम्हाला आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्याच्या पद्धती सांगितल्या होत्या. त्यांमध्ये मीठ-पाण्याच्या उपायांविषयीही सांगितले. एकदा माझ्याकडे आध्यात्मिक त्रास असणार्‍या २ मुली आल्या होत्या. मी त्यांना मीठ-पाण्याचे उपाय करण्यास सांगितले होते. ते ऐकून त्या दोघी हसायला लागल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘आम्हाला वाईट शक्ती घरात फिरतांना दिसतात, तर या उपायाने काय होणार ?’’ ४ – ५ दिवसांनंतर मला त्यांचा भ्रमणभाष आला आणि त्या मला म्हणाल्या, ‘‘आम्ही मीठ-पाण्याचे उपाय केले. पाण्यातून पुष्कळ दुर्गंध आला. एवढेच नाही, तर आमच्या पायातून अगदी बारीक वाळूसारखे खडेसुद्धा निघाले.’’

५. घराच्या आजूबाजूचे सर्व जण कोरोनाग्रस्त असतांना साधिकेचे कुटुंब सुरक्षित असणे

जेव्हा कोरोनाची दुसरी लाट चालू होती, तेव्हा मृत्यूच्या अनेक वार्ता कानी पडत होत्या. आमच्या घराच्या उजव्या आणि डाव्या बाजूकडील घरातील प्रत्येकी एक व्यक्ती मृत्यू पावली होती. आमच्या खालच्या मजल्यावरील घरातही ६ व्यक्ती रहातात. त्या  सर्वांना कोरोना झाला होता. एवढेच नव्हे, तर त्यांच्याकडे काम करणारे नोकरही कोरोनाग्रस्त झाले होते. आमचे घर आणि कुटुंबीय रोगग्रस्त लोकांनी घेरले होते, तरीही आम्ही सर्व जण संसर्गापासून सुरक्षित होतो. आमच्या घरातील नोकरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता.

‘वरील अनुभूती परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच आल्या’, याबद्दल त्यांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– (पू.) सौ. माला संजीव कुमार, नवी देहली (९.११.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक