हिजाब आणि बुरखा घातल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारल्याचा मुसलमान विद्यार्थिनींचा आरोप
|
वाशिम – राज्यात १७ जुलै या दिवशी नीट (नॅशनल एलिजिबिटी कम एन्ट्रन्स टेस्ट)ची परीक्षा पार पडली. त्यात सहस्रो विद्यार्थी सहभागी झाले; पण येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर हिजाब आणि बुरखा घातलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला. चेहरा आणि सभागृह प्रवेश तिकीट (हॉल तिकीट) दाखवूनही त्यांना परीक्षेस बसू दिले नाही, असा आरोप मुलींच्या पालकांनी केला. या प्रकरणी वाशिम पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. महाविद्यालयात इरम महंमद जाकीर आणि अरिबा समन गझनफर हुसैन या विद्यार्थिनींसमवेत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी आणि सदस्य यांनी गैरवर्तन केले. ‘बुरखा काढा नाही, तर कात्रीने कापावा लागेल’, असे सांगण्यात आले, तसेच भर रस्त्यात हिजाब आणि बुरखा काढायला लावला’, असा आरोप विद्यार्थिनींच्या पालकांनी केला. मुसलमान विद्यार्थिनींच्या पालकांनी केलेले सर्व आरोपी मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाचे प्राचार्य जी.एस्. कुबडे यांनी फेटाळले असून ‘नियमानुसार ही परीक्षा घेण्यात आली’, असे त्यांनी सांगितले. अरिबा समन आणि तिचे वडील गझनफर हुसेन यांनी या प्रकरणी माहिती दिली. ‘चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाईल’, असे पोलिसांनी सांगितले.