शास्त्रीय संगीतासह नाट्यसंगीतालाही महत्त्व द्या ! – पं. मुकुंद मराठे
पुणे – नाट्यगीत हा शास्त्रीय गायनाचा भाग आहे. नाट्यसंगीत हे भावसंगीत असले, तरी त्यात शास्त्रीय संगीतातील उत्स्फूर्तता आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीतासह नाट्यसंगीतालाही महत्त्व द्या. रसिकांनीही प्रत्येक मैफलीत गायकांना नाट्यगीत गाण्याचा आग्रह धरावा’, अशी अपेक्षा ज्येष्ठ गायक पं. मुकुंद मराठे यांनी व्यक्त केली. बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार’ पं. मराठे यांना डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पं. मराठे म्हणाले, ‘‘बालगंधर्वांची गायकी म्हणजे नाट्यसृष्टीतील चिरकाल आणि शाश्वत असे सुवर्णपान आहे. त्यांची गायकी कोणत्याही अंगाने पाहिली, तरी सहज आणि सुंदर दिसायची. प्रारंभी बालगंधर्वांना नाटकामध्ये काम करायचेच नव्हते; परंतु देवल यांनी त्यांना समजावल्यानंतर ते सिद्ध झाले आणि त्यांनी इतिहास घडवला.’’