देहली येथील श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार भविष्यात संत होण्याच्या संदर्भात त्यांच्या बालपणीच मिळालेल्या पूर्वसूचना
देहली येथील श्री. संजीव कुमार भविष्यात संत होण्याच्या संदर्भातील त्यांच्या पणजोबांचे बोल परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्य ठरवल्याचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगणे
‘रविवार १४.१.१९५१ या दिवशी पहाटे ३.३० वाजता कमलानगर (देहली) येथे आजोळी माझा जन्म झाला. त्या दिवशी गुरु गोविंदसिंह यांचा जन्मदिन होता. माझे पणजोबा माझ्या आईला म्हणाले होते, ‘‘हा तर माझा गुरु गोविंदसिंह आहे.’’ याविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांना समजल्यावर ते म्हणाले, ‘‘पंजाबी परिवारात जन्मलेले श्री. संजीव कुमार भविष्यात संत होणार आहेत’, हे त्यांच्या पणजोबांनी आधीच सांगून ठेवले होते. गुरुदेवांनी त्यांना संत घोषित करून त्यांच्या पणजोबांचे बोल सत्य ठरवले.’’
– (पू.) संजीव कुमार (वय ७१ वर्षे), नवी देहली
लहानपणी एका ज्योतिषाने ‘तुमच्यापैकी (सौ. माला कुमार आणि त्यांची बहीण यांच्यापैकी) एक मुलगी संत होईल’, असे भविष्य वर्तवणे अन् २५ – ३० वर्षांनंतर सौ. माला संजीव कुमार संत म्हणून घोषित झाल्यावर त्याची प्रचीती येणे
‘माझ्या वडिलांचे (सीताराम बगाई यांचे) निधन माझ्या लहानपणी झाले. मी लहानपणी खोडकर होते. माझ्या दोन्ही बहिणींची (सरीना ढल (वय ६९ वर्षे, अमेरिका) आणि मोना अहुजा (वय ६० वर्षे, दुबई)), यांची परिस्थिती जेमतेम होती. माझे कुटुंब सधन होते. मला कुणाला दुःख झालेले सहन होत नाही. त्यामुळे मी माझी आई (कै.) कुसुमलता बगाई)) माझ्या दोन्ही बहिणी आणि त्यांची मुले यांना कोणत्याच गोष्टीची उणीव भासू दिली नाही. यामुळे आनंदी होऊन माझी आई मला म्हणायची, ‘‘मी माझ्या इतर दोन्ही मुलींचे जे करायला हवे होते, ते माला करते. मालाच त्या दोघींची आई आहे.’’
मला २५ – ३० वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. एकदा मी, माझी मोठी बहीण (सरीना ढल) आणि आई एकत्रित बसलो होतो. तेव्हा आई आम्हाला म्हणाली, ‘‘तुमच्या लहानपणी एका ज्योतिषाने सांगितले होते की, तुमच्यापैकी एक मुलगी संत होईल.’’ तेव्हा आम्ही दोघी एकमेकींना म्हणू लागलो, ‘‘मीच संत होणार !’’ त्या वेळी माझ्या आईच्या लक्षात येत नव्हते, ‘आम्हा दोघींमध्ये अधिक चांगली कोण आहे ? संत कोण होणार ?’ आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी संतपदी विराजमान झाल्यावर मला त्या भविष्यवाणीची आठवण झाली आणि गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
– (पू.) सौ. माला संजीव कुमार (वय ६७ वर्षे), नवी देहली
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |