गतवर्षी मातृभाषेतील ८ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या !
पणजी, १७ जुलै (वार्ता.) – राज्यात वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी माध्यमातील ७ आणि कोकणी माध्यमातील १ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नावर उत्तरादाखल दिली. अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले.
अधिक माहिती देतांना ते पुढे म्हणाले, ‘‘गतवर्षी पालये-उसकई (बार्देश तालुका), बायणा क्रमांक २ (मुरगाव तालुका), असोळणा (सासष्टी तालुका), देवगी, चोडण (तिसवाडी तालुका), बोंडोई-बेतुल (केपे तालुका), कोनसे-निरंकाल (फोंडा तालुका), केसरक-रवाडा-मोर्ले (सत्तरी तालुका) आणि कोनशे-लोलये (काणकोण तालुका) या ठिकाणच्या मराठी माध्यमातील, तर बायणा क्र.२ (मुरगाव तालुका) येथील कोकणी माध्यमातील सरकारी प्राथमिक शाळा बंद पडली आहे.
२३ सरकारी प्राथमिक शाळा भाड्याच्या घरांत भरतात
राज्यातील २३ सरकारी प्राथमिक शाळा भाड्याच्या घरांमध्ये भरतात. पेडणे, तिसवाडी, सांगे आणि धारबांदोडा या तालुक्यांतील सर्वच शाळा सरकारी इमारतींमध्ये चालतात. फोंडा तालुक्यातील ५, सासष्टी आणि केपे तालुक्यांतील प्रत्येकी ४, डिचोली अन् बार्देश तालुक्यांतील प्रत्येकी ३, सत्तरी आणि मुरगाव तालुक्यांतील प्रत्येकी १ शाळा अन् अन्य शाळा मिळून एकूण २३ सरकारी प्राथमिक शाळा भाड्याच्या घरांमध्ये चालू आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले.
राज्यभरात एकूण ७२० सरकारी प्राथमिक शाळा आहेत आणि सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृह आणि वीजपुरवठा आहे. बहुतांश शाळांना स्वत:चे क्रिडांगण आहे. राज्यातील १० सरकारी प्राथमिक शाळांचे नूतनीकरण आणि डागडुजीचे काम सरकारने हाती घेतले आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.