सातारा जिल्ह्यात वजन-काट्यांमध्ये फसवणूक करणार्या ९३ व्यापार्यांवर कारवाई !
सातारा, १७ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यातील सर्व प्रकारचे व्यापारी, व्यावसायिक, पेट्रोल पंपधारक यांच्या वजनमापांची वैधता जिल्हा वजनमापे वैधता नियंत्रण साहाय्यक कार्यालयाकडून पडताळली जाते. गत २ वर्षांच्या कालावधीत ९३ व्यापारी वजन-काट्यांमध्ये फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार वजनमापे वैधमापन कार्यालयाने संबंधितांवर कारवाई केली आहे.
जिल्हा वजनमापे वैधता कार्यालयाच्या माध्यमातून पडताळणी मोहीम राबवण्यात येते. यामध्ये दुकानदारांच्या वजनमापांची शुद्धता पडताळली जाते, तसेच वजनमापांच्या नियमिततेविषयी प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राचा कालावधी १ वर्षांचा असतो. त्यामुळे प्रतिवर्षी वजनमापांची पडताळणी करून प्रमाणपत्र नियमित करावे लागते. प्रमाणपत्र देतांना आवश्यक निकषांची पूर्तता होते का ? याची निश्चिती वजनमापे वैधता कार्यालयाच्या साहाय्यक नियंत्रकाकडून केली जाते. वजनमापांची पडताळणी आणि मुद्रांक शुल्क यांद्वारे शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. वजनमापांच्या पडताळणीस विलंब झाल्यास संबंधितांकडून दंडात्मक शुल्कही आकारले जाते. गत २ वर्षांत ४४ वजनकाटे आणि ४९ आवेष्टित (पॅकींग) वस्तू यांमध्ये अवैधता आढळून आली आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. (गत २ वर्षांच्या कालावधीत वजनमापे वैधता कार्यालयाकडून केवळ ९३ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ही संख्या मोठी आहे; परंतु या कारवाईतही फसवणारे व्यापारी किंवा त्यासाठी लाच खाणारे कर्मचारीही असू शकतात त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. – संपादक)