गोव्यात नुवे (सालसेत) येथे १० वर्षांच्या मुलाचा अभ्यासाला कंटाळून घरातून पळून जाण्याचा प्रयत्न !
मडगाव – ‘पालक सतत अभ्यास करण्यास सांगतात’, या कारणामुळे निराश झालेल्या नुवे येथील एका १० वर्षांच्या मुलाने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र मायणा-कुडतरी पोलिसांनी जलद गतीने अन्वेषण करून तक्रार आल्यावर २५ मिनिटांच्या आत मुलाला मडगाव कदंब बसस्थानकावरून कह्यात घेतले. त्यानंतर समुपदेशकाच्या साहाय्याने त्याची समजूत काढून त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यामुळे सरकारच्या ‘आनंददायी शिक्षण’ संकल्पनेचा विषय ऐरणीवर आला आहे.
पालकांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा सकाळी शाळेत गेला होता. शाळेतून घरी आल्यावर त्या मुलाच्या आईने त्याला शिकवणीला जाण्यासाठी कपडे घालून सिद्ध होण्यास सांगितले; मात्र काही वेळाने मुलगा घरी काहीही न सांगता घर सोडून गेल्याचे आईच्या लक्षात आले. यानंतर मुलाची शोधाशोध करूनही तो सापडला नसल्याने पालकांनी त्यासंबंधी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी तात्काळ शोधकार्य आरंभले आणि संबंधित मुलगा मडगाव कदंब बसस्थानकावर बसलेला पोलिसांना दिसला. ‘पालकांकडून सतत अभ्यास करण्यासाठी सांगितले जात असल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला’, असे मुलाने पोलिसांना सांगितले.
शिक्षण खात्याने नोंद घेण्याची मागणी
प्राथमिक शिक्षणात मुलांवर वाढलेले अभ्यासाचे ओझे आता त्यांच्या मनावर परिणाम करू लागल्याचे या घटनेवरून दिसत आहे. शाळांमध्ये दिला जात असलेला अभ्यास, शिकवणीचा अभ्यास आणि स्पर्धात्मक युगामुळे मुलगा मागे पडू नये, यासाठी पालकांचा पाठपुरावा यांमुळे कोवळ्या वयातच मुले घातक निर्णय घेऊ लागले आहेत. शिक्षण खात्याने या घटनेची नोंद घेण्याची मागणी केली जात आहे. सरकारने मांडलेल्या ‘आनंददायी शिक्षण’ या संकल्पनेचा विषयही आता चर्चेत आला आहे.
संपादकीय भुमिका
|